अष्टम स्कंधाचा सारांश

या स्कंधांत अध्याय २४, मूळ श्लोक ९३१, त्यांवरील अभंग १६१

या स्कंधाच्या पहिल्या, पांचव्या, तेराव्या व चौदाव्या अध्यायांत निरनिराळ्या मन्वन्तरांची माहिती सांगितली आहे. प्रत्येक मन्वंतरांतील मनु, मनुपुत्र, इंद्र, सप्त ऋषि, आणि अवतार हे कोण, याची माहिती लक्षांत ठेवण्यासारखी आहे. सध्यां चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतरांतील अंशावतार वामन आहे; हें विशेष लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पुढें गजेंद्रमोक्षाच्या कथेंत गजेंद्रानें केलेलें श्रीहरीचें स्तवन नित्य पठणांत ठेवण्यासारखें आहे. गजेंद्राची कथा बहारीची आहे. पुढें गजेंद्रमोक्षाच्या कथेंत गजेंद्रानें केलेलें श्रीहरीचें स्तवन नित्य पठणांत ठेवण्यासारखें आहे. गजेंद्राची कथा बहारीची आहे. समुद्रमंथनांत भगवंताच्या लीला अवर्णनीय आहीत. त्यांतच कूर्मावताराचें वृत्त आलें आहे. अमृतलाभासाठीं केलेल्या समुद्रमंथनाच्या जगडव्याळ प्रयत्नांतून प्रथम हालाहल निघालें; हें सूचक, मार्गदर्शक आणि बोधप्रद आहे. पुढें कामधेनु, उच्चैश्रवा, लक्ष्मी इत्यादिकांच्या लाभानंतर अमृतकलश घेऊन धन्वंतरी आला. तेव्हां अमृतासाठीं कलह माजला. तो मिटवून देवकार्य करण्यासाठीं भगवंतानें मोहिनीचें रुप धारण करुन दैत्यांना मोह पाडला, ती कथा अपूर्व अशीच आहे. देवांना अमृताचा लाभ झाल्यामुळें खवळलेल्या दैत्यांनीं युद्ध आरंभिलें. त्यांतही भगवत्कृपेनें देवांना विजय मिळाला, व नमुचि दैत्याचा वध झाला. मोहिनीचें वृत्त ऐकून, शंकरांनीं इच्छा व्यक्त केल्यामुळें त्यांना मोहिनीरुपानें भगवंतांनीं मोहित करुन टाकिलें. शेवटीं ही भगवंताची लीलाच आहे असें शंकरांनीं ओळखल्यामुळें श्रीविष्णूंना संतोष वाटला. यानंतर वामनावताराची सविस्तर कथा गाइली गेली आहे. त्यांत बळीचा यज्ञ, त्यांत त्याला प्राप्त झालेली विजयप्रद युद्धसामुग्री, व बळीला इंद्रपदाची प्राप्ति वर्णिली आहे. बळीनें देवांना जिंकल्यामुळें त्यांना पारतंत्र्यांत सोसावे लागलेले कष्ट पाहून देवमाता अदितीला अत्यंत दु:ख झालें. तेव्हां तिनें आपले पति कश्यपमुनि यांच्या उपदेशाप्रमाणें ‘पयोव्रत’ केलें. व भगवान्‍ विष्णूची मनोभावानें आराधना केली. तेव्हां परम संतुष्ट होऊन भगवान्‍, अदितीच्या उदरीं वामनरुपानें अवतीर्ण झाले. व त्यानीं बळीच्या यज्ञांत, त्याच्याजवळ ‘तीन पावलें भूमि’ मागून शेवटीं बळीला पाताळांत घातलें. पण यावेळीं बळीच्या औदार्यावर व इतर सद्‍गुणांवर संतुष्ट होऊन भगवंतांनीं त्याचेंही परम कल्याण केलें. ही अत्यंत बोधप्रद कथा या स्कंधांत अतिशय रसाळतेनें गाइलेली आहे. या कथापठणाची फलश्रुती देखील मोठी पुण्य़वृद्धि करणारी अशीच आहे. शेवटीं मत्स्यावताराचें वृत्त सांगून हा स्कंध संपविलेला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP