-
अडचणींत आणणें.
-
स.क्रि.
- ठेवणें ; राखणें ; स्थित करणें . भंवती अस्त्रीयांची राषणे । तेथें घातली ते राजकुमारी । - उषा २१ . २४ . सर्व माल आधीं घरांत घाल .
- सोडणें ; टाकणें ; फेकणें ; टाकून देणें ; फेकून देणें . उडी घालितो संकटीं स्वामि तैसा । - राम ३७ . घोडा घालण्याची सोय नसेल अशा खडकाळ व डोंगराळ मुलखांत डुकराची शिकार गोळीनेच करावी लागते . - डुकराची शिकार ( बडोदें ) १ . त्याला काठीवर भार घालून चालावें लागे . - कोरकि ३२ .
- उडी टाकणें . वणवा मियां आघवा । पांखेंचि पुसोनि घेयावा । पतंगु या हांवा । घाली जेवीं । - ज्ञा १४ . १९१ रागें उमा घातलें आगीं । यालागीं याज्ञिकाचें शिर भंगी । - एभा ५ . १७७ .
- जडविणें ; लावणें ; तल्लीन करणें . स्वरूपीं घातलें मना । यातनेसी केली यातना । - दा ५ . ९ . ५४ .
- मारणें ; फेकणें ; प्रक्षेपणें ; फेंकून मारणें . अभिमंत्रुनी पंनकासस्त्रें । बाणु घातला ईस्वरें । - उषा १६९४ . इंद्राच्या या कपटी वारांगनेच्या डोक्यांत विश्वामित्रानें जर कमंडलु घातला असता तरच असल्या स्त्रीजातीचा योग्य सन्मान झाला असता . - नाकु ३ . ९१ .
- ओतणें . दुधांत पाणी घालणें .
- पसरणें ; बाहेर मांडणें ; मांडून ठेवणें ; रचणें ; ठेवणें . आकाशीं घातीला मंडप । - मसप २ . २६ .
- ( आंत ) खुपसणें ; भोंसकणें . घे सुरी घाल उरीं .
- ( एखाद्या पदार्थांत दुसरा पदार्थ ) शिरकावणें , प्रविष्ट करणें ; पिशवींत पैसे घाल .
- ( एखाद्या कामाला मनुष्य , जनावर ) लावणें ; जुंपणें ; नेमणें ; योजणें . मुलगा पढावयास घातला . तो गडी भात कांडावयास घाला .
- ( दुकान , शाळा , बाजार इ० ) मांडणें ; स्थापनकरणें ; सुरू करणें .
- ( अंगावर धारण करण्याच्या विवक्षित वस्तू ) धारण करणें ; परिधान करणें ; चढविणें. अंगांत अंगरखा , डोकींत पागोटें , पायांत जोडा घातला . नाकांत नथ व बोटांत आंगठी घाल .
- एखाद्यावर अनिष्ट संकट आणणें ; गोत्यांत आणणें ; ( एखाद्याच्या ) नुकसानीस कारण होणें ; गंडा घालणें ; ( एखाद्यास ) बुडविणें . त्यानें मला दहा रुपयांस घातलें .
- ( मूल ) प्रसवणें ; ( अंडीं ) टाकणें ; गाळणें .
- ( प्रश्न , उदाहरण , कोडें इ० ) सोडवावयास देणें , सांगणें ; हिशेब सांगणें .
- एखाद्यास एखादी गोष्ट करण्यास अथवा न करण्यास शपथ इ० देणें ; शपथ इ० कांचा जोर . आग्रह करणें ; शपथ घालणें .
- बाहेर टाकणें ; काढणें ; काढून देणें ; घालविणें . या चोरास प्रथम घराबाहेर घाल .
- ( दरारा , धाक , भीति , भूल इ० ) उत्पन्न करणें ; उपस्थित करणें ; उठवणें ; उद्दीपित करणें .
- ( बाद , गोंधळ इ० ) करणें ; माजविणें .
- ( भिंत , कूड इ० ) बांधणें ; उभारणें ; रचणें .
- ( भोजन , समाराधना , ब्राह्मण , मित्र इ० कांस ) अर्पण करणें ; देणें .
- ( एखादें काम ) सुरू करणें ; आरंभणें . तिने गहूं दळावयास घातले . त्यानें घर बांधावयास घातलें .
- ( चाल , संप्रदाय ) प्रचलित करणें ; रूढ करणें .
- ( सणाच्या दिवशीं पुरण इ० खाद्यपदार्थ ) खावयास , नैवेद्यास सिध्द करणें . मंगलप्रसंगीं ब्राह्मण जेवावयास घालणें . घालणें हा धातु कांहीं नामास जोडूनहि वापरतात . उदा० ( गोष्ट ) कानावर घालणें ; ( मुलाला ) कित्त्यावर घालणें इ० या धातूचे अर्थ अनेक आहेत , पण त्या सर्वांचा भावार्थ ठेवणें ; स्थापणें ; मांडणें ; लावणें असा आहे . [ प्रा . घल्ल ; जु . का . घल्लणे भांडण , युध्द , मारामारी ; हिं . घालना ] ( वाप्र . )
घालून घेणें - ( हट्टानें , जोरानें , वेगासरशीं ) स्वत : चें शरीर , अंग खालीं वरून आंत टाकणें , फेकणें ; एकदम अंग टाकणें . त्याला फेंकरें आलें म्हणजे तो आगींत घालून घेतो . नदी भरतां भरतां घालुनिया घेती । - रामदास - रामदासी भा . १५ . पृ . २६४ . भूतळीं भरत घालुनि घे हो । त्या स्थळींहूनि न चित्त निघेहो । - वामन भरतभाव ५१ . हें वर्तमान मल्हारराव यांनीं ऐकतांक्षणींच अंबारींत घालून घेतलें . - भाब ७४ .
घालून पाडून बोलणें - वक्रोक्तीनें उपरोधिक भाषेंत निंदा करणें , दोष देणें ; टोमणा मारणें ; खोचून बोलणें . टोंचून , घालूनपाडून बोलण्याच्या कामांत बायका पटाईत असतात . - संगीत मेनका ११ .
एखाद्यावर घालणें - एखाद्यास दोष देणें , लावणें . कष्टी होऊनियां लेखीं । प्रारब्धावरी घालिती । - दा १२ . २ . ५. ह्या धातूचें समासांत घाल असें रूप होतें .
घाल - घालणें या क्रियापदाचें समासांत योजावयाचें रूप . यावरून पुढील सामासिक शब्द बनले आहेत .
-
न. हल्ला ; घाला ; छापा . अनुर्धा कारणें । पडलें अवचीतें घालणें । - उषा८९९ . कोपावरी घालणें घातलें । कापटय अंतरीं कुटिलें । - दा ५ . ९ . ५० . [ का . घल्लणे ]
-
०काढ स्त्री. ( कांहीं जिन्नस , सामान इ० विशिष्ट ठिकाणीं ) पुन्हा पुन्हां घालण्याची व तेथून काढण्याची क्रिया , व्यापार ; उपसाउपस ; ( जिनसांची ) उगीच्या उगीच हालवाहलव करण्याचा व्यापार ; चालढकल पहा . [ घालणें + पाडणें ]
Site Search
Input language: