सर्वसाधारण - कलम १२, १३

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


व्याख्या .

१२ . या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर , " राज्य " या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्यक्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे .

मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे .

१३ . ( १ ) या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे , ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर , ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत् असतील .

( २ ) राज्य , या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणार नाही किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि या खंडाचे उल्लंघन करुन केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत् असेल .

( ३ ) या अनुच्छेदात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर , ---

( क ) " कायदा " यात , भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्याइतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश , आदेश , उपविधी , नियम , विनियम , अधिसूचना , रुढी किंवा परिपाठ यांचा समावेश आहे ;

( ख ) " प्रवर्तनात असलेले कायदे " यात , भारताच्या राज्यक्षेत्रातील विधानमंडळाने किंवा अन्य सक्षम प्राधिकार्‍याने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या किंवा केलेल्या व पूर्वी निरसित न झालेल्या कायद्याचा समावेश आहे --- मग असा कोणताही कायदा किंवा त्याचा कोणताही भाग त्यावेळी मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये अंमलात नसला तरी हरकत नाही .

[ ( ४ ) अनुच्छेद ३६८ खाली संविधानात केलेल्या कोणत्याही सुधारणेला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही . ]

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP