अध्याय ८० वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
त्रीणि गुल्मान्यतीयाय तिस्रः कक्षाश्च सद्विजः । विप्रोऽगम्यान्धकवृष्णीनां गृहेष्वच्युतधर्मिणाम् ॥१६॥
द्वारकादुर्गरक्षणकामें । भंवतीं प्रबळ सेनागुल्में । त्रय लंघिलीं द्विजसत्तमें । श्रीकृष्णनामें चिन्तूनिया ॥७२॥
पदोपदीं नामस्मरण । करित चाले तो ब्राह्मण । त्यातें देखूनि करिती नमन । वृष्णि यदुगण भोजान्धक ॥७३॥
ऐसें गुल्मत्रय लंधिलें । पुढें द्वारकापुर देखिलें । ब्राह्मणोत्तमें मनीं भाविलें । साफल्य जालें जन्माचें ॥७४॥
द्वारकापुरनिवासिजन । कित्तेक दूरस्थ ब्राह्मण । तिहीं सहित द्विजवर पूर्ण । द्वारकाभुवन प्रवेशला ॥१७५॥
प्रथम दुर्ग प्रचंड पवळी । गोपुरीं पताका विचित्र चैलीं । द्वास्थ बैसले प्रतापशाली । नामावळी मुखें पढती ॥७६॥
द्विजें देखूनि तयां प्रती । म्हणे द्विज प्रवेशीं निषेधिती । ऐसी शंका मानी चित्तीं । तंव ते बंदिती द्विजवर्या ॥७७॥
आमुच्या स्वामींचें दैवत । म्हणोनि द्विजातें नमिती द्वास्थ । प्रवेशविती नगरा आंत । द्वितीय गोपुरा पावविती ॥७८॥
तेथही चंद्रप्रचंड वीर । द्वास्थ बैसले प्रबळतर । तिहीं देखतांचि द्विजवर । नमिती सादर होत्साते ॥७९॥
तेही कक्षा लंघूनि विप्र । तृतीय देहळी प्रति सत्वर । सवें समस्त द्विजांचा भार । घेऊनि सादर प्रवेशला ॥१८०॥
तीन्ही कक्षा लंघूनि पुढें । ब्राह्मण जातां निजनिवाडें । भोजान्धकवृष्णिवाडे । देखीले उघडे दारवटे ॥८१॥
पारका वरा प्रवेशूं न शके । ऐसे रक्षक बैसले निके । अच्युतधर्मी यादव असिके । द्विजवर देखे प्रति सदनीं ॥८२॥
ऐसीं यदुगणांचीं सदनें । द्विजे पुरस्थां पुसूनि वदनें । द्व्यष्टसहस्र कृष्णायतनें । दाविती नयनें जय विप्रा ॥८३॥
गृहं द्व्यष्टसहस्राणां महिषीणां हरिर्द्विजः । विवेशैकतर्म श्रीमद् ब्रह्मानंदं गतो यथा ॥१७॥
सोळा सहस्र सदनें ज्यांत । ऐसें एकायतन प्रशस्त । गोपुरद्वारीं बैसले द्वास्थ । निर्भय तेथ द्विज आला ॥८४॥
द्वास्थीं देखूनि द्विजा प्रति । नमस्कारिला सप्रेमभक्ति । काय इच्छा असेल चित्तीं । कृपामूर्ती ते सांगा ॥१८५॥
येरु म्हणे कृष्णदर्शना । जावयाची असे कामना । द्वास्थ म्हणती कीजे गमना । जनार्दना भेटावया ॥८६॥
कृष्णसदनीं निषेध नाहीं । विशेष ब्रहमणालागि पाहीं । आवडे त्या प्रवेशा गेहीं । वसे सर्वीं ही सर्वात्मा ॥८७॥
ऐसें ऐकूनि द्वास्थवचन । संतोषलें द्विजाचें मन । सोळा सहस्र सतींचें भुवन । प्रवेशून पुढें पाहे ॥८८॥
कृष्णमहिषी सहस्र सोळा । त्यांची भुवनें देखोनि डोळां । ब्राह्मणातें आनंद जाहला । म्हणे सुकृतें सोहळा देखिला हा ॥८९॥
त्यां माजि कोणे एके सदनीं । ब्राह्मण पाहे प्रवेशोनी । तंव ते श्रीमत्सर्वाभरणीं । वैकुण्ठाहूनि वर विभवें ॥१९०॥
सदनीं प्रवेशतां द्विजवर । देहस्मृतीसी पडला विसर । ब्रह्मानंद योगेश्वर । पावतां शरीर जेंवि विसरे ॥९१॥
शरीरीं बाणली पराकाष्ठा । चिन्मात्रैकस्वरूपनिष्ठा । होतां आकल्प भवभ्रमकष्टा । सहित चेष्टा पारुषल्या ॥९२॥
कोण्हे एके सदनीं द्विज । प्रवेशला सहजीं सहज । तंव तेथें रुक्मिणी अधोक्षज । तेजःपुज्ज पर्यंकीं ॥९३॥
देखतां काष्ठा लागूनि ठेली । देहस्मृतीची भावना गेली । जाणूनि प्रभूनें त्वरा केली । तेही कथिली जातसे ॥९४॥
तं विलोक्याच्युतो दूरात्प्रियापर्यङ्कमास्थितः । सहसोत्थाय चाभ्येत्य दोर्भ्यां पर्यगृहीन्मुदा ॥१८॥
मंचकासनीं रुक्मिणीसहित । बैसला असतां श्रीअच्युंत । दुरूनि ब्राह्मण अकस्मात । देखूनि त्वरित धाविन्नला ॥१९५॥
परमानंदावाप्ति द्विजा । ऐसें कळलें अधोक्षजा । मंचकीं सांडूनि विदर्भात्मजा । धांविला सहजानंदात्मा ॥९६॥
मंचकातळीं घालोनि उडी । विप्रापासीं अतितांतडी । येऊनि त्यातें परमावडी । कारुण्यप्रौढी द्रवूनियां ॥९७॥
ब्राह्मण कवळूनि दोहीं बाहीं । सप्रेम आलिंगला हृदयीं । आनंद उथळला माजि दोहीं । कथिला कांहीं तो न वचे ॥९८॥
सरव्युः प्रियस्य विप्रर्षेरङ्गसङ्गातिनिर्वृतः । प्रीतो व्यमुञ्चदब्बिन्दून्नेत्राभ्यां पुष्करेक्षणः ॥१९॥
विप्रां माजि ऋषीवर । प्राचीन सखा जो प्रियकर । तदंग आलिंगूनि दृढतर । सुखें निर्भर हरि जाला ॥९९॥
परमप्रीती गहिंवरून । आनंदाश्रु टाकिती नयन । भक्तवत्सल श्रीभगवान । पुष्करेक्षण परमात्मा ॥२००॥
अथोपवेश्य पर्यङ्के स्वयं सख्युः समर्हणम् । उपहृत्यावनिज्यास्य पादौ पदावनेजनीः ॥२०॥
या नंतरे निज मंचकीं । विप्रा बैसवी स्वहस्तकीं । अर्पूनि उपायन कौतुकीं । चरणक्षालन आदरिलें ॥१॥
तया ब्राह्मणाचे चरण । क्षाळी स्वहस्तें जनार्दन । हृदयीं धरी आलिङ्गून । मौळ नयन परिमार्जी ॥२॥
मग ते प्रतिष्ठूनियां पीठीं । पादावनेजन धरी मुकुटीं । जयाचे पवित्रतेचिये साठीं । अखिल सृष्टी पूत करी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP