श्रीमहालक्ष्मी-व्रत करणार्यांसाठी व्रत-नियम
हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाराने लवकर उठून स्नान करावे व शरीराने, मनाने निर्मळ होऊन पूजा-विधी करावा.
कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल, दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मीव्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटोसमोर बसून श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा व माहात्म्य वाचावे.
उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी-वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्रीमहालक्ष्मीस्वरूप समजून त्यांना हळदी-कुंकू देऊन प्रसाद म्हणून एकेक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री-पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात.
व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे.
पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात.
हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली, तर पूजा-आरती दुसर्या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये.
एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा-आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल, त्यांनी ते रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा. फलाहार घ्यावा.
व्रत-पूजा व श्रीमहालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी-पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने माहात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथीवाचन चालू असताना श्रीमहालक्ष्मीचे अप्रत्यक्षरीत्या अस्तित्व जाणवेल. एकाग्रता व मनाची शुद्धता असणार्यांनी बर्याचदा सुवासाची चांगलीच जाणीव जाणवेल.
व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे.
व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा.