श्रीगणेशाय नमः श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
आळसी कदा उदीम न करी ॥ नवजाय मंदिराबाहेरी ॥ तो जगन्निवास साहाकारी ॥ घरींच निर्धारी भाग्यें आला ॥१॥
मृत्तिका खणावया जात ॥ तों मांदुस सांपडे अकस्मात ॥ तैसें आम्हांसी जाहले यथार्थ ॥ सद्रुरुनाथप्रसादें ॥२॥
अभ्यास न करितां बहुवस ॥ सांपडली रामविजयमांदुस ॥ मग गगनीं न माय हर्ष ॥ उपरति जाहली ॥३॥
मांदुस उघडोनि जो न्याहाळी ॥ तों आंत होती सात कोळळी ॥ तीं हीं सप्तकांडें रसाळी ॥ एकाहूनि एक विशेष ॥४॥
कोहळीं न्याहाळून जंव पाहत ॥ तंव दिव्य नाणीं दीप्तियुक्त ॥ भक्ति ज्ञान वैराग्ययुक्त ॥ घवघवीत विराजती ॥५॥
चतुर श्रोते ज्ञानसंपन्न ॥ ते बंधु आले जवळी धांवोन ॥ म्हणती आम्हांस वांटा दे समान ॥ मांडलें भांडण प्रेमभरें ॥६॥
म्हणती हीं वाल्मीकाचीं कोहळी ॥ तुज पूर्वभाग्यें लाधली ॥ तरी वाटा आम्हास ये वेळी ॥ देईं सर्वांसी सारिखा ॥७॥
मग चतुर संतजन ॥ श्रवणपंक्तीं बैसले समान ॥ कोळीं त्यापुढें नेऊन ॥ एकसरे रिचविली ॥८॥
मग त्यांही कर्णद्वारें उघडोन ॥ हृदयभांडारीं सांठविलें धन ॥ श्रोते वक्ते सावधान ॥ निजसुख पूर्ण पावले ॥९॥
पांच कोहळीं दाविली फोडून ॥ सहावें युद्धकांड विशाळ गहन ॥ असो गताध्यायीं कथा निरूपण ॥ राघवें रावण निर्भर्त्सिला ॥१०॥
छत्र मुकुट टाकिले छेदून ॥ अपमान पावला रावण ॥ मग लंकेत परतोन ॥ चिंतार्णवी बुडाला ॥११॥
जैसा राहुग्रस्त निशाकर ॥ कीं काळवंड दग्ध कांतार ॥ कपाळशूळें महाव्याघ्र ॥ तैसा दशकंठ उतरला ॥१२॥
नावडे छत्र सिंहासन ॥ जें जें पाहूं जाय रावण ॥ तें तें रामरूप दिसे पूर्ण ॥ नाठवे आन पदार्थ ॥१३॥
सभेसी बैसला रावण ॥ अत्यंत दिसे कळाहीन ॥ महोदराप्रति वचन ॥ बोलता जाहला ते वेळां ॥१४॥
म्हणे कैसा विपरीत काळ ॥ मक्षिकेनें हालविला भूगोळ ॥ चित्रींच्या सर्पे खगपाळ ॥ गिळिला नवल वाटतें ॥१५॥
खद्योततेजेंकरून ॥ आहाळोनि गेला चंडकिरण ॥ तैसा मी आजि रावण ॥ युद्धीं पावलों पराजय ॥१६॥
मग बोलती प्रधान ॥ आतां उठवावा कुंभकर्ण ॥ तो रामसौमित्रांसहित सैन्य ॥ गिळील क्षण न लागतां ॥१७॥
ती रावणासी मानली मात ॥ म्हणे घटश्रोत्रासी उठवा त्वरित ॥ मग विरूपाक्ष महोदार निघत ॥ दहा सहस्र राक्षस घेऊनियां ॥१८॥
मद्यखाला चारी सहस्र ॥ कुंजरीं घातल्या सत्वर ॥ तैसेच पशू घेतले अपार ॥ अन्नाचे पर्वत घेऊनियां ॥१९॥
वाद्यें वाजविती भयासुर ॥ गजरेंसी पावले सत्वर ॥ देखोनि भयानक शरीर ॥ कंप सुटला राक्षसां ॥२०॥
वनगज म्हैसे तरस ॥ नासिकांत गुंतले बहुवस ॥ टाकितां श्वासोच्छ्वास ॥ निर्गम नव्हे तयांसी ॥२१॥
सवा लक्ष गांवे खोल ॥ सरितापतीचें तुंबळ जळ ॥ तें नाभिप्रमाण केवळ ॥ कुंभकर्णासी होय पैं ॥२२॥
असो राक्षस सर्व मिळती ॥ द्वारीं एकदांचि हांका फोडिती ॥ सकळ वापी कूप आटती ॥ महागजरेंकरूनियां ॥२३॥
स्वर्गापर्यंत ऐको जाती ॥ ऐशा कर्णीं भेरी त्राहाटिती ॥ उरावरी गज चालविती ॥ परी जागा नोहे सर्वथा ॥२४॥
एक गगनचुंबित वंश घेऊन ॥ नासिकीं चढविती पूर्ण ॥ एक नाकपुडी अवरोधून ॥ श्वासोच्छ्वास कोंडिती ॥२५॥
एक वृक्ष पाषाण घेती ॥ वर्मस्थळीं बळें ताडिती ॥ कडू तीक्ष्ण औषधें ओतिती ॥ नासिकापुटीं नेऊनियां ॥२६॥
उपाय केले बहुत पूर्ण ॥ परी जागा नोहेच कुंभकर्ण ॥ मग विरूपाक्षें किन्नरी आणून ॥ कर्णांमाजी बैसविल्या ॥२७॥
त्यांचे परम सुस्वर गायन ॥ ऐकतां शेष येईल धांवोन ॥ मग जागा होऊन कंभकर्ण ॥ सावधान बैसला ॥२८॥
जांभई दिधली भयानक ॥ मद्य प्राशिलें सकळिक ॥ दाढेखालीं पशू देख ॥ अपार घालून रगडिले ॥२९॥
अन्नमांसाचे पर्वत ॥ गिळिले राक्षसें तेव्हां बहुत ॥ मग नेत्र पुसोन पहात ॥ प्रधानांकडे ते काळीं ॥३०॥
तंव ते प्रणिपात करून ॥ सांगते झाले सर्व वर्तमान ॥ सीता आणिली हिरून ॥ तेथून सर्व कथियेलें ॥३१॥
हनुमंत लंका जाळून ॥ रामसौमित्रां आला घेऊन ॥ कालचे युद्धीं रावण ॥ पराजय पावला ॥३२॥
रावण परम चिंताक्रांत ॥ यालागीं तुम्हां उठविलें त्वरित ॥ मांडला बहुत कल्पांत ॥ आटले समस्त राक्षस ॥३३॥
उभा ठाकला कुंभकर्ण ॥ म्हणे ऐसाचि रणा जाईन ॥ मग विनवीती प्रधान ॥ राजदर्शन घेइंजे ॥३४॥
सभेसी चालिला कुंभकर्ण ॥ लंकादुर्ग त्यासी गुल्फप्रमाण ॥ वाटे आकाशासी लाविले टेंकण ॥ विमानें सुरगण पळविती ॥३५॥
लंकावेष्टित जे वानर ॥ ते तेथून पळाले समग्र ॥ देखोनि कुंभकर्णाचें शरीर ॥ कपी मूर्च्छित पडियेले ॥३६॥
रामासी म्हणे बिभीषण ॥ स्वामी हा उठविला कुंभकर्ण ॥ आश्चर्य करी रघुनंदन ॥ शरीर देखोन तयाचें ॥३७॥
बिभीषण म्हणे ते काळीं ॥ रामा याचिया जन्मकाळीं ॥ प्रळय वर्तला भूमंडळी ॥ हांक वाजली चहूंकडे ॥३८॥
मातेचिया उदरांतून ॥ भूमीसी पडला कुभकर्ण ॥ तीस सहस्र स्त्रिया जाण ॥ वदन पसरून गिळियेल्या ॥३९॥
इंद्राचा ऐरावत धरूनि ॥ येणें आपटिला धरणीं ॥ ऐरावतीचे दांत मोडूनि ॥ इंद्रासी येणें ताडिले ॥४०॥
शक्रें वज्र उचलोनि घातलें ॥ याचें रोम नाहीं वक्र जाहलें ॥ यासी निद्राआवरण पडलें ॥ म्हणोनि लोक वांचले हे ॥४१॥
असो कुंभकर्ण दृष्टीं देखोन ॥ हिमज्वरें व्यापले वानरगण ॥ एक मुरकुंडी वळून ॥ दांतखिळिया बैसल्या ॥४२॥
भोंवतें पाहे चापपाणी ॥ तों भयभीत वानरवाहिनी ॥ सर्वांचें अंतर जाणोनी ॥ मारुतीकडे पाहिलें ॥४३॥
तो निमिषांत हनुमंत ॥ अकस्मात गेला लंकेत ॥ कुंभकर्ण सभेसी जात ॥ तंव अद्भुत केलें वायुसुतें ॥४४॥
कुंभकर्ण तये वेळां ॥ कटीपर्यंत उचलिला ॥ राम आणि कपि डोळां ॥ तटस्थ होऊन पाहाती ॥४५॥
मद्यपानें कुंभकर्ण ॥ अत्यंत गेलासे भुलून ॥ आपणास उचलितो कोण ॥ हेंही त्यासी नेणवे ॥४६॥
मग तों सीताशोकहरण ॥ पुढती उचलून कुंभकर्ण ॥ भुजाबळें भोवंडून ॥ टाकीत होता सुवेळेसी ॥४७॥
मागुती केले अनुमान ॥ म्हणे गगनीं देऊं भिरकावून ॥ कीं लंकेवरी आपटून ॥ चूर्ण करूं सकळही ॥४८॥
मग म्हणे नव्हे हा विचार ॥ लंका चूर्ण होईल समग्र ॥ मग तो बिभीषण नृपवर ॥ नांदेल कैसा ये स्थळीं ॥४९॥
सुवेळेसी द्यावा टाकून ॥ तरी वानर होतील चूर्ण ॥ भूमंडळीं आपटूं धरून ॥ तरी धरा जाईल पाताळा ॥५०॥