अध्याय ८५ वा - श्लोक ५१ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स्मरोद्गीथः परिष्वंगः पतंगः क्षुद्रभृद्घृणी । षडिमे मत्प्रसादेन पुनर्यास्यन्ति सद्गतिम् ॥५१॥

स्मर उद्गीथ परिष्वंग । घृणी क्षुद्रभृत् आणि पतंग । साही मत्प्रसादें चांग । पुढती स्वर्ग अधिष्ठिती ॥३५०॥
ज्येष्ठोपहासन आपण केलें । ये पापाचें फळें हें जालें । ऐसें स्मरण हृदयीं धरिलें । भगवत्प्राप्तीपर्यंत ॥५१॥
पूर्वीं स्मरातें जाळिलें शिवें । मम जठरीं तो जन्मला दैवें । येथ विख्यात प्रद्युम्ननावें । स्मर जाणावें पूर्वील ॥५२॥
तेंवि हे स्मरादि साही जण । पूर्वील मरीचिनंदन । कालनेमीचे सदनीं जाण । कीर्तिमंतादि नामाथिले ॥५३॥
या कारणास्तव तीं पूर्वीं । कीर्तिमंतादिनामें बरवीं । कुरुवररत्ना तुजला आघवीं । निरूपिलीं तीं यथार्थ ॥५४॥
पूर्वीं म्हणिजे द्वितीयाध्यायीं । कीर्तिमंतादि कथिलीं पाहीं । मुनिसदनींचिये ठायीं । पंचाशाव्यामाजि कथिलीं ॥३५५॥
असोनि निर्विवाद आख्यान । जाणोनि श्रोतीं कीजे श्रवण । मग त्या षट्पुत्रांतें घेऊन । बळ भगवान निधाले ॥५६॥

इत्युक्त्वा तान्समादाय इंद्रेसेनेन पूजितौ । पुनर्द्वारवतीमेत्य मातुः पुत्रानयच्छताम् ॥५२॥

इत्यादि संवाद मधुरोक्ति । बोलूनियां बळीप्रति । सुनंदपाणि आणि श्रीपति । षट्सुतांतें घेऊनि ॥५७॥
इंद्रसेन म्हणिजे बळी । तेणें पूजिले बळवनमाळी । तैसे सुपूजित विक्रमशाळी । निघते जाहले तेथूनी ॥५८॥
पुढती येऊनि द्वारवतीये । षट्पुत्रांतें देवकीये । अर्पिते जाले परमाश्चर्यें । देखोनि मोहें विह्वळ ते ॥५९॥

तान्दृष्ट्वा बालकान्देवी पुत्रस्नेहस्नुतस्तनी । परिष्वज्याङ्कमारोप्य मूर्ध्न्यजिघ्रदभीक्ष्णशः ॥५३॥

मग त्या बाळकांतें देखून । देवकीचे उभय स्तन । पान्हाइले वोरसोन । स्रवती पूर्ण पयोधारा ॥३६०॥
जातमात्र कंसें वधिले । तैसेच साही सुत देखिले । आळिंगूनी हृदयीं धरिले । मग घेतले उत्संगीं ॥६१॥
अंकीं घेऊनि त्या कुमरांतें । वारंवार हुंगे माथें । अष्टपुत्रां भावी चित्तें । मानी निरुतें श्लाघ्यत्व ॥६२॥

अपाययत्स्तनं प्रीता सुतस्पर्शपरिप्लुता । मोहित मायया विष्णोर्यया सृष्टिः प्रवर्तते ॥५४॥

प्रीती करोनि पाजी स्तन । पुत्रस्पर्शें सस्नुतपूर्ण । न म्हणे रामकृष्णांहून । हे मम नंदन वयोधिक ॥६३॥
मानी आतांचि प्रसवलें यांतें । विष्णुमायेनें मोहितचित्तें । आदिपश्चात् न स्मरे तीतें । पाहतां सुतांतें धणी न पुरे ॥६४॥
विष्णुमायेची अद्भुतशक्ति । जिये करूनि सृजनस्थिति । सकळसृष्टीची प्रवृत्ति । व्यामोहभ्रांती माजिवडी ॥३६५॥

पीत्वामृतं पयस्तस्याः पीतशेषं गदाभूतः । नारायणाङ्गसंस्पर्शप्रतिलब्धात्मदर्शनाः ॥५५॥

देवकीचे स्तनींचें पय । पवित्र सुस्निग्ध अमृतप्राय । अमृतोपमा केंवि लाहे । हेतु काय यदर्थीं ॥६६॥
जगत्पति जो गदाभृत । तत्पीतशेषस्तन्यामृत । लाजवी परमामृता निश्चित । तर्पिले स्वसुत तत्पानें ॥६७॥
नारायणाचा अंगसंग । लाधले म्हणोनि एनसभंग । जाला आणि प्रत्यय चांग । आत्मस्मृतीच त्यां जाला ॥६८॥
म्हणाल कैसें आत्मदर्शन । जे मरीचिपुत्र साही जण । श्रेष्ठोपहासें पावले पतन । हें प्राचीन त्यां स्मरलें ॥६९॥
कृष्णें पूर्वीं प्राशिलें स्तन । तें त्या देवकीचें स्तनपान । घडलें तेणें निष्पाप पूर्ण । होऊनि स्वभुवन पावले ॥३७०॥
नारायणाचा अंगसंग । तेणें जाला एनसभंग । पूर्वस्मृतीचा लाधला योग । पावले स्वर्ग तें ऐका ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP