सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क - कलम २९, ३०

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण .

२९ . ( १ ) भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणार्‍या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा , लिपी व संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल .

( २ ) राज्याकडून चालविल्या जाणार्‍या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म , वंश , जात , भाषा या किंवा यांपैकी कोणत्याही कारणावरुन प्रवेश नाकारला जाणार नाही .

अल्पसंख्याक वर्गांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क .

३० . ( १ ) धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल .

[ ( १ क ) खंड ( १ ) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व प्रशासलेल्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य , अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे , त्या खंडाखाली हमी दिलेला अधिकार निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही , अशा प्रकारची ती रक्कम आहे , याबद्दल खात्री करुन घेईल . ]

( २ ) शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य , एखादी शैक्षणिक संस्था ही , धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे , या कारणावरुन तिला प्रतिकूल होईल अशाप्रकारे भेदभाव करणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP