अध्याय ८५ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यस्यांशांशांशभागेन विश्वोत्पत्तिलयोदयः । भवन्ति किल विश्वात्मंस्तं त्वाद्याहं गतिं गता ॥३१॥

अगा ये आद्या आदिपुरुषा । ज्याचिया अंशांशाचिया अंशा । विभागें सृजनस्थितिविनाशा । होती अपैशा गौण क्रिया ॥३६॥
यस्य म्हणिजे ज्या पुरुषा । माया अंश म्हणिजे साचा । माया अंश तो त्रिगुणांचा । समूह ऐसा जाणावा ॥३७॥
तेथ रजोगुणें सृष्टिक्रम । सत्वगुणें स्थितिसंभ्रम । तत्संहारीं प्रबळ तम । हे त्रिविध नेम त्रिगुणांचे ॥३८॥
ऐसे ज्यांचे अंशांशभाग । परमाणुरूप जे योगवियोग । सृष्टिस्थितिलयकर्मेंचांग । तो तूं अव्यंग आदिपुरुष ॥३९॥
अगा ये विश्वात्मका हरी । सृष्टिस्थितिलयगुणानुकारीं । कर्में होती तुजमाझारी । निश्चयात्मकें तव सत्ता ॥२४०॥
किल या निश्चयें ऐसिया तूतें । आज शरण मी आलें निरुतें । जाणोनि अभय वोपीं मातें । मम विनतीतें अवधारीं ॥४१॥

चिरान्मृतसुतादाने गुरुणा किल चोदितौ । आनिन्यथुः पितृस्थानाद् गुरवे गुरुदक्षिणाम् ॥३२॥

काय विनति म्हणाल जरी । तरी गुरुपुत्र मेला चिरकाळवरी । त्या आणावयाची आज्ञा वैखरी । गुरूनें करितां तुम्हांप्रति ॥४२॥
तुम्ही ते आज्ञा वंदूनि माथां । चिरकाळ मेलिया गुरुसुता । यम सदनींहूनि तो त्वरिता । आणिते जालेती आश्चर्यें ॥४३॥
गुरुपुत्र आणोनि सवेग तुम्हीं । गुरुदक्षिणेच्या नियमीं । अर्पूनि तोषविला गुरुस्वामी । तैसीच पैं मी प्रार्थितसें ॥४४॥

तथा मे कुरुतं कामं युवां योगेश्वरेश्वरौ । भोजराजहतान्पुत्रान्कामये द्रष्टुमाहॄतान् ॥३३॥

तैसाच माझा मनोरथ । पूर्ण करावा तुम्हीं त्वरित । भोजराजें वधिले सुत । त्यातें येथ आणावें ॥२४५॥
तुम्हीं आणिलिया मृतसुतांतें । देखों इच्छिजे माझेनि चित्तें । माझी प्रार्थना इतुकी तुम्हांतें । स्वसामर्थ्यें पुरवावी ॥४६॥
कंसें वधिले आम्हांपूर्वीं । ते आणावे कोठूनि केंवी । ऐसी सहसा न वदा गोवी । तुम्ही गोसावीं ईशांचे ॥४७॥
ईश्वरांचे ईश्वर तुम्ही । हें जाणोनि मी हृदयपद्मीं । मृतपुत्रांच्या दर्शनकामीं । उत्सुक जालें आत्मज हो ॥४८॥

ऋषिरुवाच - एवं सञ्चोदितौ मात्रा रामः कृष्णश्च भारत ।
सुतलं संविविशतुर्योगमायामुपाश्रितौ ॥३४॥

शुकमुनि म्हणे भारतेश्वरा । ऐसिया प्रकारें उभयकुमरां । प्रेरिती जाली वसुदेवदारा । जाणोनि ईश्वरां निजतनयां ॥४९॥
प्रेरिले होत्साते मातेनें । तयेचिया आज्ञावचनें । लंघिते जाले पाताळभुवनें । मनुष्यपणें जे नतले ॥२५०॥
रामकृष्ण दोघे जण । योगमाया अवलंबून । ठाकिते जाले बळीचें सदन । सुतळ अभिधान पैं ज्यातें ॥५१॥

तस्मिन्प्रविष्टावुपलभ्य दैत्यराड्विश्वात्मदैवं सुतरां तथात्मनः ।
तद्दर्शनाह्लादपरिप्लुताशयः सद्यः समुत्थाय ननाम सान्वयः ॥३५॥

अकस्मात ते सुतळभुवनीं । प्रविष्ट जाले बंधु दोनी । अवचित त्यांतें देखोनि नयनीं । दैत्येन्द्र मनीं हरिखेला ॥५२॥
आत्मत्वें जे विश्वदैवत । बरव्या प्रकारें स्वभुवनीं प्राप्त । तैसेचि आपुलें अंतरगत । उपास्यदैवत जाणोनि ॥५३॥
तयांच्या दर्शनाल्हादें करून । आनंदप्रचुरित अंतःकरण । तत्काळ उठिला आसनींहून । परिवारजन सह अवधा ॥५४॥
चरणांवरी ठेवूनि शिर । निवान्त पडिला दंडाकार । तैसाचि परिवारजन समग्र । करिती सादर दंडवतें ॥२५५॥
दंडवता नंतर पाहीं । आळंगिती दोहीं बाहीं । दिव्यासनीं त्या लवलाहीं । प्रेमप्रवाहीं बैसविलें ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP