अध्याय ८० वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
N/Aआस्तेऽधुना द्वारवत्यां भोजवृष्ण्यन्धकेश्वरः । स्मरतः पादकमलमात्मानमपि यच्छति ।
किं न्वर्थकामान्भजतो नात्यभीष्टाञ्जगद्गुरुः ॥११॥
पुरवी सर्वग सर्वदेशीं । अपर वैकुण्ठक्षीराब्धिवासी । भक्तकारुण्यें सगुणतेसी । अवतारासी अवलंबी ॥४२॥
मथुरा गोकुळ वृंदावन । सांडूनि प्रस्तुत द्वारकाभुवन । वसवी यादव कोटिछपन्न । ज्या आधीन वर्तती ॥४३॥
यदुकुळाचा जो ईश्वर । वृष्णिभोजान्धकेश्वर । परंतु केवळ परमेश्वर । तो सर्वान्तर जिवासी ॥४४॥
पदपंकजातें जो स्मरे । त्याचे मनोरथ पुरवी पुरे । निष्काम भजका अर्पी सारे । विभव इन्दिरेसह आपणा ॥१४५॥
छपन्नकोटि यादवपति । संपन्न तव सखा श्रीपति । तुम्ही गेलिया तयापति । समस्त भजती तत्प्रेमें ॥४६॥
प्राकृत जे कां सखे मित्र । वोपिती केवळ अर्थमात्र । तैसा नोहे श्रीकलत्र । जो स्वतंत्र सर्वज्ञ ॥४७॥
अभीष्टार्थकामातें देती । ते परिपाकीं विरस होती । जगज्जनक जो श्रीपति । भजकांप्रति तें नेदी ॥४८॥
रावणाप्रति ऐश्वर्य गहन । देऊनि चकचकी गिरिजारमण । तदुन्मादें दुष्टाचरण । करितां त्रिनयन स्वयें कांपे ॥४९॥
घेऊनि वानरीं अवगणीं । सेवूनि हृदयस्थ कोदंडपाणि । रावण वधिला समराङ्गणीं । चक्रपाण न दे तैसा ॥१५०॥
रावण कथिला दृष्टान्तमात्र । अभीष्टार्थकामी सर्वत्र । ऐश्वर्य भोगूनि वैरस्यपात्र । न करी श्रीमित्र निजभजकां ॥५१॥
स्वात्मान म्हणिजे सच्चित्सुख । वोपी निजभजकां सम्यक । तुमचा सखा तो यदुनायक । जावे आवश्यक त्या भेटी ॥५२॥
कदापि सन्मुख न वदे वचना । परम साध्वी द्विजाङ्गना । तिणें इत्यादि मृदुभाषणा । विज्ञापना द्विजा केली ॥५३॥
ऐकूनि सतीची विनत विनंती । द्विजें विवरिलें अपुले चित्तीं । तें तें परिसें परीक्षिती । सप्रेम भक्तिपूर्वक पैं ॥५४॥
स एवं भार्याया विप्रो बहुशः प्रार्थितो मृदु । अयं हि परमो लाभ उत्तमश्लोकदर्शनम् ॥१२॥
सः म्हणिजे तो ब्राह्मण । ऐसा भार्येनें विनवून । बहुतप्रकारें मृदु प्रार्थून । करितां प्रसन्न पैं जाला ॥१५५॥
स्त्रियेचें वचन अनर्थप्रद । ऐसें वदती शास्त्रकोविद । सतीच्या वचनें मज मुकुन्द । दर्शनानंद हा लाभ ॥५६॥
द्रविणाभिलाष राहो परता । हाचि परम लाभ तत्वता । उत्तमश्लोकदर्शन होतां । मम सुकृता साफल्य ॥५७॥
स्त्री पुत्र कां सत्सेवक । अथवा अपर कोण्ही एव्क । प्रबोधिती सद्विवेक । तो आवश्यक स्वीकरिजे ॥५८॥
ऐसा विचार करूनि मनीं । उदित जाहला कृष्णदर्शनीं । तें तूं कौरवचूडामणी । सावध कर्णीं अवधारीं ॥५९॥
इति संचिंत्य मनसा गमनाय मतिं दधे । अप्यस्त्युपायनं किंचिद् गृहे कल्याणि दीयताम् ॥१३॥
ऐसें चिन्तुनी निज मानसीं । बुद्धि अवलंबिली गमनासी । मग म्हणे वो कल्याणराशी । कृष्णभेटीसी काय नेऊं ॥१६०॥
अल्पस्वल्प कांहीं सदनीं । हरीसी अर्पावया लागूनी । जरी असेल तरी कल्याणी । देईं आणूनि मजपासीं ॥६१॥
ऐसें ऐकूनि द्विजाचें वचन । संतोषलें सतीचें मन । म्हणे मम विनती केली मान्य । परम धन्य दैवरेखा ॥६२॥
आजिचा दिवस कल्याणकर । म्हणूनि स्फुरला मज विचार । ब्राह्मणें केला अंगीकार । उठिला सत्वर संतोषें ॥६३॥
याचित्वा चतुरो मुष्टीन्विप्रान्पृथुकतण्डुलान् । चैलखण्डेन तान्बध्वा भर्त्रे प्रादादुपायनम् ॥१४॥
मग ते विप्राची सुन्दरी । प्रवेशली विप्रां घरीं । पोहे मागूनि मुष्टी चारी । जर्जराम्बरीं बांधूनियां ॥६४॥
श्रीकृष्णासी उपायन । दिधलें कान्ता पें आणून । तेणें घेतलें संतोषून । मग प्रयाण आरंभिलें ॥१६५॥
स तानादाय विप्राग्र्यः प्रययौ द्वारकां किल । कृष्णसन्दरशनं मह्यं कथं स्यादिति चिन्तयन् ॥१५॥
सदा संतुष्ट अंतःकरणीं । या लागिं म्हणिजे विप्राग्रणी । मग तो पृथुकांतें घेऊनी । द्वारकेलागूनि चालिला ॥६६॥
चैलखंडें ग्रथित पृथुक । घेऊनि चालिला उदड्मुख । कार्यसिद्धीचे सूचक । शकुन सम्यक त्या जाले ॥६७॥
दृढ निश्चल किल अव्ययीं । पतिव्रतेनें मानिला हृदयीं । विप्रा भेटेल शेषशायी । संशय नाहीं यदर्थीं ॥६८॥
ऐसा लाभ लक्षूनि शकुना । विप्रप्रियेनें मानिला मना । मग ते परतोनि गेली सदना । पुढें प्रयाणा करी द्विज ॥६९॥
पदोपदीं द्विज चालतां । हृदयामाजी करी चिन्ता । बरव्या प्रकारें कृष्णनाथा । मज भेटविता कोण असे ॥१७०॥
सम्यक म्हणिजे बरव्या परी । मज कारणें कैसा हरी । भेटेल हें अभ्यंतरीं । चिन्तन करी पदोपदीं ॥७१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP