१ अर्धोदय :
पौष अमावास्ये दिवशी जर रविवार, व्यतिपात, श्रवणनक्षत्र असेल तर तो अर्धोदय योग असतो. या दिवशी स्कंद पुराणमते सर्व जलाशयाचे जल गंगोदक बनते आणि सर्व ब्राह्मंण शुद्धात्मा होतात. म्हणून या पर्वात केलेले किंचितसे पुण्यदेखील मेरूसमान महान होते.
२ दर्श:
यासंबंधी माहिती मागे आली आहे, ती पहावी.
३ पात्रदान :
अर्धोदय योग असलेल्या अमावास्येला ६०, ४० अथवा २५ माशांचे सोने अगर चांदी याचे पात्र करून त्यात खीर घालावी. भूमीवर अक्षतांचे अष्टदल कमल काढून त्यावर ब्रह्मा, विष्णू आणि शिवरूप देवतांचे पुजन करावे आणि त्यासहवर्तमान सुपात्र ब्राह्मणाला दान केल्यास समुद्रान्त पृथ्वीदान केल्यासमान फल मिळते. या दिवशी गोदान, शय्यादान वगैरे देय वस्तू तीन-तीन द्याव्यात. या योगावर वसिष्ठांनी सत्ययुगात, रामचंद्रांनी त्रैतायुगात, धर्मराजाने द्वापरात आणि कलियुगात पूर्णोदराने अनेकप्रकारे दानधर्म केला होता, म्हणून धर्मज्ञ सत्पुरुषांनी अद्यापही तसे अवश्य करावे.
४ पौषी अमावास्या :
अमावास्या व पौर्णिमा या दोन्ही पर्वण्या आहेत. या दिवशी पृथ्विच्या कोणत्या न कोणत्या भागात सूर्य-चंद्राला ग्रहण असतेच. चंद्राचा अर्धा भाग हा नेहमी प्रकाशित असतो. ज्या दिवशी तो अजिबात दिसत नाही, त्या दिवसास ' अमावस्या' म्हणतात ही ;सिनीवाली' अगर 'कुहू' असते. तसेच पौर्णिमा 'राका' व 'अनुमती' अशी दोन प्रकारची असते. चंद्र हा सूर्याच्या खाली असल्यामुळे पौर्णिमेला पांढरा व अमावास्येला काळा भाग सूर्याकडे असतो. त्यामुळे पृथ्वीवर केलेल्या दानाचे पुण्य बाष्पसंभूत होते आणि सूर्यकिरणांनी आकृष्ट होऊन पितरलोकापर्यंत (जिथे पितृगण राहतात.) पोचतात. यासाठीच अमावास्ये दिवशी पितृ-श्राद्धादी कृत्ये करावीत. ज्या दिवशी सूर्य, चंद्र, व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, त्या वेळेसच ग्रहण होते. व्रतादीप्रमाण अमावास्या परविद्धा घ्यावयाची असते. चतुर्दशीयुक्त अमावास्या पूर्वविद्धा निषिद्ध मानतात.
'पुर्वाह्नो वै देवानां मध्याह्नो मनुष्याणां अपराण्हः पितृणाम् ।'
यानुसार दिवसाचे सुमारे १०-१० घटिकांचे तीन भाग करुन जप, ध्यान, उपासना वगैरे पहिल्या भागात करावे. संस्कारादि एवं आयुर्बलवित्तादीच्या प्राप्तीचे प्रयोगादी मनुष्यकार्य दुसरे तृतियांशात करावे. श्राद्ध, तर्पण वगैरे पितृकार्य तिसर्या तृतियांशात करावे, असे शास्त्रवचन आहे.
५ बकुल अमावास्या :
पौषी अमावास्येला हे नाव आहे. या दिवशी दुधात तांदळाची खीर करून पितरांना वाढतात. त्यामुळे पितर संतुष्ट होतात, अशी समजूत आहे.
६ विधिपूजा :
पौष अमावास्येस रोज स्नानादी नित्यकर्मे झाल्यानंतर वअस्त्राच्छादित वेदीवर वेद-वेदांगभूषित ब्रह्मदेवाचे गायत्रीसहित पूजन करावे व गाय, सोने, छत्र, वस्त्र, जोडे, शय्या, अंजन-दर्पणादी वस्तू
'स्थानं स्वर्गेऽथ पाताले यन्मर्त्ये किंचिदुत्तमम् ।
तदवाप्नोत्यसंदिग्धं पद्मयोनेः प्रसादतः ॥'
या मंत्राने ब्राह्मणांना दान द्याव्यात.
'यत्किंचित् वाचिकं पापं मानसं कायिक तथा ।
तत् सर्वं नाशमायति युगादितिथिपूजनात् ॥'
असे स्मरण करून आप्तजनांसह भोजन करावे.स