श्रीगोपालकृष्णाय नमः ।
गोविंदा जी गुणातीता । गुणसंपन्ना गुणैकभरिता । स्वात्मारामा स्वात्मनिरता । परावरता तुज तुझी ॥१॥
गोशब्दार्थ बोलिजे दृक् । तेथ प्रकाशे तवास्तिक्य । येर दृश्यें सहित अर्क । जड मायिक गोचर ॥२॥
तुझिया दृक्त्वावीण चक्षु । जरी कां शके दृश्य लक्षूं । तरी पाषाणादि प्रतिमा दक्ष । होती स्वपक्षईक्षणीं ॥३॥
तुझे दृष्टींत जें देखणें । जरी तें झळके मायिक गुणें । तरी ते माया होऊंच नेणे । मायेसि प्राणें शेखीं घे ॥४॥
माया नसोनि भुलवूं शके । परी बळा नयेचि स्वआस्तिक्यें । शोधितां अतन्निरासनमुखें । घेऊनि लटिकें स्वयें निमे ॥५॥
साच तुझेनि माया साच । दिसे दृष्टीस प्रपंच । तो हा चिद्विलास नटनाच । नोहे आहाच कैं कोजा ॥६॥
जेव्हां आत्मत्वीं समरस । तैंचि मायेचा निरास । तरी माया जाणिली हें म्हणणें फोस । कीं यश अपयश मायाची ॥७॥
दुकळीं मरूनि जिंकिला काळ । म्हणतां काळचि जयनशीळ । तैसा आत्मा अखंड अमळ । मायारोळ सरिसाची ॥८॥
आत्मत्वाचा जो अनुभव । तोही मायेचा गौरव । तेव्हां मायेसगट ठाव । तूं सद्भाव उभयत्र ॥९॥
निमिषोन्मेष बोधाबोध । प्रकटिता तूं एवंविध । म्हणोनि दृग्द्रष्टा गोविंद । म्हणती वेद चक्षुष्मान् ॥१०॥
तवास्तिक्य भ्रमाश्रय । तैंचि भव हा मायामय । तेथूनि अवघा गुणान्वय । तुजहूनि काय तो भिन्न ॥११॥
माया मिथ्या संदेहरहित । तैं तूं स्वयंभ गुणातीत । गुणाश्रयत्वें अन्वयवंत । तूं समस्तगुणात्मा ॥१२॥
रूपाश्रयें जेंवि छाया । तेंवि तुझेनि सत्त्वें सन्मय माया । गुणमयीच्या गुणात्मया । गुणसंपन्ना तुज नमो ॥१३॥
अनंतअचिंत्यगुणपरिपूर्णा । गुणैकभरिता गुणनिधाना । गुणविभ्रमा चित्सुखघना । निजात्मरमणा निरुपाधे ॥१४॥
तूं कोठूनि कोठवरी । केवढा कितुका कोणेपरी । तूंचि तुझे आंत बाहेरी । परावरीं अभिज्ञ ॥१५॥
पंचभूतांचें निरसन । अष्टधाप्रकृति समूळ लीन । शुद्धसत्त्वादिस्फुरणावीण । ब्रह्म निर्गुण जें नुसधें ॥१६॥
त्या तुज तुझी परावरता । दिग्विभागव्यवस्थारहिता । काळादिपरिच्छेदवर्जिता । अपरिच्छीन्ना सद्गुरो ॥१७॥
अद्वैता तूं द्वैतावीण । तैं हें अवघेंचि तूं जाण । ऐसा अभेद अकिंचन । तैं नमिता भिन्न तो कैंचा ॥१८॥
मनें नुरोनि अभिन्न नमन । स्वानंदतुष्टि सुप्रसन्न । सप्रेम स्वामीचें वरदान । भगवद्गुणगणवर्णनीं ॥१९॥
जेथ अभेद नम्य नमिता । याभिन्न कैंचा श्रोता वक्ता । गणेशशारदासद्गुरुसंतां । एकात्मता प्रणाम ॥२०॥
ऐसें करूं जातां नमन । हृदयीं प्रेमा नसंटोन । गोविंदाचें सद्गुण ध्यान । ते आठवण द्वैताची ॥२१॥
जैसें निर्गुणीं प्रथम स्फुरण । सच्चिदानंदात्मक प्रकटून । अनंत ब्रह्मांडें निर्माण । करित्यावीण कर्तृत्व ॥२२॥
तैसें सद्गुरुकृपेचें वारें । भरूनि उचंबळे करणद्वारें । प्रेमा प्रज्ञेसि नावरे । स्वसुखोद्गारें टवटवित ॥२३॥
सूर्य पांघुरला निजप्रभा । उणीव न करिते जैं बिंबा । तैं अपारगुणींच्या वेंठे लाभा । कीं हानिक्षोभालासीं चढें ॥२४॥
तैसा सगुणीं दुर्गुणा लाभ । संचला तैसाचि स्वानंदकुंभ । विशेष भजनाचें बालभ । न फवे कोंभ भेदाचा ॥२५॥
हारी न पवोनि झुंज खेळणें । तैं काय उदमाहूनि तें उणें । सगुणीं भजतां भेदाविणें । ते समाधि न म्हणे कोण पां ॥२६॥
समाधि संचले मुद्दल घरीं । भजनभाग्याची सामग्री । सत्संगाच्या लाभावरी । जगदुद्धारीं हरिकीर्ति ॥२७॥
न मोडतां हे राहटी । सप्रेमभजनाच्या परिपाठीं । अभेदबोधें वर्ते सृष्टि । चित्सुख पुष्टितुष्टिद ॥२८॥
जेथ हा अपरोक्ष अनुभव । तेथ कैंचा नाथिला भव । द्वैताद्वैत दोन्ही वाव । अवघी माव भ्रमभ्रांति ॥२९॥
द्वैत मुळींच झालें नाहीं । त्याचें निरसन करणें कायी । यालागीं भगवद्गुणप्रवाहीं । निःसंदेहीं प्रवर्तें ॥३०॥
गोविंदाची सगुण मूर्ति । आठवितां हे दिधली स्मृति । सगुण निर्गुण उभयप्रणति । अभेदभक्ति याचिली ॥३१॥
तंव सद्गुरु म्हणती सावध होयीं । दशमस्कंधीं शेषशायी । लीला पंचदशाध्यायीं । करितां काय जाहला ॥३२॥
तिये शुकोत्क्तीची टीका । महाराष्ट्र करूनि सद्भाविकां । मिळवावें श्रवणसुखा । आदेश इतुका ये काळीं ॥३३॥
ऐसें आज्ञेचें गौरव । आह्लादपीयूषें दयार्णव । भरला तेथ नलगे ठाव । संशयसैंधवगिरिवरा ॥३४॥
ब्रह्मस्तुति चतुर्दशीं । कथिल्यानंतर पंचदशीं । पौगंडवयीं हृषीकेशी । झाला धेनूसि गोपक ॥३५॥
तेथ करितां गोगोपन । लीला केलें धेनुकार्दन । कालियविषें गोगोपमरण । पावतां संपूर्ण रक्षिले ॥३६॥
पंचदशीं कथा इतुकी । शुकें कथिली सकौतुकीं । परीक्षिति ऐसी श्रवणमुखीं । श्रोतृचातकीं प्राशिजे ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP