मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग ७६ ते ८०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


७६.
ओळखे बापाला । ब्रह्मा धावोनियां आला ॥१॥
नेत्रीं अशूचिया धारा । कांपतसे थरथरा ॥२॥
घाली नमस्कार । ह्मणे अपराधी मी थोर ॥३॥
जोडोनियां हात । नामा ह्मणे स्तुति गात ॥४॥

७७.
श्रवणमात्रें जळती पापाचे पर्वत । ऐकें ब्रह्मगीत शूक ह्मणे ॥१॥
धरूनि विश्वास करी जो पठण । तरेल तो जाण भवसिंधूं ॥२॥
आपण तरेल नव्हे हें नवल । कुळें उद्धरील सप्तही तो ॥३॥
एकेक अक्षर निर्दळील महा पाप । करा याचा जप शौनक हो ॥४॥
नाम घेतां धांवे अनवाणी पाय । कोमळ ह्लदय कृष्णाजीचें ॥५॥
न विचारितां याति कुळ अमंगळ । न पाहे काळ वेळ धांव घेई ॥६॥
शरणागता नेदी काळाचिये हातीं । नामा ह्मणे चित्तीं दृढ धरा ॥७॥

७८.
जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तयालागीं ॥१॥
तोचि गोकुळांत होउनि गोवळ । म्हणवितो बाळ यशोदेचा ॥२॥
चिन्मय चिद्रुप अक्षई अपार । परेहूनि पर ह्मणती ज्यातें ॥३॥
सर्वां भूताचे फुटकिये खोळे । भरलें न गळे आत्मपणें ॥४॥
आनंदी आनंद मातला अपार । वेदालाही पार नाहीं ज्याचा ॥५॥
नामा ह्मणे सर्वरूपें जें रूपस । गोकुळीं विलास मांडियेला ॥६॥

७९.
अवतरले हरी नंदाचे मंदिरीं । जाणोनियां सुरीं तोषि-जेत ॥१॥
आतां गेली सर्व आमची चिंता । भूभार सर्वथा उतरील ॥२॥
यज्ञ दान तप होतील अपार । आमुचा आहार आह्मांलागीं ॥३॥
दुष्ट दुराचारी मातले राक्षस । यांचा करिल नाश क्षणामाजी ॥४॥
नीति न्याय धर्म वाढेल अपार । भाविकांसी पार उतरील ॥५॥

८०.
वाढो लागे हरि नंदाचे मंदिरीं । नाना क्रीडा करी नित्य नवी ॥१॥
देखोनियां चोज भुलल्या नरनारी । देहभावें वरी वोंवाळिती ॥२॥
सांवळें गोजिरें दिसे नेत्रालागीं । ह्मणोनि वोसंगी सदा घेती ॥३॥
नाचे उडे बोले मंजुळ बोबडे । तेणें वेदां पडे मौन्य सदा ॥४॥
नित्य नवी लीला दाखवी अपार । मन तेथें स्थिर लांचावलें ॥५॥
नामा म्हणे गोप त्यासंगें रतले । प्रेमानें मातले एकसरें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP