संक्षिप्त नाव. ३९३.
या संविधानास “भारताचे संविधान” असे म्हणावे.
प्रारंभ. ३९४.
हा अनुच्छेद व अनुच्छेद ५, ६,७, ८, ९, ६०, ३२४, ३६६, ३६७, ३७९, ३८०, ३८८, ३९१, ३९२, व ३९३, तात्काळ अंमलात येतील. आणि या संविधानाच्या बाकीच्या तरतुदी, या संविधानात, या संविधानाच्या प्रारंभाचा दिन म्हणून जो निर्दिष्ट केला आहे, त्या २६ जानेवारी, १९५० या दिवशी अंमलात येतील.
हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ. ३९४ क.
(१) राष्ट्रपती आपल्या प्राधिकारान्वये,---
(क) संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षरित केलेला. केंद्रीय अधिनियमाच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठामध्ये अंगीकृत केलेली भाषा, शैली व परिभाषा यांच्याशी अनुरुप करण्यासाठी आवश्यक असतील असे फेरबदल केलेला आणि अशा प्रकाशनापूर्वी हया संविधानामध्ये केलेल्या सर्व सुधारणा त्यामध्ये समाविष्ट केलेला या संविधानाचा हिंदी भाषेतील अनुवाद; आणि
(ख) या संविधानाच्या इंग्रजी भाषेमध्ये केलेल्या प्रत्येक सुधारणेचा हिंदी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करील.
(२) खंड (१) अन्वये प्रकाशित करण्यात आलेल्या या संविधानाच्या आणि त्याच्या प्रत्येक सुधारणेच्या अनुवादास त्याच्या मुळाप्रमाणेच अर्थ असल्याप्रमाणे, त्याचा अर्थ लावण्यात येईल आणि जर अशा अनुवादाच्या कोणत्याही भागाचा अर्थ लावण्यामध्ये कोणतीही अडचण उद्भवली तर, राष्ट्रपती त्याचे योग्यप्रकारे पुनरीक्षण करण्याची व्यवस्था करील.
(३) या अनुच्छेदामध्ये प्रसिद्ध केलेला या संविधानाचा आणि त्याच्या प्रत्येक सुधारणेचा अनुवाद हा सर्व प्रयोजनांकरता त्याचा हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ असल्याचे मानण्यात येईल.
निरसने. ३९५.
याद्वारे “इंडियन इंडिपेंडन्स अॅक्ट, १९४७” आणि” गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५” निरसित करण्यात आले आहेत यापैकी दुसर्या अधिनियमात सुधारणा करणार्या किंवा त्यास पूरक असलेल्या सर्व अधिनियमितींचाही यात समावेश आहे. पण यात ” प्रिव्ही कौन्सिल अधिकारिता निरास अधिनियम, १९४९” याचा समावेश नाही.