असो तें दणाणिलें लंकानगर ॥ म्हणोनि क्रौंचा घेत समाचार ॥ असुरी पाठविल्या अपार ॥ धरिला वानर ते काळीं ॥५१॥
तो हनुमंतें ते वेळे ॥ संकीर्ण रूप धरिलें कोवळें ॥ क्रौंचेनें डोळां देखिलें ॥ हातीं धरिलें दृढ तेव्हां ॥५२॥
म्हणे हा चिरा गे वानर ॥ पाक करोनि आणा सत्वर ॥ हनुमंत म्हणे माझें शरीर उदकमय सर्वही ॥५३॥
पाक करितां नुरेचि कांहीं ॥ यालागीं तूं सगळाचि खाईं ॥ असुरीनें उचलोन लवलाहीं ॥ मुखांत घातला हनुमंत ॥५४॥
दांतांसि दांत मिळवी येरी ॥ तंव तो प्रवेशला अंतरीं ॥ काळिज धरोनि उभय करीं ॥ झोळकंबा घेत मारुति ॥५५॥
तंव ते चडफडे ते वेळे ॥ भोवंडी तेव्हां नेत्रबुबुळें ॥ गडबडां भूमीवरी लोळे ॥ वांचवा म्हणे मज आतां ॥५६॥
सूकरविष्ठा आणोन बहुत ॥ असुरी क्रौंचेसी पाजित ॥ हनुमंत आंत कंटाळत ॥ निघो पाहत बाहेरी ॥५७॥
तिच्या नासिकद्वारे हनुमंत ॥ पुच्छाग्र बाहेर दावीत ॥ असुरी धरोनि वोढित ॥ रोगबीज म्हणोनियां ॥५८॥
ओढी ओढितां अपार ॥ पुच्छरोगाचे पडिले ढिगार ॥ मग हनुमंतें असुरी समग्र ॥ बांधोनियां आसुडिल्या ॥५९॥
हनुमंताचें अद्भुत बळ ॥ क्रौंचेचीं आंतडीं तोडिलीं सकळ ॥ उदर फोडोन तात्काळ ॥ बाहेर आला गर्जोनियां ॥६०॥
असंख्यात राक्षिसिणी ॥ भारा बांधोनि आपटिल्या धरणीं ॥ भिरकावित समुद्रजीवनीं ॥ जाहलीं पारणीं जळचरांचीं ॥६१॥
जैशा मनाच्या अनंत वृत्ती ॥ मनोजयें योगी आकर्षिती ॥ तैशा असुरी संहारूनि मारुति ॥ विजयी जाहला पडलंके ॥६२॥
अत्यंत वृद्धा असुरी ॥ उरल्या होत्या नगरांतरीं ॥ तयांसीं म्हणे रुद्रावतारी ॥ लंका कोणती दावा गे ॥६३॥
नाहीं तरी तुम्हांस भक्षीन ॥ म्हणेन पसरिलें तेव्हां वदन ॥ वृद्धा बोलती भिऊन ॥ पैल ते लंका दिसतसे ॥६४॥
तों अस्ता गेला दिनकर ॥ निकुंभिलेंत प्रवेशला वायुकुमर ॥ शोधित चालिला सीता सुंदर ॥ धांडोळित सर्वही ॥६५॥
केरामाजी पडले मुक्त ॥ तें झारा युक्तीनें निवडित ॥ कीं सारासारविचार शोधित ॥ साधक आत्मप्राप्तीतें ॥६६॥
कीं यात्रेंत चुकली जननी ॥ सत्पुत्र काढी शाधूनि ॥ कीं महावैद्य काननीं ॥ संजीविनी शोधूं निघे ॥६७॥
समुद्रांत नेले वेद ॥ ते मत्स्यरूपी शोधी मुकुंद ॥ तैसा राघवचरणब्जमिलिंद ॥ निकुंभिलेंत सीता शोधी ॥६८॥
तों देखिलें शक्रजिताचें मंदिर ॥ हेमरत्नअति सुंदर ॥ त्यांत प्रवेशला वानर ॥ राघवप्रिया पहावया ॥६९॥
शक्रजित सुलोचना उभयंता ॥ शेजे पहुडलीं होय देखता ॥ मग म्हणे हेच होईल सीता ॥ रत जाहली परपुरुषीं ॥७०॥
आतां घालोनि पाषाण ॥ घेईन दोघांचाही प्राण ॥ मग म्हणे ऐकावें भाषण ॥ बोलती काय परस्परें ॥७१॥
तंव ते शेषकन्या स्वभावें तेथ ॥ इंद्रजितासी बोलत ॥ तुमचा पिता लंकानाथ ॥ अनुचित वर्तत असे ॥७२॥
अणुमात्रही वैर नसतां ॥ व्यर्थ आणली जनकदुहिता ॥ कुळक्षयास तत्वतां ॥ कारण केलें गमताहे ॥७३॥
परसतीचा अभिलाष करी ॥ साधुसंतांचा द्वेष धरी ॥ गुरुद्रोह ज्यामाझारी ॥ अल्पयुषी तो साच ॥७४॥
मातापित्यांचा करी तिरस्कार ॥ ब्राह्मणांसी निंदी निरंतर ॥ जो हिंसक दुष्ट दुराचार ॥ अल्पायुषी तोचि पैं ॥७५॥
हरिचरित्रें उच्छेदित ॥ निंदी महापुरुषांचे ग्रंथ ॥ नसतेंच काढी पाखंड मत ॥ अल्पायुषी तो साच ॥७६॥
म्हणोनी श्रावणारितनयवनिता ॥ आणोनि अनर्थ केला वृथा ॥ आतां लंकेची गति तत्वतां ॥ न दिसे पाहतां बरी कांहीं ॥७७॥
ऐकतां ऐशी मात ॥ लंकेंत प्रवेशे हनुमंत ॥ बिभीषणाचे मंदिरांत ॥ वायुसुत संचरला ॥७८॥
सत्वशील बिभीषण ॥ करीत विष्णूचें उपासन ॥ सदा होत हरिकीर्तन ॥ तेणें सदन दुमदुमिलें ॥७९॥
नाहीं रजतमांची वार्ता ॥ न दिसे द्वेष हिंसा तत्वतां ॥ पुराणश्रवण हरिकथा ॥ याविण चर्चा नसेचि ॥८०॥
दया क्षमा आणि शांती ॥ बिभीषणाचे हृदयीं नांदती ॥ असो तेथें कीर्तनीं मारुति ॥ ब्रह्मानंदें नाचतसे ॥८१॥
कीर्तनकल्लोळ रंगांत ॥ गडबडां लोळे हनुमंत ॥ कंठ होऊनि सद्रदित ॥ ब्रह्मानंदें डुल्लतसे ॥८२॥
घेऊन भक्तांचें चरणरज ॥ कपाळीं लावी वायुतनुज ॥ म्हणे होय राक्षसवंशज ॥ परी भक्तराज सात्त्विक हा ॥८३॥
वायासांत कोकिळा वसत ॥ कीं दैत्यकुळी प्रल्हाद भक्त ॥ कीं कागविष्ठेंत अश्र्वत्थ ॥ तें वास्तव्य स्थळ विष्णूचें ॥८४॥
कीं परिस जैसा पाषाणांत ॥ कीं शुक्तीमाजीं दिव्य मुक्त ॥ तैसा राक्षसकुळीं हा भक्त ॥ अलंकृत उत्तम गुणीं ॥८५॥
लंकेस आलिया रघुनंदन ॥ सहपरिवारें मारूनि रावण ॥ मग रघुपतीस प्रार्थोन ॥ राज्य संपूर्ण देईन यासी ॥८६॥
जैसे दवडोन काम क्रोध ॥ साधु करिती निजबोध ॥ तैसा बिभीषण भक्त प्रसिद्ध ॥ अक्षय स्थापीन लंकेसी ॥८७॥
बिभीषणाचे मंदिरांत ॥ परम संतोषला हनुमंत ॥ जैसें तृषेनें पीडितां बहुत ॥ गंगा अकस्मात देखिली ॥८८॥
चकोरा पावे रोहिणीवर ॥ कीं चातकां वोळला अंबुधर ॥ तैसें देखोनि बिभीषणाचें मंदिर ॥ वायुपुत्र आनंदला ॥८९॥
मग चालिला पुढारां ॥ देखें कुंभकर्णाचे मंदिरा ॥ तों दुर्गंधि आली एकसरां ॥ कंटाळे मन मारुतीचें ॥९०॥
जैसा मेघ गडगडित ॥ तैसा कुंभकर्ण घोरत ॥ कुंजर म्हैसे खर बहुत ॥ नासिकाबिळांत गुंतले ॥९१॥
श्र्वासासरसे बाहेरी ॥ आरडत पडती एकसरी ॥ कीं तो मंदराचळ पृथ्वीवरी ॥ निद्रिस्त हावोन पडियेला ॥९२॥
मातेचिया उदरांतून ॥ जेव्हां पडला कुंभकर्ण ॥ तेव्हां पसरोनि विशाळ वदन ॥ तीस सहस्र स्त्रिया गिळियेल्या ॥९३॥
असो देखोन कुंभकर्ण ॥ आश्र्चर्य करी वायुनंदन ॥ म्हणे हा वृथा पुष्ट जन्मोन ॥ व्यर्थ येथें पडियेला ॥९४॥
देखोन अंत्यजाचें घर ॥ पळे जैसा श्रोत्रीय पवित्र ॥ तैसा अंजनीचा पुत्र ॥ सांडोन चालिला पुढारा ॥९५॥
जो कल्पद्रुमीं द्विज राहणार ॥ तो बाभुळेवरी न बैसे साचार ॥ तैसें अव्हेरूनि घटश्रोत्राचें घर ॥ रामकिंकर पुढें जाय ॥९६॥
कोठें नुमगे मंगळभगिनी ॥ मारुति विचार करी मनीं ॥ कोणतें स्वरूप धरूनि ॥ लंकेमाजीं हिंडावें ॥९७॥
वानररूपेंकरूनि ॥ जरी विचरावें लंकाभुवनीं ॥ तरी राक्षस विनोदें धरूनि ॥ नाना चेष्टा करितील ॥९८॥
राक्षसरूप धरावें क्रूर ॥ तरी करवितील मांसाहार ॥ द्विजमांस भक्षितां साचार ॥ पुण्य समग्र भस्म होय ॥९९॥
कीं करूं जाऊं शिष्टाई ॥ तरी रावण न मानी काळत्रयीं ॥ राक्षसांसी भेद करितां पाहीं ॥ विनोद माझा करितील ॥१००॥