धर्मसिंधु - गोत्रे व प्रवर यांचा निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


गोत्रे व प्रवर यांचा संक्षेपतः निर्णय

त्यामध्ये प्रथमतः गोत्राचे लक्षण - विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ आणि कश्यप हे सात ऋषि अणि आठवा अगस्त्य यांचे जे अपत्य म्हणजे वंश त्याला गोत्र म्हणतात. केवल भार्गव जे आर्ष्टिषेणादिक व केवल अंगिरस जे हारितादिक त्यांचे ठिकाणी हे लक्षण येत नाही; कारण भृगु व अंगिरा हे पूर्वी सांगितलेल्या आठ ऋषींच्या वंशात नाहीत तथापि यांचे ठिकाणी एक प्रवर असल्यामुळे विवाह होत नाही.सहस्त्र, प्रयुत, अर्बुद, अशी गोत्रांची संख्या असल्याबद्दल वचन आहे. यावरून गोत्रे अनंत आहेत. तथापि गोत्रांचे भेद एकूणपन्नासच आहेत. कारण प्रवरांचे निरनिराळे भेद तितकेच असलेले दिसतात. प्रवरांचे लक्ष्ण - गोत्रांचे व वंशांचे प्रवर्तक जे ऋषि त्यांचे भेद दाखविणारे जे तद्वंशीय विशेष ऋषि तेच प्रवर असे संक्षेपाने जानावे. समानगोत्रत्व व समानप्रवरत्व ही दोन्ही निरनिराळी विवाहाला प्रतिबंधक आहेत. म्हणजे समान गोत्र असेल अथवा समान प्रवर असेल तथापि विवाह करू नये. त्यामध्ये प्रवराचे समानत्व दोन प्रकारचे आहे

१. एका प्रवराचे साम्य आणि

२. दोन अथवा तीन प्रवरांचे साम्य. त्यामध्ये भृगुगण व अंगिरोगण यांवाचून इतर गणांत एका प्रवराचे साम्य असले तरी ते विवाहाला प्रतिबंधक आहे. केवल भृगुगण व केवल अंगिरोगण यामध्ये एका प्रवराचे साम्य विवाहाला बाधक होत नाही. परंतु तीन प्रवरांमध्ये दोन प्रवरांचे साम्य आणि पाच प्रवरांमध्ये तीन प्रवरांचे साम्य ही मात्र विवाहाला बाधक होतात. कारण भृगुगण व अंगिरोगण यामध्ये "पाच प्रवरांपैकी तीन प्रवर समान असतील तर विवाह होत नाही इतर गणांमध्ये एक प्रवर समान असेल तरी विवाह होत नाही." इत्यादि वचन आहे. जामदग्न्य भृगुगण, गौतमांगिरस आणि भारद्वाजांगिरस यामध्ये एक प्रवर समान असेल. तरी अथवा क्वचित् एक देखील प्रवर समान नसून एक गोत्र आहे म्हणून विवाह होत नाही

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-19T06:46:11.9000000