उन्मनि येश्वदा विनविते ऐक मुकुंदा । मजपाशी गार्‍हाणें सांगती गौळणी तिनदां ॥धृ० ॥
चौसष्टजणिंच्या घरी जाऊनी खाशी दहि दूध । शिंकी तोडुनि आंगणांत टाकिली कुठे गेलि शुद्ध ॥
बावनजणिंसी धक्का देऊन मग केला बोध । बहात्तर जात होत्या पाण्याला तुझा लागला छंद ॥
माया मुरली ऐकून सुचेना काही काम धंदा । मज० ॥१॥
मजपाशी एके दिवशी बारा सोळा आल्या पाण्याला । छत्तिस गुण दश इंद्रियें गडिगोपाळ जमा केला ॥
पूरक कुंभक रेचक डाव मांडिल । त्राहाटकिं प्राण रोधुनि चेंडू झुगारिला ।
गौळणी घागरी फोडूनी परब्रह्मि छंदा । मजपाशी० ॥२॥
द्वारकेचि संपदा घेऊन आला पंढरिशी जाणा । औटपीठ विटेवरी उभा जोडूनिया चरणा ।
अर्धनारी नटेश्वर दाखविला सद्गुरुनं । विवेक आणि वैरागी गरुड मारुती दोन ।
भाऊ पुंडलिक मुनि अनुताप गायन नारदा मजपाशी ॥३॥
तुर्या रुक्मिणी उन्मनी कमळाई माई । दश इंद्रियांसहित वळल्या मुरलीनादें गायी ॥
ब्रह्म रंध्रिसी करि स्थिरावल्या झाल्या एकमयी । व्यक्ता अव्यक्तासी भेटतां हरिरुप होई ॥
गुरु भीमराव कवि गणपति भजे गोविंदा । मजपाशी० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP