अध्याय १५ वा - श्लोक ४ ते ७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स तत्र तत्रारुणपल्लवश्रिया फलप्रसूनोरुभरेण पादयोः ।
स्पृशच्छिखान्वीक्ष्य वनस्पतीन्मुदा स्मयन्निवाहाग्रजमादिपूरुषः ॥४॥

तो श्रीकृष्ण आदिपुरुष । जेथ जेथ करी प्रवेश । तेथ तेथ आश्चर्यास । देखोनि तोष पावतसे ॥७६॥
वृक्ष वल्ली गुल्म लता । अरुणपल्लवश्रियान्विता । फळीं पुष्पीं सुसफलिता । म्हणोनि नम्रता अग्रांसी ॥७७॥
निष्कामसुकृतें आलीं फळां । सुमनीं सप्रेम परिमळा । लाहोनि वंदिती श्रीपादयुगळा । स्वभाग्यसोहळा अर्पूनी ॥७८॥
शुद्धसंपत्तिविनयवंत । अवंचकत्वें सप्रेमभरित । भगवद्भावें विश्वीं भजत । ते हे एथें द्रुमरूपी ॥७९॥
देखोनि ऐशिया द्रुमातें । सर्ववेत्ताही आश्चर्यातें । पावला ऐसा अग्रजातें । तोषोनि चित्तें वदतसे ॥८०॥

श्रीभगवानुवाच - अहो अमी देववरामरार्चितं पादांबुजं ते सुमनःफलार्हणम् ।
नमंत्युपादाय शिखाभिरात्मनस्तामोपहत्यै तरुजन्म यत्कृतम् ॥५॥

रामासि म्हणे कमलावर । अवघे सुअर्वर हे तरुवर । फलदलसुमनीं पूजोपचार । अर्पिती सादर तव चरणीं ॥८१॥
तव पदपद्में अमरार्चित । ते सुरतरुवररूपें एथ । तव पदप्रेमा निसर्गजनित । लाहूनि भजत तवचरणा ॥८२॥
म्हणसी लवती काय म्हणून । तरी तव चरणां करिती नमन । तरी हे अवघे सुरवरगण । पादार्हणपूर्वक ॥८३॥
रिक्तपाणि न कीजे नमन । हें कळलें म्हणसी यां कोठून । तरी हे अवघे सुरवरगण । म्हणोनि हे खूण विदित यां ॥८४॥
जेणें पापें मूढ योनि । पावले त्या तमोपशमनीं । प्रेमा स्फुरोनि अंतःकरणीं । तव पदभजनीं अनुराग ॥८५॥
कीं तूं साक्षात्परमेश्वर । तुवां दिशलें तरुशरीर । जें सर्वस्व उपकारपर । नमिती सादर त्या तूंतें ॥८६॥
इतुकें नमनाचें कारण । वृक्षरूप जें अज्ञान । त्याचें व्हावया उपशमन । तुझे चरण सेविती ॥८७॥

एतेऽलिनस्तव यशोऽखिललोकतीर्थं गायंत आदिपुरुषानुपदं भजंते ।
प्रायो अमी मुनिगणा भवदीयमुख्या गूढं वनेऽपि न जहत्यनघात्मदैतम् ॥६॥

अखिललोकशमलहर । तें तव यशाचें चरित्र । मुनीश्वरचि होऊनि भ्रमर । गाती सादर सप्रेमें ॥८८॥
भवदीय म्हणिजे तुझे भक्त । बहुतेक ते हे ऋषि समस्त । निगूढवेषें भ्रमरीभूत । होऊनि वर्णित तव यश पैं ॥८९॥
तुझिया यशाचें चरित्र । लोकत्रयीं जें तीर्थतर । सकळ तीर्थांचें माहेर । गाती मुनिवर अलिरूपें ॥९०॥
अनघ म्हणिजे शमलशूल्य । तो तूं आत्मा संकर्षण । मनुष्यवेष अवलंबून । गूढ होऊन क्रीडसी ॥९१॥
तेथही निमेषरहित । तव यश गाती अतंद्रित । निगूढ भ्रमरवेषा आंत । भजती संतत पदपद्मा ॥९२॥
गूढवेषें मनुष्यपणीं । घेऊनि पशुपांची अवगणी । जरी क्रीडसी वनोपवनीं । परी हे मुनि न त्यजिती ॥९३॥
तुज जाणोनि आत्मदैवत । निस्सीमप्रेमें भजनीं रत । आदिपुरुषा अनुपद गात । षट्पदचित करूनी ॥९४॥
जरी लपसी मायापडळीं । तरी न त्यजिती तुज हे अलि । निश्चळ बैसोनि अष्टदळीं । नामावळी पढताती ॥९५॥

नृत्यंत्यमी शिखिन ईड्य मुदा हरिण्यः कुर्वंति गोप्य एव ते प्रियमीक्षणेन ।
सूक्तैश्च कोकिलगणा गृहमागताय धन्या वनौकस इयान् हि सतां निसर्गः ॥७॥

स्तवनार्ह भो संकर्षण । पैल पाहें हे कलापिगण । करिती आनंदें नर्तन । तुजलागोन तोषार्थ ॥९६॥
पैल हरिणींचे समुदाय । स्थिरावूनि गोपीप्राय । अमृतईक्षणें करिती प्रिय । तो अभिप्राय मज विदित ॥९७॥
पैल पाहें कोकिलागण । पंचमस्वरें करिती गान । कीं हें मुनींचें सूत्रपठण । तव तोषणप्रियकाम ॥९८॥
हाचि संतांचा स्वभाव । आश्रमा आलिया महानुभाव । त्यांसि अर्पूनि संपत्ति सर्व । होणें सदैव तत्तोषें ॥९९॥
तेंवि हे अंडजमृगाळिवृक्ष । स्वसंपत्तिविनयीं दक्ष । धन्य वनौकसांचें लक्ष । भजनसापेक्ष सर्वदां ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP