श्रीगणेशाय नमः ॥
श्रीरामचंद्राय नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥
नमू श्रीगुरुब्रह्मानंद ॥ जो जगदंकुरमूळकंद ॥ जो निजजनतारक प्रसिद्ध ॥ कैवल्यदाता सुखाब्धि ॥१॥
जो योगद्वीपींचें निधान ॥ जो वैराग्यवल्लीचें सुमन ॥ कीं वेदांतसमुद्रींचा मीन ॥ आत्मजीवनीं तळपतसे ॥२॥
कीं तो धर्ममेरूचें शिखर ॥ कीं चिदाकाशींचा जलधर ॥ कीं कृपासागरींचें सुंदर ॥ दिव्य रत्न प्रकटलें ॥३॥
कीं शांतीचें चंद्रमंडळ ॥ कीं सत्यतेजें सूर्य केवळ ॥ कीं सत्त्वसरोवरींचें कमळ ॥ किंवा सुफळ आनंदवृक्ष ॥४॥
कीं क्षमामलयपर्वत पूर्ण ॥ कीं निर्विकार दिव्य चंदन ॥ मुमुक्षु फणिवर वेष्टून ॥ सर्वदाही बैसले ॥५॥
कीं शुद्धब्रह्म भागीरथीजळ ॥ तेथींचा लोट अति निर्मळ ॥ भक्ति विरक्ति ज्ञान केवळ ॥ तीर्थराज अवतरला ॥६॥
ऐसा महाराज श्रीगुरुनाथ ॥ त्यासी परिसाचा देऊं दृष्टांत ॥ तो लोहाचें सुवर्ण करित ॥ परी आपणाऐसें न करवे ॥७॥
सुरभि चिंतामणि साचार ॥ कल्पवृक्ष म्हणावा उदार ॥ तरी तो कल्पिलेंचि देणार ॥ परी आपणाऐसें न करवे ॥८॥
जनकजननीची उपमा कैशी ॥ द्यावी आतां सद्रुरूशी ॥ तीं जन्मदायक निश्र्चयेंसी ॥ हा जन्ममरणांसी दूर करी ॥९॥
चौऱ्यांशीं लक्ष योनि अमूप ॥ सर्वांठायीं असती मायबाप ॥ परी सद्रुरु दुर्लभ चित्स्वरूप ॥ जन्मोजन्मीं कैंचा तो ॥१०॥
जो भवइंधनदाहक वैश्र्वानर ॥ अज्ञानतिमिरच्छेदक दिवाकर ॥ कीं दुःखपर्वतभंजन पुरंदर ॥ बोधवज्र झळके वरी ॥११॥
ऐसा महाराज गुरुनाथ ॥ त्यासी शिष्य विरक्त शरणागत ॥ भ्रमर पद्मकोशीं बैसत ॥ तैसे लुटित चरणरज ॥१२॥
कीं स्फुलिंग मिळे अग्नींत ॥ कीं जळबिंदु पडे सरोवरांत ॥ कीं सरिता-सागरीं ऐक्य होत ॥ ऐसे भक्त गुरुचरणीं ॥१३॥
कीं मुशींत आटिले अलंकार ॥ कीं जळीं विरे जळगार ॥ कीं तरंग मोडून साचार ॥ एक नीर उरे पैं ॥१४॥
ऐसें गुरुचरणीं मिळोन ॥ गुरुदास्य करित अनुदिन ॥ क्षीराब्धीमाजी उपमन्य ॥ विलसे जैसा सर्वदा ॥१५॥
कीं जान्हवींत मणिकर्णिका तीर्थ ॥ कीं भीमेंत चंद्रभागा विख्यात ॥ तैसे भजनगंगेत यथार्थ ॥ गुरुभक्त वंद्य पैं ॥१६॥
ऐसें ऐकतां गुरुस्तवन ॥ परम आनंदले संतजत ॥ धन्य धन्यरे म्हणोन ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥१७॥
ऐसे देखोन श्रीधरें ॥ नमस्कार घातला प्रेमादरें ॥ म्हणे तुम्ही रामकथामृतपात्रें ॥ सादर श्रवणीं बैसलां ॥१८॥
तुम्ही ज्ञानगंगेचे ओघ निर्मळ ॥ कीं विवेकभूमींचीं निधानें केवळ ॥ कीं कृपार्णवींची जाहाजें सबळ ॥ क्षमाशीड वरी तळपे ॥१९॥
कीं नवविधभक्तीचीं दिव्य द्वीपें सुंदर ॥ कीं अनुभवशास्त्रींचीं मंदिरें ॥ कीं पिकलीं आनंददक्षेत्रें ॥ समसमान चहूंकडे ॥२०॥
परोपकारनभींचीं नक्षत्रें निर्मळ ॥ परम गुणप्रिय मुक्तमराळ ॥ कीं शब्दरत्नग्राहक सकळ ॥ या ग्रंथश्रवणीं मिळाले ॥२१॥
कीं रामकथाकमळिणीचें भ्रमर ॥ कीं अवधानदाते जलधर ॥ माझे शब्द आरुष निर्धार ॥ परी तुम्ही प्रीति ठेविली ॥२२॥
रानपक्षी शुक यथार्थ ॥ त्याचे बोल ऐकतां तटस्थ ॥ होती शास्त्रज्ञ पंडित ॥ तैसेंचि येथें जाहलें ॥२३॥
कीं बोबडें बोलतां बालक ॥ अत्यंत संतोषे जनक ॥ तैसें शब्दांचें कौतुक ॥ संतजन करिती पैं ॥२४॥
तरी आतां इतुकेंच करा सत्वर ॥ सादरता हे दिव्य अलंकार ॥ मजलागीं देऊन साचार ॥ संतजनीं गौरवावें ॥२५॥
वक्ताक्षेत्र पिकलें पूर्ण ॥ परी सादरता पाहिजे वरी घन ॥ चित्तव्याकुळता हें अवर्षण ॥ तेणें मोड करपती ॥२६॥
बोलती संत श्रोते चतुर ॥ तुमचीं वचनें हा सुधाकर ॥ येणें आमुचे कर्णचकोर ॥ तृप्त जाहले निर्धारें ॥२७॥
असो आतां वाग्वल्ली सुंदरी ॥ चढे अयोध्याकांडमंडपावरी ॥ तेथींची फळें निर्धारीं ॥ भक्तचतुरीं सेविजे ॥२८॥
मागें अष्टमाध्यायीं कथन ॥ जानकी परिणिली कोदंड भंगोन ॥ त्यावरी भृगुपतीचा दर्प हरोन ॥ रघुपति आला अयोध्ये ॥२९॥
कैकयीचा बंधु विख्यात ॥ परम प्रतापी संग्रामजित ॥ मान देऊनि बहुत ॥ लग्नासी आणिला दशरथें ॥३०॥
मिथिलेचा लग्न सोहळा पाहून ॥ अयोध्येसी आला परतोन ॥ कैकयीस म्हणे भरत शत्रुघ्न ॥ नेऊं आपले ग्रामातें ॥३१॥
ऐकोन बंधूचें वचन ॥ येरी म्हणे अवश्य जा घेऊन ॥ परी रायातें पुसोन ॥ मग दोघांतें नेइंजे ॥३२॥
दशरथास पुसे संग्रामजित ॥ मास एक शत्रुघ्न आणि भरत ॥ स्वराज्यासी नेऊन त्वरित ॥ आणून मागुती पोंचवूं ॥३३॥
अवश्य म्हणोनि अजसुत ॥ कैकयी भरतासी सांगत ॥ तुवां मातुलगृहासी जावें त्वरित ॥ शत्रुघ्नासी घेऊनियां ॥३४॥
भरत म्हणे श्रीरामावांचून ॥ मज न गमे एकही क्षण ॥ रघुपतीचे सेवेविण ॥ न रुचे मज आन कांहीं ॥३५॥
श्रीराम चंद्र मी चकोर ॥ मी चातक रघुवीर अंबुधर ॥ राम सुरभि मी वत्स साचार ॥ वियोग सहसा सोसेना ॥३६॥
श्रीरामसेवा सांडोन ॥ इतर सुखें इच्छी कोण ॥ पीयूषतुल्य अन्न टाकून ॥ कोण वमन विलोकी ॥३७॥
मुक्ताफळें हंस टाकोन ॥ प्राणांतींही न भक्षी शेण ॥ कल्पद्रुमींचा विहंगम जाण ॥ बाभुळेवरी न बैसे ॥३८॥
घृतमधुदुग्धसरोवर ॥ जरी सुरसें भरलें अपार ॥ परी जीवन सांडूनि जलचर ॥ कदा तेथें न जाती ॥३९॥
ऐसें बोलतां भरत ॥ नेत्रीं आले अश्रुपात ॥ माता म्हणे एक मासापर्यंत ॥ क्रमोनि येईं सवेंचि ॥४०॥
नुल्लंघवे मातृवचन ॥ भरत श्रीरामास पुसे येऊन ॥ मग बोले जानकीमनमोहन ॥ बा रे लौकरी येइंजे ॥४१॥
भरतशत्रुघ्नीं ते वेळे ॥ रघुवीरचरण वंदिले ॥ चतुरंग दळ सिऋृ जाहलें ॥ रथीं बैसले दोघेही ॥४२॥
राया दशरथाचे कुमार ॥ श्रीरामचरणाब्जभ्रमर ॥ मातुलग्नामासी सत्वर ॥ दळभारेंसी पातले ॥४३॥
इकडे अयोध्येसी रामलक्ष्मण ॥ सर्वदा करिती गुरुसेवन ॥ तैसेंचि दशरथाचें भजन ॥ रघुनंदन करीतसे ॥४४॥
वसिष्ठमुखें नित्य विद्या श्रवण ॥ श्रीराम करितसे आपण ॥ चतुःषष्टिकलाप्रवीण ॥ रघुनंदन जाहला ॥४५॥
मग धनुर्विद्येचा अभ्यास ॥ करिता परमपुरुष ॥ रंगभूमि साधूनि विशेष ॥ युद्धकळा शिके तेथें ॥४६॥
वेणुमस्तकीं घालितां कुठोर ॥ चिरत जाय जैसा दूर ॥ तैशी श्रीरामबुद्धि तीव्र ॥ तर्क अपार पावतसे ॥४७॥
वसिष्ठ धनुष्यबाण घेऊन ॥ जें जें मांडून दावी ठाण ॥ त्याहूनि विशेष रघुनंदन ॥ दावी करून गुरूसी ॥४८॥
अस्त्रशस्त्रविद्याप्रवीण ॥ जाहले राम आणि लक्ष्मण ॥ ते परीक्षा पहावया अजनंदन ॥ रंगमंडपीं बैसला ॥४९॥
रंगमंडपाची रचना ॥ न वर्णवेचि सहस्रवदना ॥ तें तेज विलोकितां सहस्रकिरणा ॥ परमाश्र्चर्य वाटतसे ॥५०॥