* ऋषिपंचमी
भाद्र. शु. पंचमी दिवशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदी सर्व स्त्रियांनी नदीवर स्नान करून आपल्या घरातील पवित्र जागी ( देवघरात ) हळदीचे चौकोनी मंडळ करावे व त्यावर सप्तर्षींची स्थापना करून गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा व
'कश्यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतम: । जमदग्निवंसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता: । गृहीत्वार्घ्यं मया दत्तं तुष्टा भवन्तु सर्वदा ।'
असे म्हणून अर्घ्य द्यावा. यानंतर न नांगरलेल्या जमिनीवरील उत्पन्न झालेले शाकादी पदार्थ खाऊन व्रत करावे. याप्रमाणे सात वर्षे करून आठव्या वर्षी सप्तर्षीच्या सोन्याच्या मूर्ती करून त्या कलशावर स्थापन कराव्या व त्यांची पूजा करावी. सात गोदाने आणि सात दांपत्यांना भोजन घालून मूर्ती विसजन कराव्यात. काही ठिकाणी स्त्रिया पंचताडी नावाचे तृण व भावाने दिलेले तांदूळ यांचे कावळें वगैरेंना बली देऊन, मग स्वत: जेवतात.
* आलेख्य सर्पपंचमी
तिथिव्रत भाद्र शु. पंचमीला रंगीत रांगोळीने नाग काढून त्याची पूजा करतात. व्रताचे फल-सर्पापासून अभय.
* दृष्टोद्धरण पंचमी
एक व्रत. ज्याचा आप्तस्वकीय सर्पदंशाने मरण पावला असेल, त्याने हे व्रत करावयाचे असते. भाद्रपद शु. पंचमी ही या व्रताची आरंभतिथी होय. व्रतावधी एक वर्ष. या व्रतात सोने, चांदी, लाकूड किंवा चिकणमाती यांची पंचफणायुक्त नागप्रतिमा तयार करून तिची पूजा करतात. प्रत्येक महिन्याला नागाच्या बारा नावांपैकी एकेका नावाने ही पूजा करावयाची असते.
फल - सर्पदंशाने मृत झालेल्या मनुष्याचा उद्धार.
* नागदृष्टोद्धरण व्रत
एक काम्य व्रत. भाद्रपद शु. पंचमीला या व्रताचा प्रारंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. या व्रताचा विधी असा - व्रतधारी व्यक्ती चतुर्थीला एकभुक्त व पंचमीला नक्त करतात. सोने, रूपे, काष्ठ किंवा माती यांची पाच फणा असलेली नागाची प्रतिमा करून तिला पंचामृताने स्नान घालतात. नंतर पंचोपचारे पूजा करतात. पूजेसाठी विशेषत: कण्हेरी, जाई व कमळ ही फुले घेतात. खीर व मोदकांचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणभोजन घालतात. प्रत्येक महिन्याच्या शु. पंचमीला मासपरत्वे नागांच्य़ा निरनिराळ्या नावांनी असाच पूजाविधी करतात. उद्यापनाच्या वेळी विष्णूचे स्मरण करून सुवर्णाची नागप्रतिमा आणि सवत्स धेनू दान देतात. यथाशक्ती ब्राह्मणभॊजनही घालतात.