संसारमाया टाकून ॥ संत स्वरूपीं होती लीन ॥ तैसी लंका उपेक्षून ॥ चालिली शरण रामचंद्रा ॥१॥
परम वेगें ते वेळीं ॥ आली श्रीरामसभेजवळी ॥ कृपाब्धीस भेटों आली ॥ पुण्यगंगा सुलोचना ॥२॥
कीं संतांचिया गृहाप्रती ॥ विश्रांतीस येई शांती ॥ तैसा शेषकन्या झाली येती ॥ सीतापति लक्षूनियां ॥३॥
कनकाद्रीभोंवते तरुवर ॥ तैसे राघवावेष्टित वानर ॥ कोटिकंदर्पलावण्यसुंदर ॥ अवनिजावर देखिला ॥४॥
भोंवते कपी यंत्राकार ॥ उभे असती जोडूनि कर ॥ मध्यें रघुनाथपीठ पवित्र ॥ विराजमान घवघवित ॥५॥
अवनीखालीं उतरूनि जाणा ॥ मनीं आठवी कैलासराणा ॥ हंसगती चाले सुलोचना ॥ शेषकन्या चतुर जे ॥६॥
एक धांवोनि वानर येती ॥ हर्षे श्रीरामासी सांगती ॥ रावणें पाठविली सीता सती ॥ भयभीत होऊनियां ॥७॥
मग बोले चापपाणी ॥ रावण पडिला नाही जों रणीं ॥ तोंवरी जनकनंदिनी ॥ दृष्टी न पडे तुमच्या पैं शेषकुमरी जवळी देखोन ॥
बिभीषणाकडे पाहे रघुनंदन ॥ तों तेणें आंसुवे भरलें नयन ॥ सद्रद कंठ जाहला ॥९॥
म्हणे जगद्वंद्या राजीवनेत्रा ॥ ही शक्रजितललना परम पवित्रा ॥ इचें नाम घेतां विषकंठमित्रा ॥ सर्व दोष हरतील ॥११०॥
कर्मगति परम गहन ॥ जिचे अंगुष्ठीं न पडे सूर्यकिरण ॥ शेषकन्या सुकुमार पूर्ण ॥ आली धांवून शिरालागीं ॥११॥
तों सुलोचनेनें जवळ येऊन ॥ विलोकून श्रीरामध्यान ॥ जयजयकारें लोटांगण ॥ राघवाचरणीं घातलें ॥१२॥
श्रीरामचरणकमळावरी ॥ शेषकन्या जाहली भ्रमरी ॥ ज्याचे चरणजरें निर्धारीं ॥ पद्मजाततनया उद्धरली ॥१३॥
दरिद्रियास सांपडे धन ॥ कीं जन्मांधासी आले नयन ॥ कीं जलद ओळतां देखोन ॥ मयूर जैसा आनंदे ॥१४॥
कीं पूरीं वाहोन जातसे ॥ त्यास प्राणसखा लावी कांसे ॥ कीं योगी पावे वृत्तिदशे ॥ निजमन जिंकोनियां ॥१५॥
तैसा देखोन श्रीरामचंद्र ॥ उल्हासे सुलोचनाचित्तचकोर ॥ कीं रघुनाथ होय दिनकर ॥ कमळिणी ते सुलोचना ॥१६॥
संसारतापें तापोनी ॥ दृढ जडली श्रीरामचरणीं ॥ तेथोनी उठावयासी मनीं ॥ आळस येतसे सुलोचने ॥१७॥
आतां हे सुख सांडोनी ॥ पुढती काय पहावें नयनीं ॥ सुलोचना मस्तक म्हणोनी ॥ पायांवरूनि उचलीना ॥१८॥
जैसा सुधारस गाळी इंदु ॥ तैसा बोले कृपासिंधु ॥ जो जगदीश दीनबंधु ॥ लाविला वेधु त्रिनेत्रासी ॥१९॥
म्हणे माते उठीं वो झडकरी ॥ परम श्रमलीस संसारीं ॥ आतां सुखीं राहें परत्रीं ॥ अक्षय सुख भोगीं तूं ॥१२०॥
ऐसें ऐकोनि झडकरी ॥ उभी ठाकली शेषकुमरी ॥ पाणिद्वय जोडूनि ते अवसरीं ॥ स्तवन करी सद्भावें ॥२१॥
म्हणे जयजय रामा विषकंठमित्रा ॥ रघूत्तमा राजीवनेत्रा ॥ जलदवर्णा चारुगात्रा ॥ मित्रकुळमुगुटमणे ॥२२॥
जगद्वंद्या जगन्नायका ॥ जनकजापति जगद्रक्षका ॥ जन्ममरणभयमोचका ॥ जनकजामाता जगद्रुरु ॥२३॥
जामदग्न्यजिता जलजनयना ॥ जगदीश्वरा जलदवर्णा ॥ जगद्यापका दुःखहरणा ॥ जन्मजरारहित तूं ॥२४॥
पुराणपुरुषा रघुनंदना ॥ भक्तवत्सला जगन्मोहना ॥ मायाचक्रचालका निरंजना ॥ निष्कलंका निर्गुण तूं ॥२५॥
आनंदअयोध्यापुरविहारा ॥ वेदवंद्या वेदसारा ॥ परम उदारा रघुवीरा ॥ अहल्योद्धारा मखपाळका ॥२६॥
जयजय रामा विश्वपाळणा ॥ विश्वव्यापका विश्वकरणा ॥ विश्वचाळका जगज्जीवना ॥ विश्वरक्षणा विश्वेशा ॥२७॥
विबुधललाटपटलेखना ॥ सनकसनंदनमनरंजना ॥ हे रघुवीर दानवदलना ॥ भवभंजना भवहृदया ॥२८॥
मंगलरूपा मंगलकारका ॥ जय मंगलजननी उद्धारका ॥ मंगलभगिनीप्राणनायका ॥ मंगलसहिता मंगलधामा ॥२९॥
कमलोद्भवजनका कमलनयना ॥ कमलानायका कमलशयना ॥ कमलनाभा कमलवदना ॥ कमलसदना कमलप्रिया ॥१३०॥
नमो भववारणपंचानना ॥ नमो पापरण्यकुठारतीक्ष्णा ॥ हे श्रीरामा त्रिविधतापशमना ॥ अनंतशयना अनंता ॥३१॥
तुज स्तवावया चापपाणी ॥ न चले सहस्रवदनाची वाणी ॥ नेति नेति म्हणूनी ॥ आगम जेथें तटस्थ ॥३२॥
तेथें एकजिव्हेचे स्तवन ॥ मांडेल माझें कोठोन ॥ जैसें भागीरथीस मज्जन ॥ थिल्लरोंदके मांडिलें ॥३३॥
पितळेचें पुष्प नेऊन ॥ केलें कनकाद्रीचें पूजन ॥ कीं जलार्णवासी अर्ध्यदान ॥ कूपोदके करावें ॥३४॥
अर्कास वाहिलें अर्कीसुमन ॥ मलयानिलासी अंचलपवन ॥ किंवा क्षीराब्धीपुढें नेऊन ॥ तक्र जैसे समर्पिलें ॥३५॥
केवी होय धरेचे वजन ॥ स्तंभ कैंचा टेंकावया गगन ॥ सप्तसमुद्रींचें जीवन ॥ टिटवीस केवीं मोजवे ॥३६॥
सकळप्रकाशनिशाकर ॥ त्यास दशी वाहिली अणुमात्र ॥ कीं धत्तूरपुष्पीं उमावर ॥ दरिद्रियानें पूजिला ॥३७॥
तुझें देखतांचि चरण ॥ तुटलें देहत्रयबंधन ॥ मन होऊन ठेलें उन्मन ॥ जन्ममरण तुटलें असे ॥३८॥
घागरीं आणि रांजणी ॥ एकचि बिंबला वासरमणी ॥ तैसा स्त्रीपुरुष अभिधानी ॥ चापपाणि व्यापक तूं ॥३९॥
तरी या स्त्रीदेहाची आकृती ॥ शक्रजिताची अंगना म्हणती ॥ पतिशिरासवें रघुपती ॥ अग्नीमाजीं घालिजे ॥१४०॥
तूं अयोध्याधीश उदारा ॥ अनाथ याचक मी मार्ग शिरा ॥ मी चातक तूं जलधरा ॥ कृपानिधी वर्षें कां ॥४१॥
जेव्हां उदया पावे गभस्ति ॥ तेव्हां चक्रवाकें मिळती ॥ तैसेंच आतां करी रघुपती ॥ मित्रुळप्रकाशका ॥४२॥
क्षीर आणि जळ ॥ वेगळें काढिती मराळ ॥ तैसा श्रीराम तमालनील ॥ भवपुरींहूनि काढीं कां ॥४३॥
पतीचें ऐकिलें वर्तमान ॥ तेव्हांच गेले माझे पंचप्राण ॥ परी शिराचें निमित्त करून ॥ तुझे चरण पाहूं आल्ये ॥४४॥
तूं चित्तपरीक्षक रघुनाथ ॥ जाणसी सर्वांचे मनोगत ॥ ऐसें सुलोचना म्हणत ॥ जगन्नायक तटस्थ जाहला ॥४५॥
म्हणे धन्य धन्य सहस्रवदन ॥ ऐसें उदरीं जन्मलें रत्न ॥ कीं भोगींद्राचें तप पूर्ण ॥ कन्यारूपें प्रगटलें ॥४६॥
सुलोचनेचें चातुर्य देखोन ॥ कपी सकळ तुकाविती मान ॥ श्रीरामासी म्हणे मित्रनंदन ॥ ईतें शिर देऊनि बोळवा ॥४७॥
जांबुवंत म्हणे हे पुण्यसरिता ॥ अंगद म्हणे धन्य पतिव्रता ॥ मारुति म्हणे इचें नाम घेतां ॥ पाप नुरें सहसाही ॥४८॥
सायुज्यता मुक्तिसमवेत ॥ इयेसी शिर द्यावें जी त्वरित ॥ असो यावरी जनकजामात ॥ पुसे दशकंठस्नुषेतें ॥४९॥
आम्हीं येथें आणिलें शिर ॥ तुज केवीं कळला समाचार ॥ येरी म्हणे पतीच्या करें ॥ पत्र लिहून दिधले ॥१५०॥