पित्रा सम्पूजिताः सर्वे यथावीर्यं यथावयः । आददुः सशरं चापं चेद्धुं पर्षदि मद्धियः ॥२१॥

कथितां नृपांचे नामोच्चार । ग्रंथ विस्तारा जाईल फार । यालागीं संकेतें व्यासकुमर । आले सर्वत्र हें वदला ॥७२॥
तस्मात् नृपति जे समस्त । आले जाणूनि माझा तात । पूजिता जाला यथोक्त । यथापुरुषार्थ यथावय ॥७३॥
मंडपीं नृपसभा घनवट । बिरुदें पढती बंदिभाट । यंत्र देखोनि हृदयस्फोट । महासंकट नृप म्हणती ॥७४॥
तयांमाजि नामाथिले । धनुर्विद्यासंपन्न भले । श्रेष्ठमुकुटांचे दादुले । ते उठिले मम लोभें ॥१७५॥
शरेंसहित कोदंडातें । यंत्राबास वेधावया ते । घेते जाले उदितचित्तें । मत्प्राप्तीतें इच्छूनी ॥७६॥
पर्षदि म्हणिजे सभेच्या ठायीं । साभिलाषबुद्धि मत्प्राप्तीविषयीं । उठतां धडकी उपजे हृदयीं । जयाजय दोहीं माजिवडी ॥७७॥

आदाय व्यसृजन्केचित्सज्जीकर्त्तुमनीश्वराः । आकोष्ठं ज्यां समुत्कृष्य पेतुरेकेऽमुना हताः ॥२२॥

बृहत्सेननृप ते समयीं । भूभुजसभा लक्षूनि पाहीं । लक्ष भेदील जांवायी । वाग्निश्चयीं म्यां केला ॥७८॥
तयासि द्यावया कन्यारत्न । यंत्ररचनेचा केला यत्न । वीर्यशौर्यपुरुषचिह्न । वाहती तिहीं भेदावें ॥७९॥
आंगीं धनुर्विद्येचा आव । मुकुटमंडित म्हणविती राव । प्रतापवीरश्रीवांठीव । यंत्र भेदूनि मिरवावी ॥१८०॥
ऐकूनि नृपाचें बोलणें । मौन धरूनि एक शहाणे । एक सांडूनि आंगवणे । अध्यात्मचर्चा आदरिती ॥८१॥
एक लघुशंकेकारणें । उठोनि करिती काळक्रमणे । म्हणती आम्हांमागें कोणें । श्लाघ्यवाणें भेदिलिया ॥८२॥
एक जलपानार्थ उठती । एक दर्पण अवलोकिती । एक श्मश्रु करें पिळिती । एक स्पर्शती स्वकुण्डलां ॥८३॥
एक नायकणियावरी । अन्य वार्ता परस्परीं । करिती सांडूनियां वीरश्री । ऐसी अवसरी बहुतांतें ॥८४॥
कोण्हीएक ठाकले उभे । सकाम नोवरीचिया लोभें । चाप घेऊनि पाहती शोभे । वीरश्रीक्षोभें सांडवले ॥१८५॥
एक उचलूनि तें कार्मुक । सज्य करावया धरिती तवक । न चढे तेव्हां तुटलें तुक । न करिती मुख मग वरतें ॥८६॥
मग म्हणती या चापेंकरून । यंत्र भेदील तो पुरुष धन्य । इतुकें बोलूनिं धरिती मौन । चाप ठेवून वोसरती ॥८७॥
एकीं बहुकष्टीं प्रत्यंचा । वाहूनि पाहती वदनें उच्चा । चाप स्फाळितां प्रताप त्यांचा । भंगला साचा नृपसदसीं ॥८८॥
एकीं आकोष्ठ शिञ्जिनी । बाहुप्रतापें आकर्षूनी । चाप नावरतां ते धरणीं । विकळ होऊनि कलंडले ॥८९॥
तेणें चापें जे दडपले । ते मूर्च्छित वीर पडिले । ऐसे वीरश्रीवंत दादुले । चापें केले गर्वहत ॥१९०॥
असो या सामान्यनृपांच्या गोष्टी । यावरी प्रतापी वीर जे सृष्टी । ऐकें तयांची राहटी । भो गोरटी द्रौपदीये ॥९१॥

सज्यं कृत्वाऽपरेवीरा मागधाम्बष्ठचेदिपाः । भीमो दुर्योधनः कर्णो नाविन्दंस्तदवस्थितिम् ॥२३॥

महाप्रतापी मगधपति । चैद्य अंबष्ठ सोमकनृपति । इहीं सज्जूनि चाप निगुती । भास लक्षिती ऊर्ध्वमुखें ॥९२॥
तंव त्या मत्स्याची अवस्थिति । विदित नोहे कोणाप्रति । यास्तव भेदनीं भग्नगति । जाली निश्चिती सर्वांची ॥९३॥
भीम बळिष्ठ महाप्रतापी । क्षणार्धें गुण वाहिला चापीं । भास न लक्षे मग संकल्पीं । स्वयें आरोपी शिथिलत्व ॥९४॥
साम्राज्यगर्वमद दुर्योधना । तेणें सज्जूनि शरासना । समर्थ न होतां मत्स्यपातना । लाजिरवाणा मग परते ॥१९५॥
कर्णा धनुरिद्येचा गर्व । आंगीं धरूनि विरश्रीआव । चाप सज्जूनियां स्वयमेव । दावी लाघव नृपसदसीं ॥९६॥
तंत तो भास दृष्टी न पदे । कुम्भीं लक्षी खालत्या तोडें । सोडूतां अनुमानें शरकाण्डें । तेणें न घडे तद्भेद ॥९७॥
हे देखोनि सर्व नृपति । वसनें लावूनि मुखाप्रति । परमविस्मयें हास्य करिती । लज्जविपत्ति कर्णातें ॥९८॥
कित्येक नृपति श्रेष्ठपणें । आसनें न सोडोनियां शहाणे । म्हणती पार्थावांचूनि कोणें । यंत्रभेदणें हें न घडे ॥९९॥
पूर्वीं द्रौपदीस्वयंवरीं । यंत्ररचनेची ऐसी परी । अर्जुनें भेदोनि एकाचि शरीं । नेली नोवरी जिङ्कूनी ॥२००॥
येथही आजि तो अर्जुन । एकाचि बाणें मत्स्यपातन । करूनि हरील वनितारत्न । वृथा आंगवण इतरांची ॥१॥
ऐसी चर्चा नृपसभेची । ऐकूनि मग तो सव्यसाची । उठिला आणि कार्मुकाची । सज्य केली प्रत्यंचा ॥२॥

मत्स्याभासं जले वीक्ष्य ज्ञात्वा च तदवस्थितिम् । पार्थो यत्तोऽसृजद्वाणं नच्छिनत्पस्पृशे परम् ॥२४॥

मग जाऊनि स्तंभमूळीं । जलकलशीं तोमत्स्य निहाळी । त्याची अवस्थिति अवगमली । जाणोनि बळी यत्न करी ॥३॥
पार्थ होऊनि यत्नपर । कार्मुकीं सज्जूनि सरळ शर । जळीं पाहूनि विन्धितां शफर । स्पर्श मात्र त्या केला ॥४॥
परंतु भेदूनियां तळवटीं । मत्स्य पाडूं न शके किरीटी । अल्पशक्ति हे कळली गोठी । वदे वाक्पुटीं नृप तेव्हां ॥२०५॥
यावरी कोण्ही वीरश्रीवंत । वीर राहिला असे गुप्त । तेणें यंत्र भेदूनि त्वरित । निजपुरुषार्थ प्रकटावा ॥६॥
ऐसी बृहत्सेननृपाची वाणी । पडतां निखिल नृपांच्या श्रवणीं । शब्द बोलूं न शकती कोण्ही । चक्रपाणि तैं उठिला ॥७॥

राजन्येषु निवृत्तेषु भग्नमातेषु मानिषु । भगवान्धनुरादाय सज्जं कृताथ लीलया ॥२५॥
तस्मिन्सन्धाय विशिखं मत्स्यं वीक्ष्य सकृज्जले । छित्त्वेषुणापातयत्तं सूर्येम चाभिजिति स्थिते ॥२६॥

नृपांहीं सोडूनि माझी आशा । भेदूं न शकतां मत्स्याभासा । मग ते परतले जावया देशा । भग्न मानसामाजिवडे ॥८॥
मागधप्रमुख वीरश्रीमानी । दुर्योधनादि पदाभिमानीं । एवं सर्व जे साभिमानी । मानहानी त्यां जाली ॥९॥
एवं भंगले नृपति सर्व । गळाला साभिमानियांचा गर्व । तिये समयीं वासुदेव । उठिला स्वयमेव साटोपें ॥२१०॥
धनुष्य घेऊनियां करतळीं । सज्य करूनि श्रीवनमाळी । लीलालाघव स्तंभाजवळी । प्रतापशाळी उभा ठेला ॥११॥
तया चापाच्या ठायीं शर । संयोजूनियां स्वयें श्रीधर । जळीं लक्षूनि एकवार । छेदिला शफर शरघातें ॥१२॥
छेदूनि मत्स्य पाडिला तळीं । अभिजिन्मुहूर्तीं मध्याह्नकाळीं । मध्यभागीं अंशुमाळी । ग्रहमंडळीं शुभशान्त ॥१३॥
यंत्र भेदिले श्रीभगवंतें । देखोनि आनंद मम जनकातें । उत्साह जाला जो त्रिजगातें । पाण्डवकान्ते तो ऐक ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP