मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १५१ ते १५५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१५१.
शेळ्या मेंढियांचा खेळ । आतां खेळूंरे सकळ ॥१॥
कोणी मेंढया होती । कोणी चोर म्हणताती ॥२॥
म्हणती रात्र झाली । आतां निजे वनमाळीं ॥३॥
कोणी श्वान होती । चोरा ड-साया धांवती ॥४॥
तेथें व्योमासुर येत । गोपाळाचा वेष धरित ॥५॥
करोनियां चोरी । नेऊन ठेवी पर्वतदरीं ॥६॥
हें तो देवासि कळलें । नामा ह्मणे संहारिलें ॥७॥

१५२.
कंसासुर सारे करोनि विचार । धाडती अकूर गोकु-ळासी ॥१॥
अकुरा आनंद झाला असे फार । पाहीन श्रीधर डोळे-भरी ॥२॥
आजी होईल माझ्या जन्माचें सार्थक । वैकुंठनायक पाहीन मी ॥३॥
उजवे जाती काक वाम जाती मृग । पाहीन श्रीरंग स्वामी माझा ॥४॥
शुभ हे शकुन मार्गीं हे होताती । पाहीन भूपती वैकुंठींचा ॥५॥
येथूनियां माझी सरली येरझार । कंसानें उपकार केला मोठा ॥६॥
आजी माझे पितर उद्धरती सकळ । पाहींन गोपाळ कृपासिंधु ॥७॥
नामा ह्मणे आला गोकुळासन्निध । ह्लदयीं आनंद न समाये ॥८॥

१५३.
चौदाजणी ज्याच्या चरणातें पूजिती । त्याची घेईन माती आपुल्या शिरीं ॥१॥
एकांतीं अर्चन करिती धूर्जटी । त्यांसी बोलेन गोष्टी आवडीनें ॥२॥
सप्तऋषि ज्याचे वर्णिताताती गुण । करीतसे ध्यान ब्रह्मा ज्याचें ॥३॥
चारी वेद ज्याची वर्णिताती कीर्ति । करिताती स्तुति साहीजण ॥४॥
तेहेतीस कोटि देव जयातें पूजिती । श्रुति वर्णिताती गुण ज्याचे ॥५॥
लक्षुमीचा पति ध्याती सनकादिक । पाहीन श्रीमुख एकवेळां ॥६॥
पृथ्वीचा हा भार करावया दूर । ह्मणोनि अवतार वेत असे ॥७॥
नामा ह्मणे आला यमुनेजवळी । उतरला खालीं रथाचिया ॥८॥

१५४.
धन्य ही यमुना धन्य हें गोकुळ । वृक्षादि सकळ धन्य धन्य ॥१॥
धन्य ह्या गोपिका धन्य हे गोपाळ । पक्षादि सकळ धन्य धन्य ॥२॥
धन्य गोवर्धन धन्य वृंदावन । नंदाचा मंदन क्रीडतसे ॥३॥
धन्य ती यशोदा धन्य तिचा पति । अखंड पाहाती मुख ज्याचें ॥४॥
माया घेवोनियां देव गेला राना । ध्वजवज्रांकुश चिन्हां उमटती ॥५॥
नेत्रीं अश्रुपात उतरे रथाखाले । गडबडोनी लोळे तयावरी ॥६॥
ब्रह्मादिकां दुर्लभ येथील ही माती । घेवोनियां हातीं मुखीं घाली ॥७॥
नामा ह्मणे पुढें चालिला त्वरित । देखे गडियांत परब्रह्म ॥८॥

१५५.
तनु हें आकाश चंद्रमा तें मुख । असे निष्कलंक परी-क्षिती ॥१॥
पूर्णिमेचा चंद्र त्याहूनि अधीक । शोभत श्रीमुख कृष्ण-जीचें ॥२॥
भोंवता हा शोभे नक्षत्रांचा मेळ । खेळत सांवळा जगद्नुरु ॥३॥
वैजयंती माळा किरीट कुंडलें । अक्रूरें देखिले दोघेजण ॥४॥
जोडोनियां हात घाली नमस्कार । वाहतसे नीर क्षणोक्षणीं ॥५॥
नामा ह्मणे त्वरें धांवे ह्लषिकेशी । धरीत पोटाशीं अक्रूरातें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP