१ कज्जली (काजळी) तृतीया :
आषाढ व. तृतीयेदिवशी श्रवण नक्षत्र असेल, तर विष्णूची पूजा करावी व व्रत करावे. या दिवशी पराविद्धा तिथी ग्राह्य धरतात.
२ स्वर्णगौरीव्रत :
हे व्रत आषाढ व. तृतीये दिवशी करतात. त्या दिवशी प्रातःस्नान करुन स्वच्छ जागेवरील माती आणून त्यापासून गौरीची मूर्ती करतात. त्याशेजारी सूत अगर रेशमी दोरा (१६ सुतांचा तारांचा) करून व त्याला १६ गाठी देऊन स्थापन करावा. नंतर गौरीचे ध्यानवाहनादी षोडशोपचारे पूजन करून तो तातू (दोरा) उजव्या हातात बांधावा व व्रत करावे. याप्रमाणे १६ वर्षे केल्यावर त्याचे उद्यापन करावे. त्यावेळी एका चौरंगावर अष्टदल कमल काढून त्यावर कलश स्थापन करावा आणि त्यावर शिवगौरीची मूर्ती प्रतिष्ठापन करुन त्याची यथाविधी पूजा करुन प्रार्थना करावी. सोन्याचा १६ ग्रंथीयुक्त तातू करुन त्याची पूजा करावी.
'ॐ शिवाय नमः स्वाहा' या
हवनमंत्राने हवन करावे व १६ काष्ठापात्रांत सोळा प्रकारची फळे व पक्वान्ने घालून १६ ब्राह्मणांना दान करावीत. त्याचप्रमाणे गोदान, अन्नदान , शय्यादान व भूयसी दक्षिणा देउन १६ दांपत्ये भोजन घालून, मग स्वतः जेवण करावे.