अध्याय एकतीसावा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


तेंव्हा गुप्तरूपें हनुमंते जाऊन ॥ दोघांचे आणिले धनुष्यबाण ॥ पाठीसी लपवूनि रामलक्ष्मण ॥ आपण देवी होउनि बैसला ॥५१॥

मग म्हणे अहिरावणा ॥ तूं आधी घेईं माझ्या दर्शना ॥ ऐकातांचि ऐशा वचना ॥ येरू प्रवेशे देउळीं ॥५२॥

जैसा पंचाननाचें दरींत ॥ वारण प्रवेशे उन्मत्त ॥ कीं व्याघ्राचिये जाळीत ॥ मृग अकस्मात संचरे ॥५३॥

कीं भुजंगाचे बिळीं देख ॥ प्रवेशला जैसा मूषक ॥ कीं मरण नेणोनि पतंग मूर्ख ॥ दीपासी भेटों पातला ॥५४॥

तैसा प्रवेशे अहिरावण ॥ भयानक देवी देखोन ॥ धाकें धाकें चि नमन ॥ करिता जाहला तेधवां ॥५५॥

देवीचरणीं मस्तक ठेविला ॥ देखोनि महारुद्र क्षोभला ॥ असुर पायीं रगडिला ॥ शतचूर्ण केला मस्तक ॥५६॥

हस्त पाद झाडी ते क्षणीं ॥ तेणें दणाणली मंगळजननी ॥ तो दणाण भयंकर ऐकोनी ॥ शाहाणे उठोनि पळाले ॥५७॥

अहिरावणाचा गेला प्राण ॥ मग महिरावण बोले वचन ॥ म्हणे चार घटिका जाहल्या पूर्ण ॥ बंधु बाहेरी नयेचि ॥५८॥

काय तो पाहावया वृत्तांत ॥ पूजारी जाय देउळांत ॥ तयाचा दायदही जात ॥ त्याचे पाठीं हळूहळू ॥५९॥

देउळीं अन्नप्रसाद समूळ ॥ तो अवघा पैं नेईल ॥ म्हणोनियां उतावेळ तो देउळीं प्रवेशला ॥१६०॥

पुढील काळें ओढिला ॥ देवी नमावया गेला ॥ मत्कुणप्राय रगडिला ॥ पायांतळीं हनुमंतें ॥६१॥

ऐसें देखोनि विपरीत ॥ दुसरा चळचळां कांपत ॥ म्हणे हा होय हनुमंत ॥ लंका जेणें जाळिली ॥६२॥

आंगीं मुरकुंडी वळोन ॥ दारांत आपटला येऊन ॥ दोन्हीं हस्तेंकरून ॥ शंख करी आक्रोशें ॥६३॥

म्हणें जेणें लंका जाळिली ॥ तोच काळ बैंसला देउळीं ॥ देवी मोरींत दाटिली ॥ पूजा घेतली सर्व तेणें ॥६४॥

पूजारियासहित अहिरावण ॥ यमपुरीस पाठविला पूर्ण ॥ पिशिताशन नाम ऐकतां जाण ॥ पळों लागलें चहूंकडे ॥६५॥

राक्षसां जाहला आकांत ॥ एक एकांतें धरूनि हनुमंत ॥ तेथेंचि पाववी मृत्यु ॥ दिशा लंघोनि एक जाती ॥६६॥

मग शस्त्रें कवचें बांधोन ॥ सेनासागर एकवटून ॥ सिद्ध झाला महिरावण ॥ युद्धालागीं ते काळीं ॥६७॥

म्हणे बाहेर येई रे मर्कटा ॥ कोठें प्रवेशलासि महाधीटा ॥ आजि मृत्युपुरींचिया वाटा ॥ रामासहित लावीन तूंतें ॥६८॥

तों देऊळामाजी वायुपुत्र ॥ स्कंधी घेत राम सौमित्र ॥ कीं तें विष्णु कर्पूरगौर ॥ एका वहनीं बैसले ॥६९॥

कीं शशी आणि दिनपती ॥ बैसले दिसती एक रथीं ॥ कीं इंद्र आणि वाचस्पति ॥ एक वहनीं आरूढले ॥१७०॥

तैसें दोघे स्कंधी घेऊन ॥ बाहेर निघे वायुनंदन ॥ पादप्रहारें करून ॥ कपाटें फोडिली ॥ तत्काळीं ॥७१॥

बाहेर प्रकटतां तत्काळ ॥ पुच्छें उडवूनियां देऊळ ॥ आकाशीं भिरकाविलें सकळ ॥ जेवीं बाळ कंदुक टाकी ॥७२॥

देवालय विदारूनी ॥ देविसहित समुद्रजीवनीं ॥ टाकितां राक्षसीं मिळूनी ॥ अंजनीतनय वेढिला ॥७३॥

खालीं रामसौमित्र उतरले ॥ श्रीराम कोदंड चढविलें ॥ अचळ ठाण मांडिलें ॥ बाण लाविला चापासी ॥७४॥

महिरावणास म्हणे रघुनंदन ॥ कपटिया साहें माझे बाण ॥ तुझी वाट पाहतो अहिरावण ॥ तुज धाडीन त्याजपासी ॥७५॥

तों राक्षसें धनुष्य ओढून ॥ रामावरी सोडिले बाण ॥ रघुनाथें शिर छेदोन ॥ क्षणमात्रें टाकिलें ॥७६॥

नरवीरश्रेष्ठ रघुनंदन ॥ महिवरी सोडीत शत बाण ॥ त्याचे लल्लाटीं जाऊन ॥ एकपंक्ती बैसले ॥७७॥

परी नवल वर्तलें अद्भुत ॥ रुधिर बिंदु खालीं पडत ॥ त्याचे महिरावण होत ॥ एकसारिखे सर्वही ॥७८॥

लक्षांच्या लक्ष महिरावण ॥ त्यावरी राम टाकी बाण ॥ त्यांचिया रक्तबिंदुंपासून ॥ कोट्यनुकोटी निपजती ॥७९॥

तितुकेही रामावरी असुर ॥ करिते जाहले शस्त्रमार ॥ मग घाय टाळित रघुवीर ॥ चकित पाहे चहूंकडे ॥१८०॥

मग बोले चापपाणी ॥ वैरी वधावे शस्त्रेंकरूनी ॥ तंव आगळेचि होती ते क्षणीं ॥ न कळे करणी कैसी हे ॥८१॥

तंव तो निर्वाणीचा भक्त ॥ वज्रदेही वीर हनुमंत ॥ दृष्टी देखोनि विपरीत ॥ चिंताक्रांत पडियेला ॥८२॥

मग तो लोकप्राणेशनंदन ॥ मगरीपासी आला उठोन ॥ तीस पुसे वर्तमान ॥ समूळ महिरावणाचें ॥८३॥

ती म्हणे रंभा देवांगना ॥ जात होती इंद्र भुवना ॥ तंव भृगुऋषि जाणा ॥ तिणें अकस्मात देखिला ॥८४॥

त्यासी नाही केले नमन ॥ म्हणे हा कुरूप वृद्ध ब्राह्मण ॥ तंव तो महाराज तपोधन ॥ दिधला शाप दारुण तीतें ॥८५॥

म्हणे तूं सर्पिणी होऊनी ॥ विचरें सदा घोर वनीं ॥ धांवून येरी लागे चरणीं ॥ म्हणे मज उःशाप देईंजे ॥८६॥

येरू म्हणे तूं होशील सर्पिणी ॥ क्षणएक दिससी पद्मिणी ॥ एकदां सूर्यरेत पडतांक्षणी ॥ जासी उद्धरून निजपदा ॥८७॥

मग अहिरूप हिंडे वनीं ॥ क्षणएक जाहली असे पद्मिणी ॥ तों सूर्याचें विर्य वरूनी ॥ अकस्मात वर्षलें ॥८८॥

अहिंचे मुखीं वीर्य पडत ॥ तो अहिरावण जाहला अद्भुत ॥ महीवरी पडलें जे रेत ॥ महिरावण तोचि जाहला ॥८९॥

रंभा गेली उद्धरून ॥ परी रक्तबिंदूंचे होती महिरावण ॥ हें चंद्रसेनेस वर्तमान ॥ जाऊनियां पुसावें ॥१९०॥

अहिरावणाची पत्नी ॥ चंद्रसेना ते सत्यवचनीं ॥ हें हनुमंतें ऐकोनी ॥ उडे गगनीं अकस्मात ॥९१॥

महिकावतीस येऊनी ॥ प्रवेशला तेव्हां राजसदनीं ॥ तों चंद्रसेना बैसली ध्यानीं । चापपाणी आठवित ॥९२॥

दृष्टीं देखोनि रघुवीर ॥ तीस वाढला कामज्वर ॥ म्हणे श्रीरामाऐसा भ्रतार ॥ जन्मोजन्मी भोगावा ॥९३॥

त्चाचि वेधेंकरून जाण ॥ तीस लागलें श्रीरामध्यान ॥ सकळ विसरली देहभान ॥ गुंतले मन राघवीं ॥९४॥

तंव तीजजवळी आला हनुमंत ॥ बळें हस्तटाळिया वाजवित ॥ येरी नेत्र उघडोनि पाहत ॥ तंव तो रामदूत देखिला ॥९५॥

हनुमंते करूनि नमन ॥ सांगे सर्व वर्तमान ॥ पुराणपुरुष रघुनंदन ॥ परम संकटीं पडियेला ॥९६॥

येरी म्हणे हें वर्तमान ॥ तुज अवघे मी सांगेन ॥ माझा मनोरथ पूर्ण ॥ जरी तूं सिद्धी पावविसी ॥९७॥

रामप्रिय म्हणे अवश्य ॥ येरी म्हणे देईं भाष ॥ पुढील कार्य जाणोनि विशेष ॥ प्रमाण दिधलें हनुमंतें ॥९८॥

येरी म्हणे ऐक वचन ॥ सुरतसुखें रघुनंदन ॥ एकदां तरी भोगीन ॥म्हणोनि भाष घेतली ॥९९॥

आतां रामासी होईल जय प्राप्त ॥ तो ऐका सावध वृत्तांत ॥ महिरावणें तप अद्भुत ॥ करूनि शिव तोषविला ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP