मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
पूर्वचरितकथन व क्षमायाचना

सप्ताह अनुष्ठान - पूर्वचरितकथन व क्षमायाचना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


आठवितां पूर्वकालीन आचरण । खोचे अंत:करण माझे नाथा ॥१॥
त्यांत मज किती अनंत अज्ञात । दोष अवधूत घडले की ॥२॥
अंतर्बाह्य आहे देवा मी ओंगळ । पातकांचा मळ सांचलासे ॥३॥
किती केली आहे तुमची अवज्ञा । लकल सर्वज्ञा जाणतोसी ॥४॥
म्हणोनियां आहे शरण चरणी । मज चक्रपाणी क्षमा करा ॥५॥।
कृतघ्न मी आहे, तुमचे स्मरण । मज नारायण होत नाही ॥६॥
विसरोनी तुम्हां वागतो वेव्हारी । तेणे मी विकारी होत सदा ॥७॥
अमंगळ देवा काया मने । शरण लज्जेने आलो असे ॥८॥
तरी आतां मज कृपाच करावी । अढी न धरावी कृपावंता ॥९॥
विनायक आहे जाहला घाबरा । श्रीगुरुउदारा तारा, यासी ॥१०॥
==
पूर्ववृत्तकथन व क्षमायाचना

पूर्ववृत्त माझे अत्यंत गहन । तयासी तुलन नाही नाही ॥१॥
पापात्मक माझे पूर्वील चरित । तेणे मी पावत संकटासी ॥२॥
कितीतरी नाथा अरिष्टे माझेवरी । लोटली श्रीहरी असती की ॥३॥
सर्वज्ञ तूं देव सकल जाणसी । प्रार्थना ऐकसी तैसी माझी ॥४॥
तरी आतां यांत दयेचा विचार । करा गुरुवर माझेसाठी ॥५॥
पापांच्या मी नादें संकटी पडलो । असहाय झालो असे देवा ॥६॥
तरी वांचवावे मज या दीनासी । पदसेवकासी वांचवावे ॥७॥
होवोनियां दीन हीन लीन नाथा । तुम्हां मी समर्था प्रार्थितसे ॥८॥
तरी क्षमा करा अरिष्टे शमवा । श्रीगुरुमाधवा दत्तात्रेया ॥९॥
अरिष्टशमनार्थ केला मी आश्रय । असे दत्तात्रेय तुमचा की ॥१०॥
तरी वांचवावे तारावे या दीना । मज करुणाघना संरक्षावे ॥११॥
विनायक म्हणे तुम्हांवीण मज । त्राता गुरुराज कोणी नाही ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP