अध्याय पाचवा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्री गणेशाय नमः ॥

श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

श्रीरामकथा तेजः पुंज ॥ हेंचि विशाळ दिव्य जहाज ॥ जयासी नवखण सहज ॥ नवविधा भक्तीचे ॥१॥

एकएका खणाआंत ॥ बैसले अनुतापी महाभक्त ॥ प्रेमाचें शीड वरी फडकत ॥ पालवीत मुमुक्षूंतें ॥२॥

येथें कर्णधार निश्र्चित ॥ स्वयें जाणिजे श्रीरघुनाथ ॥ तोचि पैलपारासी नेत ॥ निजदासां बैसवूनि ॥३॥

त्या श्रीरामाचें नाम गोड ॥ कथा ज्याची गगनाहूनि वाड ॥ जे लीला ऐकतां पुरे कोड ॥ नलगे चाड आणिकांची ॥४॥

जों जों श्रोते कथेसी सादर ॥ तां तों रस चढे अपार ॥ जैसा पुष्करी देखतां रोहिणीवर ॥ चंद्रकांता पाझर सुटे ॥५॥

बृहस्पतीसारिखा वक्ता मतिमंद मिळालिया श्रोता ॥ तैं व्यर्थ गेली ते कथा ॥ जों नाहीं सादरता श्रोतयांसी ॥६॥

जैसें काननामाजी रुदन ॥ कोणी न पुसे तयालागून ॥ तैसें मतिमंदाप्रति श्रवण ॥ करवणें त्याचप्रकारें ॥७॥

जैसीं अन्नें केलीं स्वादिष्ट ॥ परि जेवणार बैसले रोगिष्ठ ॥ तरी ते सुगरणीचे कष्ट ॥ शून्यस्थानीं पडिले कीं ॥८॥

षड्रसअन्नें केलीं परिकर ॥ परि तो जेवूं जाणे काय खर ॥ पंकगर्तेंत सुंदर ॥ हिरा नेऊन टाकिला ॥९॥

कवित्वसागरींचीं रत्नें दृष्टांत ॥ त्यांचे परिक्षक ज्ञाते पंडित ॥ मतिमंद कुटिल निश्र्चित ॥ त्यांस परीक्षा नकळे हे ॥१०॥

सुधारस उकिरडां ओतिला ॥ गर्भांधासी दर्पण दाविला ॥ कीं दिव्य मंचक घातला ॥ चिताभूमीस नेऊनीयां ॥११॥

कीं कागासी समर्पिलीं अमृतफळें ॥ उष्ट्रापुढें सोलींव केळें ॥ कीं जे मृत्युप्राय निजेले ॥ त्सांसी पूजिले व्यर्थ जेंवि ॥१२॥

कीं अनर्ध्य रत्नमाळा ॥ घातली दिवाभीताचे गळां ॥ कीं कस्तूरीटिळक रेखिला ॥ सूकराचे लल्लाटीं ॥ तैसी मतिमंदापुढें कथा ॥

वाग्विलासिनी संतापें बोलतां ॥ जैसी पद्मिणी राजदुहिता ॥ षंढाप्रति दीधली ॥१४॥

भग्नपात्रामाजी नीर ॥ कदाकाळीं न राहे स्थिर ॥ तरी तुम्ही भक्त वरिष्ठ चतुर ॥ कथा सादर परिसा हो ॥१५॥

आधींच मुक्ताफळ वरी सुवास ॥ आधींच हिरा त्यावरी परिस ॥ तैसा आधीं चतुर वरी प्रेमरस ॥ श्रीरामासी आवडे तो ॥१६॥

असो चतुर्थाध्यायाचे अंतीं ॥ कथा सुरस परिसिली संतीं ॥ सांगितली श्रीरामाची जन्मस्थिति ॥ बंधूसहित सर्वही ॥१७॥

जो सरसिजोद्भवाचा पिता ॥ त्यासी दशरथ बाप कौसल्या माता ॥ भक्त तरावया तत्वतां ॥ अयोध्येमाजी प्रकटला ॥१८॥

अहो दशरथाचें भाग्य थोर ॥ रत्नजडित पालख सुंदर ॥ चारी लांबविले परिकर ॥ चौघे कुमर निजती तेथें ॥१९॥

तेरावे दिवशीं पाळणां ॥ पहुडविला रामराणा ॥ जो अगम्य वेदपुराणां ॥ जो जो म्हणोनि हालविती ॥२०॥

जो सनकादिकांचें ध्यान ॥ मृडानीपतीचें चिंतन ॥ जो चतुरास्याचें देवतार्चन ॥ जो जो म्हणोनि हालविती ॥२१॥

जो आदिमायेचा निजवर ॥ जो पुराणपुरुष परात्पर ॥ जो मायाचक्रचाळक चतुर ॥ जो जो म्हणोनि हालविती ॥२२॥

जो अगम्य दशशतवदना ॥ प्रेमपाळणीं तो रामराणा ॥ जवळीं ज्या उभ्या ललना ॥ सुवासिनी कोण त्या ऐका ॥२३॥

निर्वाणदीक्षा स्वरूपस्थिती ॥ मुमुक्ष निष्कामना प्रतीति ॥ सुलीनता समाधि सद्भति ॥ लीला गाती स्वानंदें ॥२४॥

परा पश्यंती मध्यमा वैखरी ॥ गजरें गाती चौघी नारी ॥ चाऱ्ही मुक्ति निर्धारी ॥ चहूं कोणीं तटस्थ ॥२५॥

घरांत मुख्य ह्या सुंदरी ॥ इतर बैसल्या बाहेरी ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नारी ॥ त्यांसी रावणारी दिसेना ॥२६॥

असंभावना विपरीतभावना ॥ विक्षेपता गतायाता जाणा ॥ तुर्या दावी शहाणपणा ॥ बहुत जाणती असें मी ॥२७॥

बारा सोळा चौदा नारी ॥ गलबला करिती बाहेरी ॥ चौसष्टी दाविती कळाकुसरी ॥ परी अंतरीं प्रवेश नव्हेचि ॥२८॥

असो सकळ नितंबिनी ॥ ओंटी कौसल्येची भरूनि ॥ वस्त्रें अलंकार समर्पूनि ॥ सदनीं गेल्या आपुलाल्या ॥२९॥

अयोध्येसी जन्मतां रघुपति ॥ विघ्नें राक्षसां जाणवती ॥ प्रळयविजा कडकडून पडती ॥ लंकेवरी अकस्मात ॥३०॥

कांपों लागलें लंकानगर ॥ भूकंप होत वारंवार ॥ उगेंच मोडलें राजछत्र ॥ सभा प्रेतवत दिसतसे ॥३१॥

महाद्वारीं भूमि उलत ॥ रावण जों भद्रीं चढत ॥ तों दाही मस्तकींचे पडत ॥ मुकुट खालीं उगेचि ॥३२॥

शक्रारि पाहे आरसा निर्मळ ॥ तों आंत न दिसे शिरकमळ ॥ राजमंदिरावरी अमंगळ ॥ दिवाभीतें बोभावती ॥३३॥

स्वप्न देखे मंदोदरी ॥ कीं मर्कटें तोडिली गळसरी ॥ विगतधवा ज्या कां नारी ॥ ओंटी भरिती धुळीनें ॥३४॥

ललाटशून्य सुलोचना ॥ देखती जाहली मयकन्या ॥ चिंता पडली रावणा ॥ म्हणे ईश्र्वर क्षोभला कीं ॥३५॥

ईश्र्वर जाहलिया पाठमोरा ॥ नसतीं विघ्नें येती घरा ॥ महारत्नें होती गारा ॥ कोणी न पुसती तयांतें ॥३६॥

आपुलें द्रव्य लोकांवरी ॥ तें बुडोन न जाय लाभे करीं ॥ ज्यांचें देणें ते द्वारीं ॥ बैसती आण घालोनी ॥३७॥

वैरियां करी सांपडे वर्म ॥ अपयश येऊन बुडे धर्म ॥ विशेष वाढे क्रोध काम ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥३८॥

आपुले जे कां शत्रु पूर्ण ॥ ज्यांसी आपण पीडिलें दारुण ॥ अडल्या धरणें त्यांचे चरण ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥३९॥

लाभाकारणें निघे उदीमास ॥ तों हानिच होय दिवसेंदिवस ॥ पूज्यस्थानीं अपमान विशेष ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४०॥

सुहृद आप्त द्वेष करिती ॥ नसते व्यवहार येऊन पडती ॥ सदा तळमळ वाटे चित्तीं ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४१॥

आपलें राज्य संपत्ति धन ॥ शत्रु भोगूं पाहे आपण ॥ देहीं पीडील व्याधिविण ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४२॥

विद्या बहुत जवळी असे ॥ परी तयासी कोणी न पुसे ॥ बोलों जातां मति भ्रंशे ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४३॥

ठेविला ठेवा न सांपडे ॥ नसतीच व्याधि आंगीं जडे ॥ सदा भय वाटे चहूंकडे ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४४॥

वृद्धपणीं येई दरिद्र ॥ स्त्री मृत्यु पावे गेले नेत्र ॥ उपेक्षूनि हेळसिती पुत्र ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४५॥

असो लंकेमाजी रावण ॥ सांगे प्रधानासी बोलावून ॥ अहोरात्र सावधान ॥ लंकानगर रक्षावें ॥४६॥

अयोध्येसी राम जन्मतां तात्काळ ॥ वृक्ष विराजती सदा फळ ॥ गाई दुभती त्रिकाळ ॥ क्षीर तुंबळ न सांवरे ॥४७॥

आधिव्याधिरहित लोक ॥ नाहीं चिंता दरिद्र दुःख ॥ शुष्क धरणी अपार पीक ॥ पिकों लागली तेधवां ॥४८॥

अवतरतांच जगज्जीवन ॥ जन जरारहित जाहले तरुण ॥ अविद्यापाप मुळींहून ॥ देशधडी जाहलें ॥४९॥

दरिद्री जाहले भाग्यवंत ॥ मूर्ख ते बोलके पंडित ॥ कुरूप ते स्वरूपवंत ॥ दैदीप्यमान तेजस्वी ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP