अध्याय एकोणचाळीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


गोवत्सपद जीवन ॥ पुरुषार्थ भोगिसी समुद्र उडोन ॥ रावणाचें नगर जाळिलें पूर्ण ॥ ते येथें न चलें आम्हांसी ॥५१॥

हा संग्रामसिंधु परम दुर्धर ॥ येथें जय न पावसी तूं वानर ॥ आमचे जननीसी अपार ॥ स्नेह तुझा लागलासे ॥५२॥

ते क्षणक्षणां आठवित ॥ म्हणोनि तुज रक्षिले येथ ॥ उगाच राहें निवांत ॥ अचळवत हनुमंता ॥५३॥

तों वृक्ष घेऊनि सत्वर ॥ पुढें धांविन्नला मित्रपुत्र ॥ बाणघातें तरुवर ॥ लहूनें तोडिला हातींचा ॥५४॥

म्हणे ऐक रे चंडांशुसुता ॥ तो मागील काळ राहिलां आतां ॥ तुम्ही पतितांसी तत्वतां ॥ लावीन शिक्षा आज येथें ॥५५॥

वाळी ज्येष्ठबंधू मारवून ॥ त्याचे स्त्रियेसीं करिसी गमन ॥ ज्याचे बळें कर्म केले पूर्ण ॥ त्याचं ज्ञान कळों आले ॥५६॥

तुम्हां मर्कटांसी कैचें ज्ञान ॥ परी तुज गुरु भेटला जाण ॥ उत्तम न्याय करून ॥ तारा तुज दिधली ॥५७॥

गुरु अपंथें चाले सदा ॥ मग कैंची शिष्यास मर्यादा ॥ असो प्रायश्चित एकदां ॥ घेईं आजि रणांगणीं ॥५८॥

मग घालून सहस्र बाण ॥ रणीं पाडिला सूर्यनंदन ॥ फणसफळावरी कंटक पूर्ण ॥ तैसेचि शर भेदले ॥५९॥

तंव पुढें धांवला जांबुवंत ॥ तयाप्रति कुश वीर बोलत ॥ म्हणे अस्वला तूं निर्बळ बहूत ॥ वृद्ध अत्यंत दृष्टिहीन ॥६०॥

सोडोनियां सहस्र बाण ॥ तोही पाडिला उलथोन ॥ तों घेऊनियां पाषाण ॥ नळ वानर धांविन्नला ॥६१॥

तयाप्रति लहू बोले वचन ॥ म्हणे हे नव्हे सेतुबंधन ॥ पांच बाण सोडून ॥ तोही पाडिला रणभूमीं ॥६२॥

तंव अंगद धांवला सकोप ॥ तयासी बोले रविकुलदीप ॥ रावणाचा सभामंडप ॥ नव्हे पामरा उचलावयाचा ॥६३॥

माझे पाठीसी रिघे येऊन ॥ तुझे पित्याचा मी सूड घेईन ॥ शत्रूची सेवा करितां पूर्ण ॥ लाज न वाटे मर्कटा ॥६४॥

तुझें मातेने केला व्यभिचार ॥ त्याचें प्रायश्चित देईन सत्वर ॥ ऐसें म्हणोनि पांच शर ॥ टाकोनि अंगद पाडिला ॥६५॥

असो अष्ट जुत्पती आणि हनुमंत ॥ रणीं पाडले वीर समस्त ॥ मग कोदंड चढवूनि त्वरित ॥ बाण लावीत राघव ॥६६॥

वेगें सोडिले दश बाण ॥ कुशें शत सोडिले निर्वाण ॥ सहस्र शर रघुनंदन ॥ टाकिता जाहला तयावरी ॥६७॥

कुशें लक्ष बाण सोडिले ॥ राघवें कोटी मोकलिले ॥ बाणमंडपें ते वेळे ॥ झांकुळलें सूर्यबिंब ॥६८॥

रघुपतीचा हस्तवेग बहुत ॥ त्याहूनि विशेष कुशवीर दावित ॥ बाणांचे तेव्हां गणित ॥ लेखित शेषांते न करवे ॥६९॥

अनिवार बाळकें दोनी ॥ नाटोपती रामासी रणीं ॥ यावरी कोदंडपाणी ॥ काय बोले तेधवां ॥७०॥

म्हणे ऋषिबाळक हो ऐका वचन ॥ तुम्हांस भातुकें देईन ॥ करावयासी दुग्धपान ॥ धेनु देईन सवत्स ॥७१॥

मी तुम्हांसी जाहलो प्रसन्न ॥ जें मागाल ते इच्छा पुरवीन ॥ सकळ दुःख दरिद्र हरून ॥ देईन दान वाजी गज ॥७२॥

मग ते देती प्रतिवचना ॥ आम्हांस मागावयास नसे वासना ॥ तूं मागें मनकामना ॥ पूर्ण करूं तुझी आम्हीं ॥७३॥

तुझी तूंच भोगी संपत्ति ॥ आम्ही ऐकिली तुझी कीर्ति ॥ शोधितां हे त्रिजगती ॥ निर्दय नाहीं तुजऐसा ॥ तुज साधु म्हणेल तरी कोण ॥

व्यर्थ वाळी मारिला कपटेंकरून ॥ जानकीसारिखें चिद्रत्न ॥ अन्यायाविण दवडिले ॥७५॥

निष्पाप जैसी भागीरथी ॥ तिजहून पवित्र सीतासती ॥ घोरवनीं टाकिली ही ख्याति ॥ तुज न शोभे राघवा ॥७६॥

ऐसें दोघेही बाळ बोलती ॥ प्रत्त्युत्तर देत रघुपती ॥ मनांत उपजे बहु प्रीती ॥ कीं दोघांप्रति आलिंगावें ॥७७॥

बाळभाषण ऐकोन ॥ वाटे तयांसी द्यावें चुंबन ॥ यापरी ते दोघेजण ॥ म्हणती बाण सोडी वेगीं ॥७८॥

तूं क्षत्रिय म्हणविसी पूर्ण ॥ गोष्टी सांगसी युद्ध टाकून ॥ लीलावतारी रघुनंदन ॥ काय बोले याउपरी ॥७९॥

तुम्ही दोघे कोणाचे कोण ॥ झालेत कोणे वंशीं निर्माण ॥ मातापितयांची नाम खूण ॥ सांग संपूर्ण आम्हांप्रति ॥८०॥

दोघांचे देव्हडेंचि ठाण ॥ दोघांची विद्या समसमान ॥ वेद शास्त्र पुराण रामायण ॥ कोण्या गुरूनें पढविलें ॥८१॥

धनुर्वेद मंत्रास्त्र ॥ कळा कौशल्य युक्ति विचित्र ॥ सद्गुरु कोण तुमचा पवित्र ॥ नाम त्याचें सांगा पां ॥८२॥

ऐसें बोलता रघुनाथ ॥ दोघे गदगदां हांसत ॥ रणी बंधु पडले समस्त ॥ त्यांचा खेद सांडिला येणें ॥८३॥

विद्या सरली तुझी सकळिक ॥ रणीं पुससी आतां सोयरिक ॥ कीं बंधु पडले हा धाक ॥ मनीं दचक बैसला तुझा ॥८४॥

तुज पुसावया काय कारण ॥ सोडीं वेगें निर्वाणबाण ॥ बंधूचा सूड घेईं पूर्ण ॥ मग सोयरिक पुसे सुखे ॥।८५॥

म्हणती तूं अयोध्येचा नृपवर ॥ वधिले रावणादि असुर ॥ ती अवघी विद्या बाहेर ॥ काढीं आज पाहूं दे ॥८६॥

आम्हीं असों धाकुटें किशोर ॥ तूं पूर्वींचा जुनाट झुंजार ॥ धनुर्वेद पढविला समग्र ॥ गुरु वसिष्ठें तुजलागीं ॥८७॥

तुज एकपत्नीव्रत पूर्ण ॥ सत्कीर्ति जानकीतें सोडून ॥ अपकीर्ति कां वरिली दाटून ॥ हें तों दूषण जगीं जाहलें ॥८८॥

युद्ध केल्याविण सर्वथा ॥ आम्ही तुज न सोडूं आतां ॥ भय वाटत असेल चित्ता ॥ तरी पळून जाय अयोध्ये ॥८९॥

दारा कुटुंब तुज नाहीं ॥ आतां संन्यास घेऊन सुखें राही ॥ यावरी जनकाचा ज्येष्ठ जांवई ॥ काय बोलता जाहला ॥९०॥

तुम्ही सांगा आपले वर्तमान ॥ मग मी तुम्हांसी झुंजेन ॥ यावरी कुश बोले हांसोन ॥ ऐकें सावध होऊनि ॥९१॥

जानकी उदरकमळ शुद्ध ॥ त्यांत जन्मलों दोघे मिलिंद ॥ शत्रुकाष्ठें कोरून सुबुद्ध ॥ पिष्ठ करितो रणांगणीं ॥९२॥

वाल्मीकतात गुरु पूर्ण ॥ तेणें आमुचें केलें पाळण ॥ त्यानंतरें मौंजीबंधन ॥ करून वेद पढविले ॥९३॥

सकळ शास्त्रें रामचरित्र ॥ धनुर्वेद पढविला समग्र ॥ तो आमचे मातेचा तात पवित्र ॥ वाल्मीकऋृषि जाण पां ॥९४॥

मातेचे कैवारेंकरूनी ॥ भार्गवें निःक्षत्री केली अवनी ॥ तैसेंच आम्ही धरली मनीं ॥ करूं अवनी निर्वीर ॥९५॥

कीं मातृकैवारें विनासुत ॥ उरग संहारी तेव्हां समस्त ॥ तैसेंच करणें आजि येथ ॥ आम्हासही निर्धारें ॥९६॥

त्वां सांडिली जैं सीता सती ॥ तैंच गळाली तुझी शक्ती ॥ अविवेक केला निश्चिती ॥ पुनः मागुती आवरेना ॥९७॥

ऐसें ऐकतां रामचंद्र ॥ सीता आठवूनि दयासमुद्र ॥ हृदय पिटून सर्वेश्वर ॥ धरणीवरी पडियेला ॥९८॥

मूर्च्छना सांवरूनि पुढती ॥ मागुती उठिला रघुपति ॥ पुढें बिभीषण मारुति ॥ तयांप्रति पुसतसे ॥९९॥

म्हणे हे कवणाचे नंदन ॥ मग ते बोलती विचारून ॥ तुमचीं प्रतिबिंबें परिपूर्ण ॥ जानकी उदरी जन्मलीं ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP