अध्याय ८५ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - आकर्ण्येत्थं पितुर्वाक्यं भगवान्सात्वतर्षभः ।
प्रत्याह प्रश्रयानम्रः प्रहसन्श्लक्ष्णया गिरा ॥२१॥

इत्थं म्हणिजे साद्यंतवरी । ऐकोनि पितयाची वैखरी । सात्वतर्षभ जो भगवान् हरी । मधुरोत्तरीं दे प्रतिवचन ॥९४॥
समर्याद नम्रपणें । हास्य करूनि प्रसन्नवदनें । बोलता जाला सुललितवचनें । सावधपणें तियें परिसा ॥१९५॥

श्रीभवागनुवाच - वचो वः समवेतार्थं तातैतदुपमन्महे ।
यन्नः पुत्रान्समुद्दिश्य तत्त्वग्राम उदाहृतः ॥२२॥

भगवान् म्हणे जनकाप्रती । तुमचें वाक्य यथार्थरीती । बोलिलां प्रतिपाद्य जें वेदान्तीं । तें मी श्रीपती सम्मानीं ॥९६॥
तें वाक्य म्हणाल कैसें कोण । आम्हां पुत्रांतें विषयी करून । बोलिला तत्वसमूह संपूर्ण । तत्वशोधन जें म्हणिजे ॥९७॥
अहंता ममता मायाभ्रांति । तत्वविचारें येचि रीती । निरसावी हें जनकाप्रती । सांगे श्रीपती तें ऐका ॥९८॥

अहं यूयमसावार्य इमे च द्वारकौकसः । सर्वेऽप्येवं यदुश्रेष्ठ विमृश्याः सचराचरम् ॥२३॥

भो यदुश्रेष्ता मम जनका । जैसी निरसूनि पुत्रत्वशंका । करूनि तत्वाच्या व्यतिरेका । वास्तव वरिलें ॥९९॥
तैसीच आतांही शिकवण । अहं वसुदेव आपण । यूयं म्हणिजे तुम्ही स्वजन । आर्य हा जाण बळराम ॥२००॥
आणि हे द्वारकानिवासी सकळ । अष्टादशधा यादवकुळ । ब्रह्मावबोधेंचि प्राञ्जळ । शोधिजे केवळ भ्रमरहित ॥१॥
द्वारकानिवासी मात्र म्हणसी । तरी ब्रह्मबोधेंचि चराचरांसी । जाणिजे अखिल ब्रह्माण्डासी । निश्चयेंसीं वृष्णीशा ॥२॥
जरी तूं म्हणसी भो मम जनका । विकारवंता गौणा मायिकां । ब्रह्मत्वबोधीं उपजे शंका । तरी या विवेका अवधारीं ॥३॥

आत्मा ह्येकः स्वयं ज्योतिर्नित्योऽन्यो निर्गुणो गुणैः । आत्मसृष्टैस्तत्कृतेषु भूतेषु बहुधेयते ॥२४॥
खं वायुर्ज्योतिरापो भूस्तत्कृतेषु यथाशयम् । आविस्तिरोऽल्पभूर्येको नानात्वं यात्ससावपि ॥२५॥

सदृष्टान्त श्लोकद्वयें । कथितों तें तूं यथान्वयें । जेंसै प्रतीतिगोचर होये । ऐकें तैशिये सादर तें ॥४॥
आकाश वायु ज्योति सलिल । भूमी सहित हा महाभूतमेळ । तिहीं केला जो कार्यरोळ । त्यामाजी केवळ वर्तती तियें ॥२०५॥
कुड्य मेडक वप्रें सदनें । भूकृतकार्यें थोरें लहानें । होती जाती तदनुकरणें । अविकारपणें भू तेथें ॥६॥
कीं नानाबीजां बीज जीवन । विरूढें कार्यरूपें आपण । परी त्यामाजि वास्तव रसाळपण । वर्ते अभिन्न होत्सातें ॥७॥
तैसेंचि तेज बहुधापणीं । स्थावरीं जंगमीं कां इन्धनीं । अभिन्न असतां भिन्नपणीं । दिसे न होनी बाहुल्यें ॥८॥
नभ नभस्वान् याचि परी । बहुधा न होनी बहुविकारी । भासती स्वकृतकार्यानुसारीं । तियाचि परी आत्मा ही ॥९॥
आत्मा निर्गुण गुणातीत । आत्मसृष्टगुणीं तेथ । देहादि गौणीं आविर्भवत । बहुधा गमत अद्वय जो ॥२१०॥
गौणा अनेक जिया उपाधी । तैसाचि भासे तो निरुपाधी । अनेकगुणकार्यप्रभेदीं । होणें जाणें स्वयें दावी ॥११॥
यथाशय म्हणिजे उपाधिरूप । स्वयें भासोनि निर्विकल्प । वास्तव अमळ नित्य निर्लेप । प्राकृत विकल्प जल्पतां ही ॥१२॥
गुणीं वर्तोनि गुणातीत । सहेतुपदीं प्रतिपादित । श्रोतीं तेथ ठेवूनि चित्त । चिज्जडपदार्थ शोधावा ॥१३॥
स्वयें असोनि एकला एक । बहु दर्पणें करितां सम्मुख । त्यां माजि दर्पे पृथक्पृथक । न होनि अनेक देहधारी ॥१४॥
आत्मादेहातीत सहज । अनेक देहीं उपाधिभोज । नाचे नटोनि अचोज चोज । प्रकृतिकाज प्रकटोनी ॥२१५॥
आत्मा केवळ स्वयंज्योती । दृश्यीं दृश्यपणें ये व्यक्ती । करणगोचर भौतिकीं भूतीं । असोनि निश्चिती अगोचर ॥१६॥
नित्य असोनि अनित्यापरी । अनित्यीं अनित्यत्व स्वीकारी । अन्य असोनि जडविकारी । अनन्यत्वा प्रकाशी ॥१७॥
निर्गुण नटे सगुणपणें । इत्यादि बाहुल्य उपाधिगुणें । श्रीधरस्वामींच्या व्याख्यानें । वाखाणिलें हरिवरदें ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP