गरगरां पुच्छ तये वेळां ॥ भवंडितां झळकती प्रळयज्वाळा ॥ राक्षस करूनियां गोळा ॥ पुच्छाग्नींत भस्म करी ॥१॥
सभा सांडोनि पळती असुर ॥ हनुमंत म्हणे उभे स्थिर ॥ मज सोडवा तुम्ही समग्र ॥ म्हणोनि भेटे तयांतें ॥२॥
शतांचीं शतें ते क्षणीं ॥ यामिनीचर पुच्छें बांधोनी ॥ रावणापाशीं आणी ओढोनी ॥ म्हणे कां हे पळताती ॥३॥
असो सीतेसी राक्षसी सांगत ॥ तुझा वानर मेला गे यथार्थ ॥ ऐकतां जानकी शोक करीत ॥ म्हणे विपरीत केवीं घडे ॥४॥
मशकें सागर शोषिला ॥ जंबुकांनीं सिंह केवीं धरिला ॥ खद्योतांनी सूर्य पाडिला ॥ खालीं कैसा आसडोनी ॥५॥
वज्र भंगलें लागतां कमळ ॥ पतंगें ग्रासिला वडवानळ ॥ भोगींद्राचें फणिमंडळ ॥ वटबीजभारें दडपलें ॥६॥
मक्षिकेच्या पक्षवातेंकरूनी ॥ प्रळयमेघ गेला विदारूनी ॥ पिपीलिकाभारें कोसळोनी ॥ कनकाद्रि कैसा पडियेला ॥७॥
पुष्पहार पडतां सृष्टीं ॥ केवीं दणाणे कूर्मपृष्ठी ॥ चित्रींच्या लेपें उठाउठी ॥ प्रळयचपळा ग्रासिली ॥८॥
असो रुद्रावतार हनुमंत ॥ तो राक्षसीं जाळिला अग्नींत ॥ कैसी घडली ही मात ॥ विचारीत राघवप्रिया ॥९॥
जठराग्नीस सीता पुसत ॥ तो म्हणे क्षेम आहे हनुमंत ॥ नगर मी जाळीन समस्त ॥ बंधुसाह्याकारणें ॥११०॥
असो इकडे समस्त असुर ॥ हनुमंतावरी करिती शस्त्रमार ॥ तों पुच्छग्नि धडकला थोर ॥ पळती असुर चहूंकडे ॥११॥
नानाशस्त्रें बाण शक्ती ॥ दुरोनि कपींद्रावरी टकिती ॥ मग मिष घेऊन मारुती ॥ गतप्राण पडियेला ॥१२॥
मूर्च्छित पडतांचि वानर ॥ जवळी धांविन्नले असुर ॥ जो तो म्हणे म्यां घाय थोर ॥ वर्मीं पाहून दीधला ॥१३॥
म्हणोनि मेला हा वानर ॥ जो तो म्हणे हा प्रचंड वीर ॥ सांगती रावणासी बडिवार ॥ सुखें निद्रा करीं आतां ॥१४॥
मेलिया सारिखें मिष घेऊनी ॥ दोन घटिका पडिला मेदिनीं ॥ राक्षस बहुत मिळोनी ॥ सभोंवते विलोकिती ॥१५॥
फेंस वाहतसे वदनीं ॥ वैद्य नाडी पाहती विलोकुनी ॥ म्हणती केवढा पुरुषार्थ करूनी ॥ वानर शेवटीं मेला हो ॥१६॥
ऐसें समस्त जों पाहत ॥ तों हनुमंत उडाला अकस्मात ॥ पुच्छें बांधिले समस्त ॥ राक्षस जळत धडधडां ॥१७॥
कित्येक पळाले असुर ॥ एकला उरला दशकंधर ॥ त्यासी म्हणे रक्षणार ॥ तुज कोण असे आतां ॥१८॥
शक्रारीस म्हणे रावण ॥ यावरी लोहपाश घालून ॥ ग्रीवा हस्त बांधून ॥ लंकेमाजीं फिरविजें ॥१९॥
मग इंद्रजितें पाश घालून ॥ बांधिला तेव्हां वायुनंदन ॥ नगरामाजीं नेऊन ॥ हिंडविती हनुमंता ॥१२०॥
जैसें पुटीं पडतां सुवर्ण ॥ तेजस्वी दिसे दैदीप्यमान ॥ त्यापरी सीताशोकहरण ॥ अग्निसंगें शुद्ध दिसे ॥२१॥
आळोआळीं फिरवित ॥ हनुमंत सहज पाळती घेत ॥ निंदकांचीं तोंडें लासित ॥ लोक पळती बिदोबिदीं ॥२२॥
जाहला एकचि हाहाकार ॥ भलती स्त्री म्हणे तूं माझा भ्रातार ॥ मज येथून काढीं बाहेर ॥ लावील वानर अग्नि आतां ॥२३॥
हनुमंत म्हणे समस्त असुरां ॥ मज तुम्ही आतां दृढ धरा ॥ सर्षप्राय होऊनि सत्वरां ॥ निघोनि गेला क्षणमात्रें ॥२४॥
हनुमंत गदागदां हांसत ॥ राक्षसांसी वांकुल्या दावित ॥ लंकेसी अग्नि लावित ॥ सुटला अद्भुत प्रभंजन ॥२५॥
माड्या गोपुरें धवळारें ॥ राणिवसाचीं सुंदर मंदिरें ॥ सकळ नगर महाद्वारें ॥ एकसरें धडकलीं ॥२६॥
कपीनें मांडिलें लंकादहन ॥ त्यासी साह्य झाला पवन ॥ नग्न होऊनि नगरजन ॥ सदनें सोडून पळाले ॥२७॥
थोर विषय संसारीं धन ॥ त्याहून आगळें अपत्य पूर्ण ॥ त्याहून दारा विशेष जाण ॥ त्याहून आस्था प्राणांची ॥२८॥
त्याहून विशेष निजप्राणत्याग ॥ इंद्रियांवरी उदास मग ॥ देहममता धरी निःसंग ॥ विषयभोग सांडिलिया ॥२९॥
त्यासी न झगटे मोह ममतां ॥ मग इतर जनांची काय कथा ॥ न करी कोण कोणाची आस्था ॥ पळती जीव घेऊनियां ॥१३०॥
पुरुषाविण मोहें अत्यंत नारी ॥ उडी घालिती जळते घरीं ॥ बळें ओढून काढितां बाहेरी ॥ जीवित्वावरी उदास त्या ॥३१॥
असंभाव्य दाटल्या ज्वाळा ॥ ग्रासूं इच्छिती नभमंडळा ॥ कीं कल्पांतरुद्र क्षोभला ॥ रावणावरी ते काळीं ॥३२॥
धूम्र दशदिशांतें दाटी ॥ कोण कोणास न दिसे दृष्टीं ॥ वंशनळे नभाच्या पोटीं ॥ असंख्यात उडती पैं ॥३३॥
आतां असो बहुत बोली ॥ तृतीयभाग लंका जाळिली ॥ परी ते सुवर्णमय जाहली ॥ श्रीरामभक्तप्रतापें ॥३४॥
लोहघणें परिस फोडिला ॥ परी तो अवघाचि सुवर्ण जाहला ॥ तेवीं लंकानगर ते वेळां ॥ हेममय ओतिलें ॥३५॥
हनुमंतें लंकादहन केलियावरी ॥ निजमानसीं विचार करी ॥ श्रीराम दर्शनासी झडकरी ॥ जावें आतां त्वरेनें ॥३६॥
मग उडाला वायुकुमर ॥ समुद्रातीरा आला सत्वर ॥ पुच्छ विझवितां नदीश्र्वर ॥ काकुळती बहु आला ॥३७॥
जलचरें उकडोनि मरती ॥ तूं कडसे बैसें गा मारुती ॥ याउपरी अवनिजापती दास ॥ तीरीं बैसला ॥३८॥
सरितापतीनें निजबळें ॥ निजलाटेनें पुच्छ विझविलें ॥ कीं याजकें अग्नीस आच्छादिलें ॥ कुंडमंडपामाझारीं ॥३९॥
कपाळींचा स्वेद पुसोनि टाकिला ॥ तो पुढें मकरध्वज जन्मला ॥ असो कपि मागें पाहूं लागला ॥ तों लंका भडभडां जळतसे ॥१४०॥
असंभाव्य चेतला अग्न ॥ म्हणे जनकजा जाईल भस्म होऊन ॥ कार्य नासेल म्हणून ॥ वायुनंदन शोक करी ॥४१॥
मग म्हणे करितां रामस्मरण ॥ मज न बाधी प्रळयाग्न ॥ माझे जगन्मातेसी विघ्न ॥ केवीं कृशान करूं शके ॥४२॥
स्मरतां रघुवीर नाम निर्मळ ॥ शिवकंठींचें हाळाहळ ॥ शीतळ जाहलें तात्काळ ॥ नामामृतें करूनियां ॥४३॥
तों वायुदेव सांगे ते वेळां ॥ सुखी आहे जनकबाळा ॥ ते त्रिभुवनपतीची चित्कळा ॥ ब्रह्मांडमाळा घडी मोडी ॥४४॥
यावरी लोकप्राणेशनंदन ॥ म्हणे क्षुधित जाहले नयन ॥ मित्रकुळभूषणाचे चरण ॥ पाहावयालागी उदित ॥४५॥
तो मंगळजननीजा जीवन ॥ मज पुसेल वर्तमान ॥ तरी कीर्ति स्वमुखेंकरून ॥ वर्णितां दूषण लागेल ॥४६॥
यश धर्म विद्या पुरुषार्थ ॥ बळ पराक्रम आणि तीर्थ ॥ हें स्वमुखें जो वर्णित ॥ तरी हानि सत्य शास्त्र म्हणे ॥४७॥
मग गुप्तरूपें वायुनंदन ॥ घेत परमेष्ठीचें दर्शन ॥ म्हणे मी अयोध्यापतीचे चरण ॥ पाहावया जातसें ॥४८॥
तरी येथें वर्तला जो वृत्तांत ॥ तो पत्रीं लिहावा साद्यंत ॥ ऐकतां विष्णुनाभसुत ॥ ब्रह्मानंदें उचंबळला ॥४९॥
म्हणे धन्य हनुमंता तुझें ज्ञान ॥ मजही त्वां केलें पावन ॥ मग तात्काळ पत्र लिहून ॥ हनुमंतापाशीं दिधलें ॥१५०॥