मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक १७ वा

एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


न कुर्यान्न वदेत् किञ्चिन् न ध्यायेत् साध्वसाधु वा ।

आत्मारामोऽनया वृत्त्या विचरेज्जडवन्मुनिः ॥१७॥

कायिक वाचिक मानसिक । उद्देशें कर्म न करी एक ।

जें निपजे तें स्वाभाविक । अहेतुक त्या नांव ॥८७॥

हेतु ठेवूनि गुणागुणीं । स्तुतिनिंदेचीं बोलणीं ।

सांडोनिया जाला मौनी । परी मौनाभिमानीं हेतु नाहीं ॥८८॥

जरी तो जाला मौनाभिमानी । तरी मुक्त पडला बंधनीं ।

यालागीं बोलणें न बोलणें दोन्ही । सांडूनि मौनी तो झाला ॥८९॥

अतद्‍व्यावृत्तीनें जाण । करावें असंतनिरसन ।

मग सद्वस्तूचें ध्यान । अखंड जाण करावें ॥४९०॥

तंव पावली सद्‍गुरूची खूण । उडालें ध्येय ध्याता ध्यान ।

बुडालें भेदाचें भेदभान । चैतन्यघन कोंदलें ॥९१॥

मेळवूनि शास्त्रसंभारा । बांधला संतासंतबंधारा ।

तो चैतन्याच्या महापुरा- । माजी खरा विराला ॥९२॥

तेव्हां बुडालें संतासंतभान । निबिड दाटलें चैतन्यघन ।

मोडलें मनाचें मनपण । वृत्तिशून्य अवस्था ॥९३॥

मनें ध्यावें चैतन्यघन । तंव चैतन्यचि जालें मन ।

सहजेंचि खुंटलें ध्यान । हें मुख्य लक्षण मुक्ताचें ॥९४॥

चैतन्यीं हरपलें चित्त । जड-मूक-पिशाचवत ।

लौकिकीं वर्ततां दिसे मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥९५॥

मुक्त लौकिकीं वर्तत । जड-मूढ-पिशाचवत ।

म्हणौनि कळे इत्थंभूत । तेहीं चिन्ह यदर्थ सांगेन ॥९६॥

नैष्कर्म्य ब्रह्म पावला दृढु । अंतरीं निजबोधें अतिगोडु ।

बाह्य लौकिकीं दिसे जडु । अचेतन दगडू होऊनि असे ॥९७॥

उठीबैसी करितें मन । तें स्वरूपीं जालें लीन ।

पडलें ठायींहूनि नुठी जाण । यालागीं जडपण आभासे ॥९८॥

शब्दब्रह्म गिळोनि वेगें । निःशब्द वस्तु जाला संगें ।

निंदास्तुतीचें नांव नेघे । मुका सर्वांगें सर्वदा ॥९९॥

ब्रह्म सर्वथा न बोलवे कोणा । जरीं सांगे तरी दावी खुणा ।

यालागीं मुका म्हणती जाणा । अबोलणा स्तुतिनिंदा ॥५००॥

द्रव्यलोभ नाहीं चित्तीं । कदा द्रव्ये नातळती ।

यालागीं लोक पिशाच म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१॥

नवल त्याचें पिसेपण । जगास न करवे जें प्राशन ।

ते वस्तूचें करी आपोशन । अभक्ष्य जाण भक्षितू ॥२॥

जेथ जगासी गमन नव्हे जाण । तेथ हा करी अगम्यागमन ।

जगाचें जेथ न रिघे मन । तेथ सर्वांगें जाण हा वेंघे ॥३॥

न धरी विधिनिषेधविभाग । न करी कर्माकर्मांचा पांग ।

स्वानंदें नाचवी सर्वांग । यालागीं जग पिसे म्हणे ॥४॥

एवं जड मूक पिशाच । समूळ लक्षणीं तोचि साच ।

मिथ्या नव्हे अहाचवहाच । वृथा कचकच तो नेणे ॥५॥

जाण पां मुक्ताच्या ठायीं । कोणे विषयीं आग्रह नाहीं ।

जो अतिशयेंसीं आग्रही । तो बद्ध पाहीं निश्चित ॥६॥

जीं बोलिलीं मुक्ताचीं लक्षणें । तींचि साधकाची साधनें ।

सिद्धासी असती सहजगुणें । साधकें करणें दृढनिष्ठा ॥७॥

बोलिलिया लक्षणां । सिद्धुचि भोक्ता जाणा ।

साधकूहि येथ लहाणा । जो या साधनां साधूं जाणे ॥८॥

इतर जे पंडिताभिमानी । आह्मी शास्त्रज्ञ ज्ञाते म्हणौनी ।

ते वाळिले येथुनि । जेवीं सज्जनीं दुर्बुद्धी ॥९॥

जो न साधी येथींच्या साधना । कोरडा शास्त्राभिमानी जाणा ।

सदा वांच्छिता धनमाना । तो येथींच्या ज्ञाना अलिप्त ॥५१०॥

जे मानिती आम्ही कर्मकुशळ याज्ञिक । शास्त्रसंपन्न वेदपाठक ।

सदा अर्थकामकामुक । त्यांसी हें सुख अप्राप्त ॥११॥

तिहीं जे कष्ट केले सर्वथा । ते समस्त जाण जाले वृथा ।

उद्धवा तेहीविखीं तत्त्वतां । ऐक आतां सांगेन ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP