स्कंध ८ वा - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२१
परीक्षितीप्रति निवेदिती शुक । पापविनाशक चरित्र हें ॥१॥
गजेंद्रमोक्ष हा कथियेला तुज । मन्वन्तरवृत्त पुढती ऐकें ॥२॥
तामसाचा बंधु रैवतनामक । नामही त्या तेंच मन्वन्तरा ॥३॥
रैवत तैं मनु, अर्जुनादि पुत्र । विभु नामें इंद्र तया वेळीं ॥४॥
हिरण्यरोमादि सप्तऋषी तदा । वैकुंठ तो होता अवतार तैं ॥५॥
रमेस्तव तेणें निर्मिला वैकुंठ । वर्णन अशक्य देवाचें त्या ॥६॥
वासुदेव म्हणे चाक्षुक्ष पुढती । मन्वन्तर लोकीं सुविख्यात ॥७॥

२२
चक्षुपुत्र तैं चाक्षुष । मनु त्या काळीं विख्यात ॥१॥
पुरु, पुरुष, सुद्युम्न - । आदि, तया पुत्र जाण ॥२॥
देवगण आप्यादिक । मंत्रद्रुम, तदा इंद्र ॥३॥
हविष्मानादिक ऋषी । होते प्रख्यात तैं लोकीं ॥४॥
श्रेष्ठ, वैराज-संभूति । अजितनामें पुत्र त्यांसी ॥५॥
अवतार अंशात्मक । अर्पी देवां तो अमृत ॥६॥
वासुदेव म्हणे आतां । सिंधुमंथन तें ऐका ॥७॥

२३
निवेदिती शुक एकदां दुर्वास । शापिती इंद्रास क्रोधावेशें ॥१॥
अर्पितां मुनींनी हार तो इंद्रानें । फेंकिला मदानें गजस्कंधी ॥२॥
लीलेनें गर्जं तो नेला पायातळीं । दुर्वास त्या वेळीं क्रुद्ध झाले ॥३॥
ऐश्वर्यहीन तूं होशील मदांधा । बोलले देवेंद्रालागीं मुनि ॥४॥
शापें त्या ऐश्वर्यहीन होई इंद्र । धर्मक्रिया लुप्त होती जनीं ॥५॥
वासुदेव म्हणे पाहूनि ते संधि । इंद्रावरी घेती झेंप दैत्य ॥६॥

२४
देवदैत्ययुद्धामाजी देव क्षीण । न येईचि प्राण मृत देवां ॥१॥
पाहूनि ते इंद्र प्रार्थी ब्रह्मदेवा । ब्रह्मा तैं केशवा प्रार्थूं म्हणे ॥२॥
सकल मिळूनि प्रार्थितां तयासी । वाट कल्याणाची दावील तो ॥३॥
सर्व देवा तदा क्षीरसिंधूतीरीं । जाऊनि सत्त्वरी स्तविती देवा ॥४॥
वासुदेव म्हणे एकाग्र चित्तानें । वेदोक्त अर्थानें स्तविती देव ॥५॥

२५
ब्रह्मा म्हणे आद्या, अविक्रिया सत्या । श्रेष्ठा अप्रतर्क्या हे अनंता ॥१॥
मनोवाचातीता आद्यंतरहिता । घेईं हा आमुचा नमस्कार ॥२॥
प्राण-मनोबुद्धि - अहंकारज्ञात्या । हे जन्मरहिता देहहीना ॥३॥
विषय इंद्रियरुपें तूं भाससी । सम अविनाशी शाश्वत तूं ॥४॥
प्रकाशस्वरुपा व्यापका तुजसी । असावी आमुची प्रणति सदा ॥५॥
पंचदश आरा त्रिगुण हे तुंबे । अष्टधा जयातें प्रकृति धांवा ॥६॥
माया ज्या चालक गति जया मन । विद्युल्लते सम वेगें फिरे ॥७॥
वासुदेव म्हणे त्या देहयंत्राच्या । प्रेरका, देवांचा नमस्कार ॥८॥

२६
ज्ञानस्वरुपा, हे जीवनियामका । कालस्थलातीता साक्षिरुपा ॥१॥
योगाभ्यासें ज्ञानी उपासिती ज्यासी । अगम्या तुजसी नमन असो ॥२॥
मायागुणें मोह पावे ज्याच्या जीव । वंदिला तो देव मायाधीश ॥३॥
सत्वोद्भव आम्हां देवादिकांतेंही । अंतपार नाहीं ज्या रुपाचा ॥४॥
रज-तमोद्भुत जाणती न त्यासी । नवल कांहींचि नसे तेणें ॥५॥
वासुदेव म्हणे विराटस्वरुप । सर्वदा नमन तया ॥६॥

२७
अतर्क्य शक्तीनें जयाच्या हें विश्व । प्रसन्न तो देव होवो आम्हां ॥१॥
असूनि चरण पराधीनता न । उत्पत्यादि जाण रेतोदकें ॥२॥
देवदेवतांचें अन्न बल वय । चंद्रमा तो होय मन ज्याचें ॥३॥
मुख ज्याचें अग्नि धन यज्ञरुप । तोचि कृपायुक्त पाहो आम्हां ॥४॥
मुक्तिद्वार देवमार्गाची देवता । आत्मा जो वेदांचा मोक्षरुप ॥५॥
ऐसा सूर्य ज्याची दृष्टी त्या वंदून । देव हे शरण सकल आम्हीं ॥६॥
वासुदेव म्हणे सकल हे देव । तत्तदवयवोद्भुत ज्याच्या ॥७॥

२८
ब्राह्मणादि तेंवी कामक्रोधादीही । प्रगटले पाहीं अंगीं ज्याच्या ॥१॥
मायोद्भव सर्व विश्व हें जाणूनि । देवा, नम्र आम्हीं चरणीं तुझ्या ॥२॥
आत्मानंदमग्ना सर्व शक्ति शांत । तुझ्या स्वरुपांत सर्वकाळ ॥३॥
अलिप्त तूं वायूसमचि सर्वत्र । देवा,अ त्वत्स्वरुप दावीं आम्हां ॥४॥
सुहास्यवदन पाहूं तें केधवां । ध्यास आम्हां देवा, लागला हा ॥५॥
वासुदेव म्हणे विविधस्वरुपें । तारिसी भक्तांतें म्हणती देव ॥६॥

२९
संसारनिमग्न जीव निजकर्मे । अर्पिती न तेणें दु:ख तयां ॥१॥
परी जे निष्काम सर्व कर्मे तुज । अर्पिती तयांस बाधा नसे ॥२॥
क्षुल्लकही कर्म अर्पितां तुजसी । शाश्वत तयासी फल लाभे ॥३॥
आत्मस्वरुप हा ईश्वर जाणूनि । अर्पियेल्या कर्मी नियमें यश ॥४॥
मूळसिंचनें जैं पालवी वृक्षासी । तोष जैं जीवांसी त्वद्‍भक्तीनें ॥५॥
सर्वकर्मे आम्हीं अर्पितों तुजसी । देवा, हें जाणिसी संरक्षका ॥६॥
वासुदेव म्हणे सच्चित्सुखरुपा । हे स्वयंप्रकाशा नमन घेईं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP