आर्या [गीति].

अव्यक्त व्यक्त तैसा निर्गुण सगुणा रुपास जो धरितो ।
सद्गति जगता देओ विश्वंभर विश्वपालिता हरि तो ॥१॥

सृष्टिकर्त्याची काय ही लीला !

पद (सिंहासनी बैसेल० या चालीवर)

वसंत ऋतुच्या उदयें व्हावी भूदेवी तुष्टती । नवनव दावी नवलाकृती ॥
विविध फलांनीं मंडित तरुवर पुष्पलता शोभती । भ्रमरहि गुंजारव सेविति ॥
पूर्ण जलाशय तडाग विलसति गाती कोकिळतती ।
निर्मळ रजनी चंद्र द्युती ॥१॥

वसंतऋतु जावा आणि ग्रीष्मऋतु यावा. चंडकिरण तगहरण तापवी भास्कर अवनीतला । शोषिती तत्कर अखिला जला ॥
अभ्रच्छादित दिसे चंद्रमा, तारांगण लाजती । सरिता देनागति भासती ॥२॥
(इतक्यांत वर्षऋतुचा प्रवेश:)

पद [चालू].

दक्षिण मारुत झंझावतें कंपित भासे धरा ।
चमकती बीजा गगनोदरा ॥ मेघजलानें प्रबल
वाहती सरिता सुखसंभरा । देती आलिंगन सागरा ॥३॥

आणि तसेंच -

पद (चालू)

बालरवीच्या उदयें तल्लिन होती जन संभ्रमें ।
उग्रचि माध्यान्हीं तो गमे ॥ सायंकाळी अस्त पावतां
मंद किरण चालती । गगनीं शशि-तारा हांसती ॥
पूर्ण शशीचा क्षय होतां त्या अंधकार आवरी ।
प्रीति खद्योतीं आदरी ॥४॥

त्याचप्रमाणे -

नवतारुण्यों लाजविती ज्या निजवदनें चंद्राला ।
नयनें कमला हिणवितात ज्या, गमनें मथुरा करिला ॥
वृद्धत्वीं ललना । लपविति दंतभग्न वदना ॥१॥

यांत सृष्टिनियंत्याचा काय हेतु असावा ! सर्वांगपरिपूर्ण,श्रांत लोकांना विश्रांतिदायक, आनंदाचा जनक, सुखाचा मालक, वसंतऋतु सदासर्वकाळ निश्चळ ठेवल्यास, सृष्टिदेवी, परमेष्टीला इष्ट कामेष्टी नवस पुरविणार नव्हती काय ? पर्जन्याची सर समसारखी सर्व पृथ्वीवर झड्ल्यास, दुष्काळास आळा पडणार नव्हता काय ? कोठें पाण्याचे लोट अलोट वाहतात, तर कोठें पाण्याचा घोटच घेण्यास मिळत नसतो, हें काय म्हणून ? तसेंच पहा, पौर्णिमेचा चंद्रमा, निरभ्र आकाश, असा शरदऋतु सदोदित असल्यास, परमेश्वरास कोणी दोष दिला असता काय ? तारूण्यांतील ललनांचें लावण्य अभंग ठेवल्यास निसर्गदेवीस कोणी अव्यंग म्हणणार नव्हते काय ? बालरवीचा कोमल प्रकाश दिवसरात्र दिसल्यास अंध:कारास त्रास झाला असता का ? ... तसेंच हें सारें सृष्टिचक्र --

पद ( चाल मम सुत भरत०)

होतां उदयचि देशाचा । निपजे नृपति सुमति साचा ॥
सचिवहि सुज्ञ तया मिळती । विद्वज्जन लोकीं भरती ॥
सेना शूर वीर म्हणती । धरणी विपुल धान्यदाती ॥
कौशल्याच्या कला वाढुनी, धर्म नीति रमती । व्याधी चौर्य न जगीं वसतीं ॥१॥

तेंच उलट झाल्यावर -

पद (चालू)

मत्सर खलबल जनिं राहे । राजा लोक भीति वाहे ॥
प्रजेचा कोप जगीं वसतां । शांती सोडी भूकांता ॥
व्याधी दुष्काळा भरती । अवनति दुष्कर्मे वरती ॥
धर्मनीतिच्या आपत्तीनें, कीर्ती नच राहे । अवनी चिंतानल वाहे ॥२॥

काय पहा, पृथ्वीचा मालक, लोकांचा पालक, म्हणून महाराजाला विष्णुस्वरुप मानतात, सन्मान देतात, पूजन करतात, तोच काळ फिरला म्हणजे लोकांस उग्र काळाप्रमाणें भासतो आहे. पदवंदन करणारे शिरच्छेद करण्यास उद्युक्त होतात, आज्ञेची वाट पाहणारे अवज्ञा करण्यास सरसावतात ..... या गोष्टीचा उकळ मानवबुद्धीला लागणें महत्कठीण. तेव्हां असेंच म्हणावें लागतें --

पद (चालू)

प्रभुची अगम्य हे लीला । लागे थांग न कवणांला ॥
कोठें होय अनावृष्टी । प्रलयें बुडत कुठें सृष्टी ॥
कोठें धान्या समृद्धी । कोठें होय क्षुधावृद्धी ॥
कोठें धड ना लंगोटी । कोठें खेळति नव कोटी ॥
उच्च मंदिरें, नाच चालती, कोठें गायनकला ।
कोठें भोगवि भिक्षाच्छला ॥६॥

बरें, एकीकडे सुख तर एकीकडे दु:ख, असें म्हणावें तर -

पद (चालू)

लक्ष्मी भरजरी बहु भरला । व्याधि न सोडी देहाला ॥
वसती अष्टभोग सदनीं । ओढिती रोग अन्नवदनीं ॥
लोटे अपार संपत्ती । संततिनाशें हळहळती ॥
जेथें दरिद्र वीस विसवे । अगणित संतति तैं प्रसवे ॥
राजयौषिता पुत्र कामिका, नवसिति देवाला ।
होई शक्य न परि त्याला ॥ प्रभुची ० ॥४॥

हें तरी काय थोडेंच -

पद (चालू)

दुर्मिळ ज्यांस धान्य दाणा । अवचित होई तो राणा ॥
मिरवति बैसुनि गजयानीं ! घटिंतचि चालति अनवाणी ॥
हिणविति मूर्ख म्हणुनि ज्याला । सहजीं नमिति सुज्ञ त्याला ॥
दासदासिंचे कलप भोंवतीं, राखित जो गाई ।
हांसे इतर जना पाहा ॥ प्रभुची० ॥५॥

याहीपेक्षां -

पद (चालू)

राजा श्रेष्ठ चक्रवर्ती । सैन्या शौर्या ना गणती ॥
सचिवहि बुद्धिमान मोठे । चिंता भीति नाहिं कोठें ॥
कांपति चळचळ रिपु भारी । इच्छा स्वर्गावर स्वारी ॥
अवचित होतां क्षोभ प्रजेचा, ठाव न बसण्याला ।
भोगवी भोग बंदिशाळा ॥ प्रभुची ॥६॥

आतां ही परमेश्वराची लीला म्हणावी, कुतुहल म्हणावें, ग्रहयोग म्हणावा का कर्मयोग म्हणावा ? मानवाच्या शान्त बुद्धीस याचा अंत लागणें म्हणजे अनन्ताचें अनन्तत्वच नाहीं असें होईल. असें वाटतें, जग ही एक रंगभूमि आहे, नैपथ्याच्या आड राहून कोणी तरी सूत्रधार या पात्रांची गुप्त रीतीनें सजवणी करीत असतो; एकाला राजाचा वेष देतो तर दुसर्‍याला करतो हुजर्‍या, एकाला दासीची भूमिका देतो तर त्यालाच राणीचा पोशाख चढवतो, घटकेंत सिंहासन तर क्षणांत बंदिशाळेंत अशन, शनय ! लोकांचें मनरंजन करण्याकरतां हा नाट्काचा चटका लावून देत असतो; म्हणूनच महाज्ञानी लोक परमेश्वराच्या कृपेचेंच हे सारें फळ आहे, असें सिद्धांतपूर्वक प्रतिपादन करतात --

मूकंकरोति वाचालं, पंगु लंघयते गिरिम्‍ ।
यत्कृपात्वमहं वंदे परमानंद माधवम् ॥

असो. सांप्रत अमरावतीला भिवविणार्‍या सरस्वती तीरावर दुष्काळाचा वणवा भडकूं लागला खरा ... परंतु ----

साकी

सरस्वतीचा प्रसाद अंकुर सारस्वत तरु फळला ।
जपयज्ञानें प्रमुदित भास्कर भूभागा करि सजला ॥
झाली घनवृष्टि । दिसली पुनर्नवीं सृष्टी ॥१॥

हळुहळु सरस्वतीच्या तीरावर लोकांची चाहूल लागली, वृक्षलतांना पालवी फुटली, धरणीदेवी आदरणीय भासूं लागली, राहूच्या वेधांतून सुटलेल्या चंद्रबिंबाप्रमाणें सरस्वती नदीचा प्रदेश पूर्वीपेक्षांहि अधिक रम्य भासूं लागला, तेव्हां --

नमस्कार, नमस्कार कोत्समुनी ! भारी भाग्योदय, पुष्कळ वर्षांनीं भेट, आनंदांची समेट; क्षेमकुशल, आयुरारोग्य, यथायोग्य चाललें आहे ना ? साष्टांग नमस्कार, वत्समुनीचें दर्शन म्हणजे आनंदाचें प्रदर्शन. पण आपलें आगमन इकडे कोणीकडे ? कोत्समुनी ! आपण आपल्या आनंदांतच आहांत, अलीकडे येथें लोकांची कशी काय स्थिति झाली ती आपल्या स्मृतींतच नाहीं, असें वाटतें .... काय, वत्समुनी ! मला काय लोकांच्या बाहेर टांकतां, जी इतरांची गति, तीच आपली स्थिति. आणि काय --

पद [चाल - अर्ध तनु वारुळी बुडाली०]

अवर्षणानें लोक गांजले निर्जिव झाली धरा । करी तैं लोकसमुह घाबरा ॥
दुष्काळाचा घाला पडला, आळा यज्ञावरी । झाला कर्ममार्ग बहु दुरी ॥
श्रुतिस्मृतीची स्मृती बुडाली, धर्म होय बावरा । कांपती भक्ति नीति थरथरा ॥१॥

कोत्समुनी ! खरोखर या दुष्काळाच्या काळांत लोकांची भारीच कालवाकालव झाली, या अखंड तप अवर्षणांत तपश्चर्येची चर्याच लोपून गेली ! जिकडेतिकडे उदरंभरणाचाच भरणा भारी जाचक झाला; महान्‍ महान्‍ ऋषींना स्वर्गवासाचाच हव्यास वाटूं लागला ...
वत्समुनी ! गुरुमहाराज, दधीचि मुनीची स्मृति आली म्हणजे मात्र मतीची गति चालत नाहीं; हाय ! कोत्समुनी ! गुरुमहाराजांचा स्वर्गावर सत्कारच झाला, त्यांच्या अस्थीचें वज्र बनलें आणि देवेंद्रास तें प्रचंड शस्त्रच लाभले. हं, वत्समुनी ! देवेंद्राचा हेतु सफल झाला, आमचा जन्म मात्र निष्फळ बनला. बरें, पण कोत्समुनी ! आपलें आगमन कोठें ? वत्समुनी ! मनुष्याची दिशाभूल झाली म्हणजे कुठें आणि काय; वेदमंत्राचा ध्वनि कोठेंतरी कानीं पडेल, म्हणून हिंडावयाचें,पण आपलें गमन कुठें ? फार उत्तम, कोत्समुनी ! "समान शीले व्यसनेषु सख्यं" माझाहि पण तोच हेतु, अंतर इतकेंच, माझा शोधान्त झाला आणि आपण शोधांत आहांत ...

काय, वत्समुनी ! आपणास, का वेदमूर्तिचा लाभ झाला, सांगा कोठें झाला, कसा झाला, सांगा त्याचें नांव काय, गांव कोण ....
कोत्समुनी ! भराभर प्रश्नाची सर ...वत्समुनी ! तसें नाहीं हो, एकदां त्या वेदमूर्तीचें दर्शन होऊं द्या, सांगा, कोण, कोठील ....? कोत्समुनी ! इतका उतावळेपणा नको आहे, या आतां माझ्याबरोबर हा पहा सरस्वतीच्या पूर्वभागावर अपूर्व समारंभ होत आहे, हजारों ऋषींचा समुदाय जमलेला आहे, हा पहा वेदघोष आकाशांत दुमदुमतो आहे, पतितपरावर्तन होमाचा धुम्र अभ्रें आणीत आहे ... वत्समुनी ! अलक्ष्यलाभ, खराच माझा आज उजवा बाहु स्फुरत होता ! पण, सांगाहो, साद्यन्त सांगा, ते वेदमूर्ति, कोण,कोठील, ... कोत्समुनी ! ते आपलेच हो गुरुपुत्र, दधीचि मुनीचा पुत्र सारस्वत. काय, वत्समुनी ! आपला सारस्वत इकडेच आहे, आणि तो कसा हो राहिला ....? कोत्समुनी ! त्या आपल्या सारस्वतापासूनच दुष्काळाचें निवारण झालें, पर्जन्यवृष्टी, त्याच्याच यज्ञानें झाली. वत्समुनी ! मला घोटाळ्यांत घालूं नका. सारस्वतानें कोणता यज्ञ केला, अश्वमेघ का राजसूय यज्ञ ? कोत्समुनी ! मला घोटाळ्यांत घालूं नका. सारस्वतानें कोणता यज्ञ केला, अश्वमेघ का राजसूय यज्ञ ? कोत्समुनी ? हो, हो, जपयज्ञाचें महत्व भारीच आहे. अश्वमेघ, राजसूय वगैरे यज्ञांत द्रव्याचा पापांश आहे, हिंसा आहे, असाच श्रेष्ठ समंजस लोकांचा समज झालेला आहे. पण आपण काय म्हटलें ? पतितपरावर्तन होम म्हणजे काय ? कोत्समुनी ! आपणांस गूढ पडण्याचें कारण नाहीं; आपल्या सनातन आर्यधर्मापासून भ्रष्ट झालेले पतित यांस परत आर्यधर्मात आणणें, यास पतितपरावर्तन म्हणतात, हें का आपणास सांगितलें पाहिजे ? वत्समुनी ! भलतेंच का सांगतां आपण, आर्यधर्मापासून च्युत झालेले, धर्मांतर केलेले, परत आर्यधर्मात घेता येतील ? अभक्ष्य भक्षण केलेले, ज्ञातिभ्रष्ट,कर्मभ्रष्ट यांस फिरुन आर्यधर्म ? यास काय प्रायश्चित्त आहे ? कोत्समुनी ! आपल्या काश्यप मुनीनीं, अंबु पर्वतावर महायज्ञ करुन, हजारों म्लेंच्छांस आर्य चातुर्वर्ण्यात घेतलें, हें आपणांस अज्ञात असेल असें मला वाटत नाहीं. पंच महापातकांत धर्मभ्रष्टतेचें नांव नाहीं. आणि इच्छेविरुद्ध झालेल्या कर्मास पाप तरी आपण कसें मानतां ? वत्समुनी ! अभक्ष्य भक्षण, म्लेंच्छांचा संग ही धर्मबाह्य कर्मे पातकें होत नाहींत का ? यास प्राय:श्चित्त असेल असें मला दिसत नाहीं,  धर्मशास्त्रांत आहे का असे प्राय:श्चित्त ? आधार सांगा ! कोत्समुनी ! हें पहा प्राय:श्चित्त प्रकरण; श्रीसरस्वतीच्या संदेशानें आपल्या सारस्वतानें हें स्वत: लिहून हजारों प्रती जिकडेतिकडे पाठविल्या आहेत. आणि याचकरतां मला हा पूर्वप्रदेशप्रवास प्राप्त आहे. वत्समुनी ! दाखवा हो मला वाचून, आपलें प्रकरण ? कोत्समुनी ! ऐका -

"बलाद्दासिकृतायेतु म्लेंच्छ चांडाल दस्युभि: ।
अशुभं कारिता: कर्मगवादि प्राणि हिंसनम्‍ ॥
उच्छिष्टं मार्जनं चैव तथोच्छिष्टस्य भोजनम्‍ ।
खरोष्टाविड वराहाणा मामी पस्यच भक्षणम्‍ ॥
तत्स्त्रीणाच तथा संग स्ताभिश्च सहभोजनम्‍ ॥
        (परिग्रहा भोज्यभोजने प्रायश्चित्त प्रकरणम्‍)

वत्समुनी ! आपल्या सारस्वतानें भारीच नामी प्रकरण शोधून काढलें तर. पण याचा अर्थ सर्व लोकांस कसा कळणार ? कोत्समुनी ! ऐका ! तरी पुढें, हा पहा भाषार्थ: - "जे बलात्कारानें म्लेंच्छ, चांडाळ, दस्यूंकडून भ्रष्टविले गेले; ज्यांनीं गवादि प्राणिहिंसेचे अशुभ कर्म केलें, त्यांचे उच्छिष्टमार्जन; उच्छिष्टा भोजन घडलें, गाढव, डुकर, या पशूंचे मांस जरी भक्षण केलें, त्यांच्या स्त्रियांशीं संग झाला, त्यांच्यांशी सहभोजन झालें, तरी त्यांना प्राय:श्चित्तानें पावन करतां येतें" शाबास ! वत्समुनी ! पण मला वाटतें हा तात्कालिक, चुकून घडलेल्या पापासंबंधी, विधि असेल. कोत्समुनी ! ऐका तरी पुढें:

"शत संवत्सरेण पतति पतितेन सहाचरन्‍ ।
भोजनासनशय्यादि कुर्वाण: सार्वकालिकम्‍ ॥

अर्थ पहा, आपणास अर्थाची गरज नाहीं, तरी पण पहा -

"शंभर वर्षे जरी पतित झाला असला, पतितासह जरी मिळला मिसळला असला, नित्य निजणें उठणें, भोजन करणें, इत्यादि व्यवहार जरी त्यांचे होत असले तथापि प्राय:श्चित्तानें पावन होतात." धन्य, धन्य, सारस्वत धन्य ! पण वत्समुनी ! याला पौराणिक आधार आहे का ? कोत्समुनी ! आपणास का मी सांगितलें पाहिजे ? वैदिक लोक पुराणावर अल्पदृष्टि करतात, हा पहा पौराणिक आधार-

"म्लेंच्छैर्ततानां चोरेर्वा कान्तारेवा प्रवासिनाम । भक्ष्याभक्ष्य विशुध्यर्थं तेषां वक्ष्यामि निष्कृतिम्‍ ।
पुन: प्राप्यस्वदेशेच वर्णाना मनु पूर्वश: । कृच्छस्यान्ते ब्राह्मणस्तु पुन:संस्कार महेति ॥
                                            (अग्निपुराण)
पहा, "म्लेंच्छ देशांत गेलेला, अरण्यांत फिरलेला, प्रवास केलेला, आणि पुन: स्वदेशास आल्यावर भक्ष्याभक्ष्याच्या शुद्धी करतां फिरुन संस्कार करुन घ्यावे" शाबास, वत्समुनी ! धन्य सारस्वत ! खरा स्मार्त, पण हें प्राय:श्चित्त प्रकरण इतका काळ गुप्त कसें हो उरलें ? याचा शोध कोणीच धर्मगुरुनीं कसा हो केला नाहीं ? त्या दुष्ट म्लेंच्छ, यवनास जर हें कळलें असतें, तर ते कार्यात पडलेच नसते; किती हो त्यांनी अत्याचार केला ! बलात्कारानें, कपटानें, फसवून, भुलवून, किती तरी आर्य लोकांस अनार्यधर्माची दीक्षा दिली, आणि या दुष्काळाच्या काळांत त्या काळयवनांस किती हो भाग्योदय दिसला. कोत्समुनी ! त्यांकडेसच नाहीं हो सारा अन्याय, आपलेच आर्य, परधर्मांत गेल्यावर आम्हास त्रास करुं लागतात, यवनधर्माचे अभिमानी बनतात, आणि आमचा पिच्छा पुरवतात, यवनधर्माचे अभिमानी बनतात, आणि आमचा पिच्छा पुरवतात, प्रखर सूर्याचे ताप सहन करवतील पण त्याच्या तापानें तापलेल्या वाळूचे ताप भारीच संताप देत असतात. वत्समुनी ! आतां तरी परोपरी परिश्रम करुन पतितपरावर्तन अंमलांत आणलें पाहिजे, नपेक्षां सार्‍या आर्यावर्तांत आर्य धर्माचें नांवच घेणें भीतीप्रद होईल. कोत्समुनी ! आपल्या ह्या परावर्तन कार्यास ते दुष्ट भारीच अडथळे आणतात, अपमान करतात, इतकेंअ नाही तर प्राणावरहि संकटें आणतात, आणि आपलेच पतित आर्य त्यांस सहाय्य करतात. आणि या शुद्धीच्या कामीं प्रबुद्ध ह्मणणारे आर्य महाजन मन:शुद्ध त्यांच्या विरुद्ध जात नाहींत ..... काय, वत्समुनी ! आपलेच पतित आर्य,पतितपरावर्तनास आळा घालतात ? यवन धर्माचा अभिमान बाळगतात ? कोत्समुनी ! काय सांगावें, या परावर्तनास, ते पतित आर्य, जनवक्र वदन, लाल नयन करुन पाहतात; अवमान, अपमान तर सोडाच; या शुद्धिकृतांस कृतान्ताप्रमाणें परोपरीनें दंड न करण्यास सरसावतात; ..... वत्समुनी ! खरें सांगा, ज्या आपल्या बांधवांस, त्या म्लेंच्छ यवनांनीं धर्मभ्रष्ट केलें, बलात्कारानें अभक्ष्य भक्षण करण्यास लावलें, त्या वेळीं आपल्या ह्या आर्यबंधूनीं त्यांचा त्याग कसा केला, त्यांस अस्पर्श, अपक्त काय म्हणून ठेवलें, त्यांस त्याच वेळीं हेंच प्राय:श्चित्त देऊन आपल्यांत देऊन आपल्यांत कां मिळवलें नाहीं; मनाच्या इच्छेविरुद्ध घडलेल्या दोषास प्रायश्चित्ताचीदेखील गरच नव्हती. असा नाहीं का उत्तर पक्ष येत ? आईनें ढकललें, शेजारणीस फावलें. कोत्समुनी ! " गतं गोष्टि न कर्तव्यं" हेंच; आतां शक्य तो प्रयत्न करुन हें परावर्तनाचें कार्य सिद्धीस नेलें पाहिजे; आर्य धर्माचें सारें जीवन याच पतितपरावर्तनावर अवलंबून आहे. बरें, पण, वत्समुनी ! आपल्या सारस्वतानें जपयज्ञ कसा केला, त्याचा आहारव्यवहार कसा झाला, हें कांही समजलेंच नाहीं. कोत्समुनी ! या, पहा माध्यान्ह उलटूं लागला, प्रत्यक्ष सारस्वताची भेट झाल्यावर सारें विदित होईल, आतां महान्‍ महान्‍ ऋषींच्या समुदायांत सारस्वताचें, आर्य सनातन धर्मावर प्रवचन होणार आहे; चला .... वत्समुनी ! फार उत्तम. खरेच वेळ कधीं गेला हेंच कळलें नाही हा पहा ----

साकी

माध्यान्हीचा चंडकिरण हा उतरे पश्चिम भागीं ।
उच्चस्थाना अधोगती हे निश्चल सर्वांलागीं ॥
प्रभुवर तो दावी । सृष्टि कौतुक हें कळवी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP