अध्याय १५ वा - श्लोक १३ ते १७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


चकोरक्रौंचचक्राह्वभारद्वाजांश्च बर्हिणः । अनुरौति स्म सत्वानां भीतवद्व्याघ्रिसिंहयोः ॥१३॥

चकोरांपरी अमृतपान । चंद्रीं गोऊनि मनाचे नयन । कुनुदा ऐसें मृदुलपण । हें अनुकरणें अनुकरती ॥३९॥
क्रौच वळंघे गगनपृष्ठीं । भूपरमाणु लक्षी दृष्टी । ते हे भूचरीची गोष्टी । स्वयें जगजेठी अनुकरी ॥१४०॥
चक्रवाकें मिथुनीभूत । वियोग अणुभरी न साहत । रात्रीं अंधत्ववियोगें रडत । तेंवि गृहस्थ संसारीं ॥४१॥
दाऊनि तयांचे अनुकार । होती निःशंक क्रीडापर । भारद्वाजा ऐसे चतुर । स्वच्छंदपर सर्वदां ॥४२॥
मयूर जैसे आत्माराम । नाचती जाणूनि माधवागम । तेही अनुकार पुरुषोत्तम । दावी संभ्रम क्रीडोनी ॥४३॥
व्याघ्रसिंहाचिया भेणें । प्राणी करिती पलायनें तें देखोनि स्वयें कृष्णें । तदनुकरणें दाविजती ॥४४॥
व्याघ्रसिंहा भेणें प्राणी । करुणास्वरें रुदती रानीं । तैसे अनुकार दावूनी । वनोपवनीं क्रीडती ॥१४५॥
आतां तारतम्याची परी । स्वयें क्रीडोनि दावी हरि । हेंचि जाणोनियां चतुरीं । आत्यादरीं पाळिजे ॥४६॥

क्कचित् क्रीडापरिश्रांत गोपोत्संगोपबर्हणम् । स्वयं विश्रमयत्यार्यं पादसंवाहनादिभिः ॥१४॥

कृष्ण ब्रह्मांडनायक । मर्यादेचा पाळी अंक । जेष्ठसेवेचें कौतुक । दावी सेवक होऊनी ॥४७॥
सधर्म देखोनि मुखारविंद । तेणें श्रमित जाणोनि बंधु । दावी सेवेचा अनुवाद । करुणासिंधु श्रीकृष्ण ॥४८॥
कोणेकेसमयीं श्रीकृष्ण । श्रमित जाणोनि संकर्षण । गोपोत्संग उपबर्हण । करवी शयन मृदु शय्ये ॥४९॥
स्वयें आणूनि जीवन । करी पादप्रक्षाळण । नलिनीदळांचा करूनि व्यजन । मधुसूदन वीजितसे ॥१५०॥
मृदुतळहातीं श्रीहरि । अग्रजाचे चरण चुरी । गंधपुष्पादि उपचारीं । श्रम परिहारी मृदुवचनीं ॥५१॥

नृत्यतो गायतः क्कापि वल्गतो युध्यतो मिथः । गृहीतहस्तौ गोपालान् हसंतौ प्रशशंसतु ॥१५॥

ऐसें करूनि श्रमापहरण । पुन्हा कोठें नृत्यगायन । परस्परें रामकृष्ण । बार घालूनि क्रीडती ॥५२॥
दोघे होऊनि ध्रुवस्थानीं । संवगडे घेती विभागूनी । परस्परें वल्गना करूनि । फळिया मांडूनि भांडती ॥५३॥
आपुलाले गडी हातीं । धरूनि त्यांतें प्रशंसिती । येर येरीच्या गडियांप्रति । धिक्कारिती फल्गुत्वें ॥५४॥

क्कचित्पल्लवतल्पेषु नियुद्धश्रमकर्शितः । वृक्षमूलाश्रयः शेते गोपोत्संगोपबर्हणः ॥१६॥

फळिया मांडूनि परस्परें । युद्ध करितां परम निकरें । म्हणती जर्जर झालीं गात्रें । फिरा माघारे झडकरी ॥१५५॥
आपुलालिया संवगडियांशीं । फिरोनि येती द्रुमच्छायेसी । तेथ रचूनि मृदुशय्येसी । विश्रांतीसी पावती ॥५६॥
उपबर्हण म्हणिजे उशी । कल्पूनि गोपोत्संगासी । आस्तरूनि पल्लवासी । मंचकासी कल्पिती ॥५७॥

पादसंवाहनं चक्रुः केचित्तस्य महात्मनः । अपरे हतपाप्मानो व्यजनैः समवीजयन् ॥१७॥

पल्लवतल्पीं युद्धश्रांत । पहुडला देखोनि भगवंत । गडी पुण्यात्मे एक तेथ । संवाहीत पदकमळां ॥५८॥
एक निष्पाप निकटवर्ती । पल्लवव्यजनें घेऊनि हातीं । परमात्मया गोकुळपति । मंद वीजिती सद्भावें ॥५९॥
क्षीराब्धिमाजिं शेषशयन । तेंवि पल्लवतल्पास्तरण । लक्ष्मी होऊनि आपण । एक श्रीचरण चूरिती ॥१६०॥
एक होऊनि निकटवर्ती । मंद मारुत जाणविती । एक निष्काम सत्सुकृती । सुमनें अर्पिती सप्रेमें ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP