मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक २ रा

एकनाथी भागवत - श्लोक २ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


शोकमोहौ सुखं दुःखं देहापत्तिश्च मायया ।

स्वप्ने यथाऽऽत्मनः ख्यातिः संसृतिर्न तु वास्तवी ॥२॥

दोन मुहूर्त स्वप्नवृत्ती । त्यामाजीं देखे जन्मपंक्ती ।

तेथें पावला नाना याती । तेवीं मिथ्या प्रतीती भवभावा ॥७३॥

नसता आभासु मावळे ठायीं । त्यालागीं हाहाकारु उठे देहीं ।

गेले मेले नाहीं नाहीं । शोक पाहीं त्या नांव ॥७४॥

भग्नपात्रीं भरिलें जळ । तेथें बिंबलें चंद्रमंडळ ।

तें पात्र पोटेंशीं धरी बाळ । रत्‍न प्रबळ हें माझें ॥७५॥

जळ गळोनि जाय सकळ । चंद्रमा हरपे तत्काळ ।

त्यालागी तळमळी तें बाळ । शोकु केवळ या नांव ॥७६॥

अथवा घटचंद्र धरूं जातां । तो न ये बालकाचे हाता ।

यालागीं करी जे जे व्यथा । शोक सर्वथा या नांव ॥७७॥

काढावया आरशांतील धन । करी दर्पणामाजीं खनन ।

फुटल्या नागवलों म्हणे जाण । शोक दारुण या नांव ॥७८॥

नसते वस्तूच्या ठायीं जाण । मी माझें हा अभिमान ।

तेंचि मोहाचें लक्षण । ममता दारुण ते संधी ॥७९॥

देखोनि मृगजळाचें तळें । येणें पिकती रायकेळें ।

यालागीं मृगतृष्णेचीं जळें । औट काळें राखतू ॥८०॥

मृगजळाकडे कोणी भंवे । त्यासी सक्रोधें भांडू धांवे ।

अतिमोहित मोहस्वभावें । विवेकू न करवे सत्याचा ॥८१॥

तेवीं पुत्रापासोन सुखप्राप्ती । माता पिता होईल म्हणती ।

शेखीं पुत्र अंगोठा दाविती । केवळ भ्रांतिमोहो ॥८२॥

गंधर्वनगरींची रचना । देखोनि अभिलाष होय मना ।

ते घ्यावया मेळवी सेना । नानासूचनाउपायें ॥८३॥

तैसा मिथ्या देहीं अभिमान । देहसंबंधाची ममता गहन ।

हेंचि मोहाचें मूळ लक्षण । मताभिमान प्राणियां ॥८४॥

एवं अहं आणि ममता । हेचि मोहाची मातापिता ।

त्याचेनि उत्तरोत्तर वाढतां । जनमोहिता व्यामोहो ॥८५॥

प्रियाविषयीं आसक्ति देख । त्याची नित्यप्राप्ती अनेक ।

त्याचि नांव म्हणती सुख । जेवीं चाखितां विख अति मधुर ॥८६॥

विषयप्राप्तीं जो हरिख । तया नांव म्हणती सुख ।

विषयविनाश तेंचि दुःख । परम असुख त्या नांव ॥८७॥

शोक मोह सुख दुःख । येणेंचि देहाची प्राप्ती देख ।

देहाभिमानें देह अनेक । दुःखदायक भोगवी ॥८८॥

जो जाणें तीव्रध्यानें मरे । तो तेंचि होऊनि अवतरे ।

कां जो निमे अतिद्वेषकारें । तो द्वेषानुसारें जन्मतू ॥८९॥

सर्प मुंगुस पूर्ववृत्ती । वैराकारें जन्म पावती ।

जे जे वासना उरे अंतीं । ते ते गती प्राण्यासी ॥९०॥

यालागीं हृदयामाजीं निश्चितीं । जे सबळ वासना उठे अंतीं ।

तो तो प्राणी पावे तिये गती । श्रुति बोलतीं पुराणें ॥९१॥

पुरुषासवें वृथा छाया । तैशी ब्रह्मीं मिथ्या माया ।

ते उपजवी गुणकार्या । देह भासावया मूळ ते ॥९२॥

जेवीं का स्वप्नीं एकलें मन । नानाकार होय आपण ।

तेवीं चैतन्याचें अन्यथा भान । तें हें जाण चराचर ॥९३॥

एवं वस्तुतां संसार नाहीं । तेथें सुखदुःख कैंचें कायी ।

देहेंवीण छाया पाहीं । कोणें ठायीं उपजेल ॥९४॥

जें उपजलेंच नाहीं । तें काळें गोरें सांगों कायी ।

अवघें स्वप्नप्राय पाहीं । वस्तुतां नाहीं संसारु ॥९५॥

इहीं दोहीं श्लोकीं अगाधू । परिहरिला वस्तुविरोधु ।

आतां प्रतीतीनें जो अनुरोधू । तो सत्या बाधू करूं न शके ॥९६॥

डोळां अंगुळी लाविती । तेणें दोन चंद्र आभासती ।

गगनीं दों चंद्रा नाहीं वस्ती । मिथ्या प्रतीती निराकारीं ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP