अध्याय छ्त्तीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


अयोध्येभोंवते दुर्ग पूर्ण ॥ उंच सतेज अतिगहन ॥ नागफणाकृति शोभायमान ॥ चर्चा त्यांवरी विकासती ॥५१॥

कीं ओळीनें जडले गभस्ती ॥ दुर्गावरी वृक्ष विराजती ॥ ते सदा फळीं निराळ भेदिती ॥ कपी पाहती समस्त ॥५२॥

जैसे कनकाद्रीचे सुत ॥ तैसें हुडे भोंवते विराजत ॥ महाद्वारें लखलखित॥ तेज अमित न गणवे ॥५३॥

ऐरावतारी देवपाळ ॥ बैसोन महाद्वारें जाईल ॥ तेवीं चोवीस योजनें विशाळ ॥ ओतप्रोत अयोध्या ॥५४॥

अयोध्येचा बाजार बहुत ॥ मृगमदाचा सुवास सुटत ॥ मठ मंडप चौबारा शोभत ॥ रत्नजडित अपूर्व ॥५५॥

हिरेयांच्या मदलसा झळकती ॥ वरी मुक्तांचे हंस नाचती ॥ पाचूचे रावे शब्द करिती ॥ घरोंघरी नवल हें ॥५६॥

वीणे टाळ मृदंग वाजवून ॥ लेपें करिती सुस्वर गायन ॥ रत्नपुतळ्या करिती नर्तन ॥ हस्तसंकेत दावूनियां ॥५७॥

शतखणी निर्मळ गोपुरें विशाळ ॥ खणोखणी पुतळ्या निर्मळ ॥ अणुमात्र लागतां अनिळ ॥ फिरफिरून नृत्य करिती ॥५८॥

अवतारलेपें रत्नजडित ॥ गोपुरांवरी सतेज झळकत ॥ उड्डगणांसी हिणावित ॥ लक्षावधि चहूंकडे ॥५९॥

राजगृहीं अत्यंत सुप्रभ ॥ झळकती हिरीयांचे स्तंभ ॥ निळियांची उथाळीं स्वयंभ ॥ जोतीं घडलीं पाचूंची ॥६०॥

सुवर्ण तुळवट लंबायमान ॥ वरी पाचूचे दांडे सघन ॥ माणिकांच्या किलच्या संपूर्ण ॥ तेजेंकरून लखलखती ॥६१॥

अष्टमहा सिद्धि घरोघरीं ॥ नवनिधि तिष्ठती द्वारीं ॥ समानबुद्धि नरनारी ॥ पुण्यराहाटीं वर्तती ॥६२॥

मृत्यु रोग दरिद्र दुःख ॥ दुर्बुद्धि अवर्षण पाप शोक ॥ तस्कर कापट्य पीडा निंदक ॥ अयोध्येमाजी नसेचि ॥६३॥

छत्रासी एक दंड प्रसिद्ध ॥ सुमनहारासी गुंफितां बंध ॥ सारी खेळतां मारी सुबुद्ध ॥ शूरत्व युद्धीं जाणिजे ॥६४॥

घरासी न ये ऋृषि भिक्षुक ॥ तरी लोकांस वाटे परम दुःख ॥ प्रजेसी साम्राज्य सुख देख ॥ देतील तेंच घेइजे ॥६५॥

त्रिकाळ गाई दुभती ॥ इच्छिलें तितुकें दुग्ध देती ॥ यथाकाळीं मेघ वर्षती ॥ समयोचित पाहूनियां ॥६६॥

धर्मशाळा मंडप विशाळ ॥ हिऱ्यांची लिंगें शोभती सोज्वळ ॥ आरक्त माणिकांच्या निर्मळ ॥ गणेशमूर्ति झगमगती ॥३७॥

घरोघरी वेदाध्ययन ॥ न्याय मीमांसा सांख्य संपूर्ण ॥ पतंजलि वेदांत व्याकरण ॥ हेच चर्चा होतसे ॥६८॥

टाळ मृदंग उपांगेसी तेथ ॥ कीर्तन करिती प्रेमळ भक्त ॥ राग उपराग भार्येंसहित ॥ सामगायन एक करिती ॥६९॥

लास्यकलाकुशल बहुत ॥ एक करिती तांडव नृत्य ॥ विद्युत्प्राय ध्वज तेथ ॥ देउळावरी झळकती ॥७०॥

चंदनाचे सडे घालूनी ॥ वाटा रंगविल्या कुंकुमेंकरूनी ॥ वृद्धदशा कोणालागूनी ॥ अयोध्येमाजी नसेचि ॥७१॥

नानातीर्थांचीं कारंजी बहुत ॥ घरोघरीं उफाळत ॥ नीळांचे मयूर धांवत ॥ बिदोबिदीं लवलाहें ॥७२॥

आळोआळीं पाहतां मंदिरें ॥ एकाहूनि एक सुंदरें ॥ गृहागृहा प्रति गोपुरें ॥ चित्रविचित्र शोभती ॥७३॥

असो ऐसी अयोध्या देखोन ॥ तटस्थ जाहले वानरगण ।ं तंव पूर्वद्वारें रघुनंदन ॥ अयोध्येच्या पातला ॥७४॥

महाद्वारीं गणेश सरस्वती ॥ त्यांची पूजा करून श्रीरघुपती ॥ आंत प्रवेशला त्वरितगती ॥ सकळ नृपांसहित पैं ॥७५॥

जैसा नद समुद्रीं मिळाला ॥ नंदनवनीं भ्रमर संचरला ॥ कीं चतुर्मुखाचे हृदयीं निघाला ॥ वेद जैसा षडंगेसी ॥७६॥

कीं वृत्रासुर मर्दून ॥ निजमंदिरीं प्रवेशे शचीरमण ॥ ॥ तेवीं सकळांसहित रघुनंदन ॥ अयोध्येंत प्रवेशला ॥७७॥

देव अंबरी पाहती ॥ असंख्य दाटले नृपती ॥ किरीटास किरीट आदळती ॥ रत्नें विखुरती चहूंकडे ॥७८॥

त्या अयोध्येच्या समस्त नारी ॥ ज्या देवांगनांहूनि सुंदरी ॥ रत्नदीप घेऊनियां करीं ॥ ओंवाळूं आल्या रामातें ॥७९॥

लक्षानुलक्ष नगरललना ॥ म्हणती राघवा चिन्मयलोचना ॥ जयलाभ तुझिया चरणा ॥ जवळी अखंड असोत ॥८०॥

म्हणोनि आपुल्या गोपुरावरूनी ॥ ओंवाळिती सकळ कामिनी ॥ राकाइंदूहूनि वदनीं ॥ प्रभा विशेष विराजे ॥८१॥

त्यांकडे पाहून रघुनाथ ॥ सुमंतास भू्रसंकेत दावित ॥ तो त्यासी समजला अर्थ ॥ जें कां हृद्रत रामाचें ॥८२॥

वस्त्रें अलंकार आणूनी ॥ तात्काळ गौरविल्या कामिनी ॥ तों नगरलोक धांवले ते क्षणीं ॥ मंडपघसणी जाहली ॥८३॥

तयांसी वेत्रधारी मारित ॥ ते दृष्टीं देखोन रघुनाथ ॥ तात्काळ परते केले दूत ॥ म्हणे जन सर्वत्र येऊं द्या ॥८४॥

आज्ञा होतांचि जाण ॥ जवळ आले सकळ जन ॥ पाहोनियां श्रीरामाचें वदन ॥ चरणीं मिठ्या घालिती ॥८५॥

लक्षोनियां श्रीरघुनाथा ॥ नारी टाकिती वरी अक्षता ॥ एक लिंबलोण तत्वतां ॥ मुखावरून उतरिती ॥८६॥

एक म्हणती तुजवरून ॥ राघवा जाऊं ओंवाळून ॥ एक म्हणती हें वदन ॥ पुनः दृष्टीं पडेना ॥८७॥

दिव्य सुमनांचे संभार ॥ वरोनी वर्षती सुरवर ॥ असो जगद्वंद्य रघुवीर ॥ निजमंदिरी प्रवेशला ॥८८॥

जाऊनि अंतर्गुहांत ॥ पुष्पांजली देवांस समर्पित ॥ राजयांच्या सेना समस्त ॥ अयोध्याप्रदेशीं उतरल्या ॥८९॥

अष्टदशपद्में वानर ॥ उतरले लंकेचे असुर ॥ तितुक्यांसी आदर उपचार । सुमंत शत्रुघ्न करिताती ॥९०॥

बिभीषण सुग्रीव राजे सकळी ॥ ते सदा असती रामाजवळी ॥ वसिष्ठें सामग्री सिद्ध केली ॥ राज्यपदाची तेधवां ॥९१॥

श्वेत चामर श्वेत छत्र ॥ श्वेत गज श्वेत तुरंग थोर ॥ चतुःसमुद्रीचें आणिलें नीर ॥ पंच पल्लव सप्त मृत्तिका ॥९२॥

सभामंडप देदीप्यमान ॥ तेथें मांडिले दिव्य सिंहासन ॥ मिळाले सकळ विद्वजन ॥ आणि नृपती सर्वही ॥९३॥

वसिष्ठ म्हणे राजीवनयना ॥ जलजगात्रा जानकीजीवना ॥ जगद्वंद्या अनंतसदना ॥ राज्य आतां अंगिकारीं ॥९४॥

भरत सप्रेमें बोले ॥ चतुर्दश वर्षें तप केले ॥ तें आजि शीघ्र काळें ॥ सुफळ जाहलें पाहिजे ॥९५॥

सिंहासनी बैसावें आपण ॥ मग अक्षय भांडारें फोडून ॥ द्रव्य याचकांसी देईन ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९६॥

मग वसिष्ठें हातीं धरून ॥ मंडपा आणिला रघुनंदन ॥ सीतेसहित बैसवून ॥ अभिषेक केला वेदमंत्रीं ॥९७॥

घनश्याम पूर्ण रघुवीर ॥ तप्तकांचनवर्ण पीतांबर ॥ लेवविले दिव्य अलंकार ॥ मुकुट कुंडलें कौस्तुभादि ॥९८॥

जानकीसहवर्तमान ॥ सिंहासनीं बैसविला रघुनंदन ॥ सकळ भूपती येऊन ॥ अक्षता कपाळीं लाविती ॥९९॥

सुमुहूर्त वेळा साधून सत्वर ॥ वरी उभारिलें दिव्य छत्र ॥ तों सकळ वाद्यांचा गजर ॥ होता जाहला ते काळीं ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP