कालिन्द्युवाच - तपश्चरन्तीमाज्ञाय स्वपादस्पर्शनाशया ।
सख्योपेत्या ग्रहीत्पाणिं योऽहं तद्गृहमार्जनी ॥११॥

रविजा बोले मग उत्तर । मदर्थ तपश्चर्यापर । हृदयीं जाणूनि जगदीश्वर । प्रेरी सत्वर निज सखया ॥१८॥
भगवत्सख म्हणाल कोण । तरी जो धनंजय अर्जुन । तेणें ममाशय जाणोन । दाविले चरण स्वामींचे ॥१९॥
श्रीपादस्पर्शनेच्छा मातें । पूर्वीच विदित सर्वज्ञातें । हृदयीं द्रवोनि करुणावंतें । केलें निरुतें करग्रहण ॥१२०॥
तया प्रभूचिये भवनीं । मी किङ्करी गृहमार्जनी । यावरी मित्रविन्दा वाणी । वदे तें श्रवणीं अवधारा ॥२१॥

मित्रविन्दोवाच - यो मां स्वयंवर उपेत्य विजित्य भूपान्निन्ये श्वयूथगमिवात्मबलिं द्विपारिः ।
भ्रातॄंश्च मेऽपकुरुतः स्वपुरं श्रियौकस्तस्यास्तु मेऽनुभवमंघ्र्यवनेजनत्वम् ॥१२॥

मित्रविन्दा म्हणे परिसा । कृष्णप्राप्ती बहु आशा । लागली असतां मम मानसा । हें श्रीपरेशा जाणवलें ॥२२॥
मग जे माझिये स्वयंवरीं । बंधु केवळ विघ्नकारी । भूभुजां सहित त्यांतें समरीं । जिङ्कूनि हरी मजलागीं ॥२३॥
द्वेषें बंधु नामंत्रिती । सवेंचि येऊनियां श्रीपति । हरूनि मातें केलें युवति । कोणे रीति तें ऐका ॥२४॥
मत्तगजाचा कुम्भकवळ । भक्षणा उदित श्वानमेळ । देखोनि मृगेन्द्र जेंवि तत्काळ । हरी स्वबळप्रतापें ॥१२५॥
मृगेन्द्राची देखोनि झडप । श्वानयूथा महा कंप । भयें दश दिशा पळती कळप । भंगले भूप तेंवि रणीं ॥२६॥
मग मज लक्ष्मीनिवास हरी । स्वपुरा नेऊनि विध्युक्त वरी । तत्पदाक्षाळन निरंतरीं । प्रतिसंसारीं मज असो ॥२७॥

सत्योवाच - सप्तोक्षणोऽतिबलवीर्यसुतीक्ष्णश्रृङ्गन्पित्रा कृतान्क्षितिपवीर्यपरीक्षणाय ।
तान्वीरदुर्मदहनस्तरसा निगृह्म क्रीडन्बबंध ह यथा शिशवोऽजतोकान् ॥१३॥

सत्यानामका नाग्नजिती । वृत्तान्त सांगे द्रौपदीप्रति । म्हणे मम जनकें केली युक्ति । मज श्रीपति वरावया ॥२८॥
सप्त अपेट वृषभ मत्त । एकेच समयीं करूनि मुक्त । त्यांतें नाथी प्रतापवंत । तो हो कान्त मम कन्ये ॥२९॥
परम तिखट ज्यांचीं शृंगें । पुष्ट कठिण ज्यांचीं अंगें । लत्ताप्रहारें भिदुर भंगें । गमती अवघे कृतान्त ॥१३०॥
नृपवीर्याच्या परीक्षणा । जनकें केली हे प्रतिज्ञा । ऐकोनि कोण्ही पाणिग्रहणा । नृप आंगवणा न करिती ॥३१॥
हें ऐकोनि कमलाजानि । जाणोनि माझी हृदयग्लानि । साक्षेपें सप्तवृष नाथूनी । पाणिग्रहणीं मज वरिलें ॥३२॥
जैशीं नेणतीं लेंकुरें । अजापत्यां धरिती करें । तैसे सातही कमलावरें । वृषभ निजकरें नाथिले ॥३३॥

य इत्थं वीर्यशुल्कां मां दासीभिश्चतुरंगिणीम् । पथि निर्जित्य राजन्यान्निन्ये तद्दास्यमस्तु मे ॥१४॥

एवं स्ववीर्यमूल्यें मातें । क्रीत करूनि कमलाकान्तें । पंथीं भंगोनि नृपांचीं शतें । दासीयूथें सह नेलें ॥३४॥
रथगजतुरंगपदातिसेना । अनेक दासी पदार्थ नाना । दिधलें मज जनकें आंदणा । पाणिग्रहणा करवूनी ॥१३५॥
ऐसिया परी वरिलें मातें । तद्दास्य असो मज निरुतें । ऐकोनि सत्येच्या वचनातें । भद्रा बोले तें ऐका ॥३६॥

भद्रोवाच - पिता मे मातुलेयाय सयमाहूय दत्तवान् ।
कृष्णे कृष्णाय तच्चित्तामक्षौहिण्या सखीजनैः ॥१५॥
अस्य मे पादसंस्पर्शो भवेज्जन्मनि जन्मनि । कर्मभिर्भ्राम्यमाणया येन तच्छ्रेय आत्मनः ॥१६॥

कैकेयदेशींचा जो नृपवर । धृष्टकेतु माझा पितर । तेणें जाणोनि मज उपवर । केला विचार द्रौपदिये ॥३७॥
शूरसेनाची नंदिनी । श्रुतकीर्ति ते माझी जननी । वसुदेवतनय चक्रपाणी । मातुलेय पैं माझा ॥३८॥
तो कृष्ण वरिला ममान्तरें । तया कारणें अत्यादरें । स्वयें आणूनि माझिया पितरें । विध्युक्तप्रकारें मज दिधलें ॥३९॥
अक्षौहिणी सेनेसहित । सखिया किङ्करी शतानुशत । आंदण वोपोनि पदार्थ बहुत । श्रीकृष्ण कान्त मज केला ॥१४०॥
त्याचा पादस्पर्श मज । जन्मोजन्मीं हो हें गुज । पाञ्चालतनये कथिलें तुज । ऐकें बीज याचेंही ॥४१॥
त्रिगुणात्मकें बहुविध कर्में । तिहीं निर्दिष्ट अनेक जन्में । विविधा योनींमाजि भ्रमें । भ्रमणार मी जयावरी ॥४२॥
तें या पादस्पर्शेंकरून । कर्मभ्रमणाचें निरसन । होऊनि श्रेयस निज कल्याण । कैवल्यसदन पावेन ॥४३॥
तरी तो पादस्पर्श मज । जन्मोजन्मीं असो सहज । परमपुरुषार्थाचें बीज । हे अधोक्षजपदसेवा ॥४४॥
इतुकी भद्रेनें तत्वता । कथिली पाणिग्रहणकथा । यावरी बार्हत्सेनीवार्ता । करग्रहणाची निरूपितों ॥१४५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP