मृगेंद्रें ज्यासी करीं धरिलें ॥ त्यासी जंबुकें येऊन फाडिलें ॥ सुपर्णगृहीं प्राणी राहिले ॥ त्यांसी डंखिलें विखारीं ॥१॥
याचक लवलाहें धांवला ॥ कल्पतरूखालीं आला ॥ त्यासी तेणें मार दिला ॥ शुष्क काष्ठ घेऊनियां ॥२॥
व्याघ्र मारूनि लवलाहें ॥ धन्यानें सोडविली गाय ॥ मग काष्ठप्रहारें तीस पाहें ॥ कां हो व्यर्थ मारावें ॥३॥
गंगापुरी बुडतां प्राणी ॥ कडेस काढिला धांवोनी ॥ मग त्यासी शस्त्रेंकरूनी ॥ कां हो व्यर्थ वधावें ॥४॥
भागीरथी भरूनि लवलाहीं ॥ सागरा शरण गेली पाहीं ॥ तो जरी म्हणे कीं ठाव नाहीं ॥ तरी गति तियेसी काय पुढें ॥५॥
जलचरां ठाव नेदी नीर ॥ पुढें त्यांचा काय विचार ॥ पक्षियांवरी कोपे अंबर ॥ तरी त्यांहीं जावें कोठें पां ॥६॥
जळत्या गृहाहूनि काढिलें ॥ मागुती वणव्यांत टाकिलें ॥ करुणासागरासी आलें ॥ भरतें क्रूर नवल हें ॥७॥
मातेनें बाळास दिधले विष ॥ पित्यानें वधिलें पुत्रास ॥ धन्यानें दंडिलें दासीस ॥ कोणाचे तेथें काय चाले ॥८॥
कांसेसी लाविलें कृपा करून ॥ मध्येंच दिधलें सोडून ॥ तेणें कोणासी जावें शरण ॥ तयावेगळें सांग पां ॥९॥
अन्नार्थी पात्रीं बैसले ॥ ते दातयानें दवडिले ॥ तरी त्यांचे बळ कांही न चाले ॥ तैसें जाहलें येथें हो ॥११०॥
सूर्य कोपला किरणांवरी ॥ समुद्र लहरींवरी दावा करी ॥ अमृत मधुरता बाहेरी ॥ आपली घालूं इच्छितसे ॥११॥
आपल्या शाखेसी अबोला ॥ कल्पद्रुमें जैसा धरिला ॥ चंद्रें कळांचा त्याग केला ॥ मेरु कोपला शिखरांवरी ॥१२॥
जैसी भागीरथी दोषविहीन ॥ कीं सर्वदा शुचि जैसा अग्न ॥ तैसी बोलता मी जाण ॥ शुचिष्मंत निजांगें ॥१३॥
दशकंधर गेला घेऊन ॥ मोहरीहून अन्याय सान ॥ मेरूइतका दंड पूर्ण ॥ समर्थे हा आरंभिला ॥१४॥
वातें कांपें कमळिणी ॥ तीवरी वज्र टाकी उचलोनी ॥ अन्याय नसतां कुरंगिणी ॥ व्यर्थ वनीं कां मारिजे ॥१५॥
कीं डागाअंगीं सुवर्ण ॥ हें अग्निसंगे कळे पूर्ण ॥ तरी मी आतां दिव्य घेईन ॥ सर्वांदेखतां येथेचि ॥१६॥
नयनीं वाहती अश्रुपात ॥ जानकी वानरां आज्ञापित ॥ म्हण कुंड करून अद्भुत ॥ अग्नि सत्वर पाजळा ॥१७॥
तत्काळ विस्तीर्ण केलें कुंड ॥ काष्ठापर्वत घातले उदंड ॥ अग्निज्वाळा माजल्या प्रचंड ॥ निराळ ग्रासूं धांवती ॥१८॥
जगन्माता बोले वचन ॥ जरी मी शुद्ध असेन ॥ तरीच येईन परतोन ॥ पहावया चरण स्वामींचे ॥१९॥
जरी मी दोषी असेन पूर्ण ॥ तरी भस्म करील हा अग्नि ॥ ऐसें तेव्हां बोलून ॥ सरसावली जगन्माता ॥१२०॥
सुरासुर वानर ऋक्ष मुनीश्वर ॥ अवघे जाहले चिंतातुर ॥ म्हणती हा अनर्थ थोर ॥ सुखामाजीं ओढवला ॥२१॥
असो रण माजलें देखोनी ॥ वीर निर्भय अंतःकरणीं ॥ तैसी अग्नीसमोर विदेहनंदिनी ॥ निर्भय मनीं सर्वदा ॥२२॥
कुंडासी करून प्रदक्षिणा ॥ दृष्टीभरी पाहिलें रघुनंदना ॥ कंठींचा सुमनहार काढूनि जाणा ॥ अग्नीवरी टाकिला ॥२३॥
सत्य जय सत्य म्हणोनी ॥ त्रिवार गर्जे त्रिजगज्जननी ॥ अग्निं कुंडीं तयेक्षणीं । उडी घातली अकस्मात ॥२४॥
मंगळजननीचें हृदयरत्न ॥ अग्नीमाजी पडतांचि जाण ॥ कन्या गांजिली म्हणून ॥ भूमी कांपे थरथरां ॥२५॥
जाहली एकचि आरोळी ॥ शोकार्णवीं पडल कपिमंडळी ॥ सकळ सुरवर व्याकुळीं ॥ प्रळयकाळ भाविती ॥२६॥
दशदिशांमाजी दाटला धूर ॥ कढों लागले सप्त समुद्र ॥ वैकुंठ कैलासपदें समग्र ॥ डोलों लागली तेधवां ॥२७॥
थरथरां कांपे अंबर ॥ नक्षत्रें रिचवती अपार ॥ सौमित्रादि वायुकुमर ॥ नेत्रोदकें ढाळिती ॥२८॥
म्हणती अग्निमुखींहूनि पुढती ॥ पुन्हां कैंची देखों सीता सती ॥ बोलती सर्व कर्मगति ॥ परम दुर्धर वाटतसे ॥२९॥
एक घटिकापर्यंत अग्निमाजी जानकी गुप्त ॥ तों मस्तकीं पुष्पें घवघवित ॥ अकस्मात निघाली ॥१३०॥
पहिल्या रूपाहून आगळे ॥ शतगुणीं रूप जाहलें ॥ प्रभेनें भूमंडळ भरिलें ॥ आश्चर्य जाहलें ते वेळीं ॥३१॥
मागें अरण्यकांडीं कथा ॥ रेखेंत जाहली गुप्त सीता ॥ तें स्वरूप प्रकटलें आतां ॥ मिष दिव्यांचें करूनियां ॥३२॥
सीतास्वरूप जाहला होता अग्न ॥ तेणें राक्षसवन जाळून ॥ आपुल्या स्वरूपें येऊन ॥ दिव्यमिषें मिळाला ॥३३॥
सीता रामाची चिच्छक्ती ॥ ती गेलीच नाहीं लंकेप्रती ॥ हे खूण साधु संत जाणती ॥ जे कां वेदांती सज्ञान ॥३४॥
असो जानकी देखतां साचार ॥ जाहला एकचि जयजयकार ॥ अष्टदशपद्में वानर ॥ नमस्कार घालिती ॥३५॥
मग पुष्पांचे संभार ॥ सीतेवरी टाकिती सुरवर ॥ म्हणती सीता सती पवित्र ॥ सर्व नमस्कार घालिती ॥३६॥
सौमित्र सुग्रीव बिभीषण ॥ जानकीस घालिती लोटांगण ॥ हनुमंतें नमून चरण ॥ आनंदें पूर्ण नाचतसे ॥३७॥
असो श्रीरामाकडे सीता सती ॥ चालिली तेव्हां हंसगती ॥ मग उठोनियां रघुपती ॥ उभा ठाकला ते वेळे ॥३८॥
श्रीरामुख विलोकून ॥ सीता करी हास्यवदन ॥ धांवोनी दृढ धरिले चरण ॥ जगदगुरुचे ते काळीं ॥३९॥
मग जानकीस उठवोनी ॥ क्षेम देतसे कोदंडपाणी ॥ वामांकावरी मग घेउनी ॥ रघुनाथ तेव्हां बैसला ॥१४०॥
नवमेघरंग रघुनाथ ॥ जानकी विद्युल्लता तळपत ॥ सीता -राम देखोनि समस्त ॥ जयजयकार करिती तेधवां ॥४१॥
असुरांची वाद्यें ते काळीं ॥ माहागजरें गर्जो लागलीं ॥ आज्ञा घ्यावया ते काळीं ॥ देव उदित जाहले ॥४२॥
सदाशिव म्हणे रघुत्तमा ॥ पुराणपुरुषा पूर्णब्रह्मा ॥ आनंदकंदा निजसुखधामा ॥ पूर्णकामा सर्वेशा ॥४३॥
रविकुलभूषणा जलनेत्रा ॥ जनकजामाता नीलगात्रा ॥ सच्चिदानंदा सुहास्यवक्रा ॥ धन्य लीला दाखविली ॥४४॥
चराचरजीवचित्तचाळका ॥ अनंतब्रह्मांडपाळका ॥ राक्षस मर्दूनि सकळिकां ॥ निजभक्तां तारिलें ॥४५॥
युगानयुगीं धरूनि अवतार ॥ मर्दिले पापी दुष्ट असुर ॥ परी ये अवतारींचें चरित्र ॥ अगाध दाविलें श्रीरामा ॥४६॥
माझिये मनींचें आर्त बहुत ॥ केव्हां मी देखेन रघुनाथ ॥ तुझें नामें सकळ शांत ॥ हाळाहळ जाहले ॥४७॥
आतां सीतेसहित रामचंद्रा ॥ सत्वर जावें अयोध्यापुरा ॥ ऐसें बोलतां कर्पूरगौरा ॥ राघव काय बोलत ॥४८॥
म्हणें माझें तूं आराध्य दैवत ॥ अनादिसिद्ध कैलासनाथ ॥ विश्वंभर तूं विश्वातीत ॥ करणी अद्भुत दाविसी ॥४९॥
ब्रह्मांड जाळी हाळाहळ ॥ तें तुवां कंठीं धरिले तत्काळ ॥ लोक सुखी रक्षिले सकळ ॥ परम दयाळू तूं होसी ॥१५०॥