श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
उकलोनी कमलोद्भवाचें पत्र ॥ वाचिता जाहला सौमित्र ॥ सावध ऐके राजीवनेत्र ॥ सूर्यपुत्रादि कपि सर्वही ॥१॥
अनंतकोटीब्रह्मांडनायका ॥ हे दयार्णवा विश्र्वपाळका ॥ वैकुंठपते विश्र्वव्यापका ॥ मम जनका श्रीवल्लभा ॥२॥
हे राम सकळबंधछेदका हे राम साधुप्रतिपाळका ॥ दुष्टरजनीचरसंहारका ॥ जानकीनायका जगद्रुरो ॥३॥
हे राम जगदंकुरमूळकंदा ॥ साधुहृदयारविंदमिलिंदा ॥ निजजनचातकजलदा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥४॥
संसारगजविदारक मृगेंद्रा ॥ दुःखपर्वतभंजन वज्रधरा ॥ निजभक्तचकोर सुधाकरा ॥ अतिउदारा सीताधवा ॥५॥
त्रिभुवनजनका दुःखहरणा ॥ जनकजामाता जनपाळणा ॥ जनकजापते जलजनयना ॥ जलदवर्णा जगत्पते ॥६॥
जय जय राम वेदोद्धारका ॥ कमठरूपासृष्टिपाळका ॥ नमो सकळ दैत्यांतका ॥ वराहवेषा दीनबंधू ॥७॥
नमो हिरण्यकश्यपमर्दना ॥ नमो त्रिविक्रम बलिबंधना ॥ नमो ब्राह्मणकुळपाळणा ॥ भार्गवकुठदिवाकरा ॥८॥
नभो पौलस्तिकुलविपिनदहना ॥ मीनकेतनाहिरहृदयजीवना ॥ नमो चतुर्दशलोकपाळणा ॥ मखरक्षणा रघुवीरा ॥९॥
जय जय विश्र्वपाळणा ॥ विश्र्वव्यापका विश्र्वकारणा ॥ विश्र्वमतिचाळका विश्र्वजीवना ॥ विश्र्वरक्षणा विश्र्वेशा ॥१०॥
नमो मायाचक्रचाळका ॥ नमो अज्ञानतिमिरांतका ॥ नमो वेदरूपा वेदपाळका ॥ वेदस्थापका वेदवंद्या ॥११॥
नमो कमलनाभा कमलजीवना ॥ नमो पापारण्यकुठारतीक्ष्णा ॥ नमो त्रिविधदाहतापशमना ॥ अनंतशयना अनंता ॥१२॥
नमो दशावतारचरित्रचाळका ॥ नमो अनंतब्रह्मांडनायका ॥ नमो अनंतवेषकारका ॥ ताटिकांतका पापहरणा ॥१३॥
नमो जननमरणरोगवैद्या ॥ सच्चिदानंदा स्वसंवेद्या ॥ मायातीता जगवंद्या ॥ भेदाभेदातीत तूं ॥१४॥
नमो सर्गस्थित्यंताकारका ॥ नमो कैवल्यपददायका ॥ अज अजित सर्वात्मका ॥ करुणालया सुखाब्धे ॥१५॥
जय जय षड्विकाररहिता ॥ नमो षड्गुणअलंकृता ॥ अरिषड्वर्गच्छेदप्रतापवंता ॥ शब्दातीता निरंजना ॥१६॥
तूं निर्विकार निरंजन ॥ आम्हांलागीं जाहलासि सगुण ॥ बंदींचे सोडवावे सुरगण ॥ पिशिताशन वधोनियां ॥१७॥
पितृवचनाचें करूनि व्याज ॥ कानना आलासी रघुराज ॥ पंचवटीस राहून सहज ॥ बहुत राक्षस वधियेले ॥१८॥
दशमुखें केलें सीताहरण ॥ त्याचे करावया गवेषण ॥ म्हणोनि किष्किंधेसी आगमन ॥ जाहलें तुझें श्रीरामचंद्रा ॥१९॥
शुद्धीलागीं रुद्रावतार ॥ अंजनीहृदयारविंदभ्रमर ॥ जो ब्रह्मांडासी देणार धीर ॥ तरला सागर निमिषार्धें ॥२०॥
अगाध मारुतीचे उड्डाण ॥ बहुतीं वाटेस केलें विघ्न ॥ परी तो अनिवारकिराण ॥ कोणासही नाटोपे ॥२१॥
पडलंकेसी येऊन हनुमंत ॥ राक्षसी संहारिल्या बहुत ॥ प्रवेशला क्रौंचेच्या मुखांत ॥ दांतांस दांत मेळवीं जों ॥२२॥
उदर फोडोनि आला बाहेर ॥ मग शोधिलें निकुंभिलानगर ॥ सुलोचना देखोनि सुंदर ॥ म्हणे हेचि होय जानकी ॥२३॥
तिजवरी घालावया पाषाण ॥ सिद्ध जाहला वायुनंदन ॥ मग तिचे शब्द पसिसतां पूर्ण सीता नव्हे कळलें हें ॥२४॥
मग अणुप्रामाण होऊन ॥ प्रवेशला लंकाभुवन ॥ विटंबिले सकळजन ॥ करूनि नग्न बिदीसी ॥२५॥
पत्र ऐकतां जनकजापती ॥ म्हणे धन्य धन्य वीर मारुती ॥ अद्भुत कर्तव्य अगाध शक्ति ॥ त्रिजगतीं ऐसा नाहीं ॥२६॥
ऐकोनियां विनोदरीती ॥ वानर गदगदां हांसती ॥ एकावरी एक पडती ॥ मुरकुंड्या वळती ऐकतां ॥२७॥
नाना वस्तु उत्तम आणून ॥ वानर टाकिती ओवाळून ॥ एक सप्रेमें हृदयीं धरून ॥ म्हणती धन्य बलाढ्य तूं ॥२८॥
पत्र वाचितां लक्ष्मण ॥ क्षणक्षणां करी हास्यवदन ॥ मागुती तटस्थ झाले हरिगण ॥ पत्र पुढें परिसती ॥२९॥
शोधिलें बिभीषणाचें घर ॥ कीर्तन ऐकोनि झाला निर्भर ॥ मग कुंभकर्णाचें मंदिर ॥ देखोनिया कंटाळला ॥३०॥
रावणस्त्रिया ऐशीं सहस्र ॥ तितुक्या शोधूनि वायुकुमर ॥ राक्षससभा विटंबिली समग्र ॥ तें अगाध चरित्र न वर्णवे ॥३१॥
रावणसेजे मंदोदरी ॥ म्हणे हीच होईल सीता सुंदरी ॥ तंव ते झाले घाबरी ॥ दुष्ट स्वप्न देखोनियां ॥३२॥
दशकंठास सांगे वर्तमान ॥ विषकंठप्रिय रघुनंदन ॥ त्याची सीता द्याहो सोडून ॥ परी रावण न मानी तें ॥३३॥
सीता पहावया पाठविली दूती ॥ तिच्या मागें गेला मारुती ॥ तों अशोकवृक्षातळीं सीता सती ॥ देखोनि कपि नमितसे ॥३४॥
पुढें मुद्रिका ठेवून ॥ वृक्षावरी बैसला एक क्षण ॥ अपार राक्षसी झोडून ॥ पाडिल्या तेथें पराक्रमें ॥३५॥
मुद्रिका देखोनि सीता सती ॥ शोकसमुद्रीं करी वस्ती ॥ मग पुढें येऊन मारुती ॥ प्रत्यक्ष भेटला तेधवां ॥३६॥
सांगितलें सकळ वर्तमान ॥ मग क्षुधेचें मिष करून ॥ विध्वंसिलें अशोकवन ॥ जें विस्तीर्ण तीस योजनें ॥३७॥
रावणे पाठविला दळभार ॥ त्याचा तेक्षणीं केला संहार ॥ मारूनि रावणाचे पुत्र ॥ शक्रजित विटंबिला ॥३८॥
मग म्यां हनुमंतासी प्रार्थून ॥ ब्रह्मपाशीं नेला बांधोन ॥ रावणासी शब्दशस्त्रेंकरून ॥ सभेसी निर्भत्सिलें हनुमंतें ॥३९॥
मारुतीस मारावया सत्वर ॥ पुच्छासी लाविला वैश्र्वानर ॥ स्नेहेंसहित वस्त्रें अपार ॥ गुंडाळोनी साक्षेपें ॥४०॥
पुच्छ पेटतां सत्वर ॥ उडोनि गेला वायुपुत्र ॥ तृतीय भाग लंकानगर ॥ जाळिलें क्षण न लागतां ॥४१॥
परी नवल वर्तलें अद्भुत ॥ लंका सुवर्णमय जाहली समस्त ॥ धन्य तो लोकाप्राणेशसुत ॥ थोर सामर्थ्य दाविलें ॥४२॥
मग सागरीं पुच्छ विझवून ॥ पुन्हां घेतलें जानकीचें दर्शन ॥ जैसें बाळ खेळतां श्रमून ॥ जननीपाशीं येत पैं ॥४३॥
ऐसें वाचतांचि सौमित्र ॥ ऐकतां घनश्यामगात्र ॥ रामें धावूनि वायुपुत्र ॥ हृदयीं धरिला सप्रेमें ॥४४॥
धन्य धन्य ते अंजनी ॥ ऐसें रत्न प्रसवली सद्रुणी ॥ मारुतीचें मुख कुरवाळोनी ॥ निजासनीं राम बैसे ॥४५॥
किष्किंधेहूनी रत्नें आणूनि ॥ ओवाळित मारुतीवरूनि ॥ म्हणे धन्य मारुतात्मज अवतारोनी ॥ ब्रह्मांड भरलें कीर्तीनें ॥४६॥
धन्य धन्य तो दिवस ॥ स्वामी स्वमुखें गौरवी विशेष ॥ तुच्द त्यापुढें सुधारस ॥ स्वर्गभोग सर्वही ॥४७॥
असो यावरी चापपाणी ॥ हृदयीं धरी दिव्यमणी ॥ श्रीरामासी वाटलें ते क्षणीं ॥ कीं जनकजा आणिली हनुमंतें ॥४८॥
म्हणे धन्य मारुती स्नेहाळा ॥ मज भेटविली जनक बाळा ॥ तुझा प्रताप उजळला ॥ निराळमंडपि अवघाचि ॥४९॥
एवढा सागर उल्लंघूनी ॥ जानकी आलासी घेऊनी ॥ तुवां उपकारऋणेंकरूनी ॥ मज बांधिले हनुमंता ॥५०॥