शंकर पार्वतीला म्हणाले , हे देवी , या गोतीर्थाचे पूर्वेस भानुतीर्थ आहे . येथे सूर्याने दिव्य तपश्चर्या करुन ज्ञान प्राप्त केले . पर्वकाली येथे स्नान केले असता ग्रहपीडा व अज्ञान दूर होते . यामुळे भगवान सूर्यनारायण जगताचा आत्मा झाला . येथील स्नान , दानामुळे भवबंधन दूर होते . याच्या पूर्वेस चक्रतीर्थ आहे . प्रह्लादाच्या रक्षणार्थ पाठविलेले चक्र येथे प्रगट झाले . या तीर्थाचे सेवन करणारा मृत्यूंजय होतो . कल्पवृक्षासारखा याचा महिमा आहे . चकतीर्थापलीकडे नंदक हे रम्य असे तीर्थ असून जवळच पाशमुक्त करणारे पाशतीर्थ आहे . पाशतीर्थाच्या पूर्वेस फलदायी असे लांगलतीर्थ व दुःख नाशक मौसलतीर्थ आहे . ही सर्व तीर्थे परस्परासंनिधच आहेत . अन्य कितीतरी तीर्थे इतर पुराणात वर्णिलेली आहेत . ही सर्व भूमीच तीर्थस्वरुप आहे ; तर भीमा वेद्स्वरुप असून नीरा फलदायी आहे . म्हणून नीराभीमासंगमावर स्नानादि कर्मे केल्याने परमपदाची प्राप्ती होचे . अखिल विश्वाच्या कल्याणार्थ भगवान नृसिंह येथे नित्य असल्याने भक्तांच्या कामना येथे पूर्ण होतात . जगातील सर्वतीर्थाचे फळ भक्तांना येथे नित्य प्राप्त होते .
याप्रमाणे ‘भीमा मग्नतीर्थवर्णन ’, हा दहावा अध्याय पूर्ण झाला .