विवाह संस्कार सोळा संस्कारांपैकी एक आहे. विवाह फक्त शारीरिक संबंध नसून, वंशवृद्धी हे प्रमुख कारण आहे.
मानवी विवाहाचे सामाजिक व गुणवत्तेच्या श्रेष्ठताक्रमानुसार आठ प्रकार पडतात-
१) ब्राह्म - वराला स्वगृही बोलावून सालंकृत कन्या विधीपूर्वक देणे.
२) दैव - यज्ञात ऋत्विजाला यथाशक्ती अलंकारभूषित कन्या देणे.
३) प्राजापत्य - वधूवरांनी परस्परानुकूल आणि धर्मनिष्ठपणे रहावे असे वचन घेऊन कन्या देणे.
४) आर्ष - वराकडून धेनु आणि अश्व स्वीकारून त्याबदली वधू पित्याने कन्या देणे.
५) गांधर्व - प्रणयबद्ध स्त्री-पुरुषांनी आजन्म पती-पत्नि धर्माप्रमाणे राहाण्याचे स्वतःच ठरविणे.
६) आसुर - कन्या पित्याला यथेष्ट द्रव्य आणि अलंकार देऊन कन्या विवाह करून नेणे.
७) पैशाच - कन्यापिता अथवा कन्या निद्रिस्त अथवा बेसावध असता कन्याहरण करून तिच्यासमवेत विवाह करणे.
८) राक्षस - कन्यापित्यासमक्ष कन्याचे तिच्या इच्छे विरुद्ध अपहरण करून, विरोध करणार्याची हिंसा करून आणि कन्येचे आप्त आणि स्वतः कन्या रडत असता तिच्या समवेत विवाह करणे.
विवाह मुहूर्ताची निश्चिती
उदगयन आपूर्यमाणे पक्षे, कल्याणे नक्षत्रे,
चौलकर्मोपनयन गोदान विवाहा;
सार्वकालमेके विवाहम् ।
(आश्व. गु १)
उत्तरायणात, शुक्ल पक्षामध्ये, तसेच नक्षत्र, तिथी, योग, आणि करण ही सारी शुभ आणि कल्याणकारक असताना ’चौल’, ’उपनयन’, ’गोदान’ आणि ’विवाह’ हे संस्कार करावेत.
विवाहासाठी कल्याणकारक शुभ तिथी-नक्षत्रे
विवाहासाठी कल्याणकारक असे शुभ महिने, तिथी, योग, करणे, आणि नक्षत्रेपुढील प्रमाणे होत -
१) शुभ महिने - वैशाख, ज्येष्ठ, मार्गशीर्ष, माघ आणि फाल्गुन हे पाच महिने.
२) शुभ तिथी - कृष्ण त्रयोदशीपासून शुक्ल प्रतिपदेपर्यंतच्या चार दिवसांचा अपवाद वगळता अन्य सर्व तिथी.
३) शुभ योग - परिघ योगाचे ’पूर्वार्ध’, ’व्यतिपात’, ’वैधृति’ यांचा अपवाद वगळता अन्य सर्व योग.
४) शुभ करण - भद्रेचा अपवाद वगळता अन्य सर्व करणे.
५) शुभ नक्षत्रे - रोहिणी, मृग, मघा, उत्तरा, फाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा, मूळ, उत्तर आषाढ, उत्तर भाद्रपदा, आणि रेवती ही अकरा नक्षत्रे.
आदर्श वधूची लक्षणे
वराप्रमाणेच वधूही बुद्धिमत्ती, रूपवती, निरोगी, सुशील, आणि लक्षणसंपन्न (म्हणजे ’वंध्यत्व’ ’पतिघातित्व’, आदि दुर्लक्षणांपासून अलिप्त) असावी.
वधूची अष्टलक्षणे
१) चार सुलक्षणे - १. धनधान्यसंपन्नता २. धेनू, वृषभ आदि पशुसंपन्नता ३. वेदशास्त्रपारंगतता ४. ऐश्वर्य संपन्नता.
२) चार कुलक्षणे - १. द्यूतासक्तता; २. व्यभिचारिता ३. दरिद्रता ४. पतिघ्नता.
आदर्श वराची लक्षणे
वर हा बुद्धिमान, विद्वान, सुशील तर असावाच, परंतु त्याप्रमाणेच वाङ्निश्चय संकल्पान्तर्गत निर्देशिल्याप्रमाणे तो अव्यंग, अपतित, अक्लीब, तसेच उन्मत्तता, उपजीविका रहितता, अपस्मार, कुष्ठ, विवाहपराङ्मुखता, अक्षरशत्रुत्व आदि दोषापासून अलिप्त असावा.