अध्याय ४५ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अथ शूरसुतो राजन्पुत्रयोः समकारयत् । पुरोधसा ब्राह्मणैश्च यथावद्द्विजसंस्कृतिम् ॥२६॥

नंद बोळवूनियां व्रजपुरा । रामकृष्ण निजमंदिरा । आलिया नंतर मातापितरां । पुत्रसंस्कारा प्रवृत्ति ॥४॥
शूरसेनापासूनि प्रभव । शूरासुत तो वसुदेव । मेळवोनि द्विजसमुदाव । करवी अपूर्व संस्कार ॥२०५॥
गर्गाचार्य पुरोहित । आणि द्विजवर्य समस्त । विवरूनियां श्रुतिसंमत । स्वयें निजसुत संस्कारी ॥६॥
सम्मानूनि यादवकुळें । सोयर्‍यांसि धाडिलीं मूळें । बिढागारासि योजिलीं स्थळें । उभविलीं अमळें वितानें ॥७॥
पाचारूनि शिल्पकार । त्वाष्ट्रतुळणेचे परम चतुर । शृंगारिलें मथुरापुर । ध्वजा विचित्र उभविल्या ॥८॥
वनें उपवनें काननें । शृंगारविलीं आज्ञावचनें । नगराभोंवतीं चित्रस्थानें । देवायतनें शोभविलीं ॥९॥
परिखामंडित पुरें गोपुरें । पण्यवीथी हाट चौबारें । द्वारें देहळ्या दामोदरें । निर्जरपुरें लाजविती ॥२१०॥
ब्राह्मणक्षत्रियवैश्यसदनें । वार्धुषिकांचीं विचित्रं भुवनें । अनेक यातींचीं अनेक वर्णें । विविध स्थानें शोभविलीं ॥११॥
हर्म्यगोपुरीं धवळारीं । रत्नजडित कळशहारी । जैसे प्रकटले ध्वांतारि । नगरांवरी बहुरूपें ॥१२॥
विचित्र वितानें पताका । श्रृंगारिल्या पुरभूमिका । सदनोसदनीं समस्त लोकां । उत्साह निका हरिप्रेमें ॥१३॥
ठायीं ठायीं ऊर्ध्वजळें । उडती शिल्पकौशल्यबळें । अनेक वाद्यें वादकमळें । स्थळोस्थळीं प्रतिष्ठिलीं ॥१४॥
मूळपत्रें सुहृद आले । बिढागारीं निवेशविले । उद्धवअक्रूरां निरूपिलें । पारपत्य तद्विषयीं ॥२१५॥
मुक्तामंडित कनकपत्रीं । तोरणें बांधिलीं पुरगोपुरीं । सर्वनगरीं सदनद्वारीं । तोरणहारी विराजती ॥१६॥
मखरें मंदप कदळीस्तंभ । उभयवीथी सजल कुंभ । पल्लवपट्टिका दधिकुसुमांभ । दीप स्वयंभ लखलखिती ॥१७॥
सर्व पुरंध्री सालंकृत । देखोनि देवांगना लज्जित । निर्जरांची कायसी मात । स्वयें भगवंत जे ठायीं ॥१८॥
नारायणाची उपमा नरां । लक्ष्मीसमान पुरसुंदरा । वैकुंठ तुळिजे मथुरापुरा । वसुदेवकुमरा संस्कारी ॥१९॥
सभास्थानीं उग्रसेन । भवंता मंडित यादवगण । वरिष्ठ पाचारूनि ब्राह्मण । पत्रिकाशोधन करविलें ॥२२०॥
सूर्य चंद्र बृहस्पति । एवं नवग्रहांची पंक्ति । बळिष्ठ बट्वाचार्यांप्रति । मुख्य गर्गोक्ति साधिली ॥२१॥
ग्रहहोरा आणि द्रेष्काण । नवांश द्वादशांश त्र्यंशांश पूर्ण । निर्मळ इष्ट वर्गशोधन । पंचकोत्तीर्ण दिनशुद्धि ॥२२॥
जगज्जनकाचा जनक हरि । त्याचिये विध्युक्त संस्कारीं । काळ अनुकूळ ग्रहनक्षत्रीं । होऊनि करी परिचर्या ॥२३॥
जातकर्मादि संस्कार । अतिक्रांत बहुवासर । प्रायश्चित्त निष्कृतिपर । तदनुसार द्विजाज्ञा ॥२४॥
हेमरत्नें वसनें रस । गो भू धान्यें पूर्णकलश । यथायोग्य ब्राह्मणांस । दिधलीं अशेष गर्गाज्ञा ॥२२५॥
दशदिशांचीं विप्ररत्नें । आणिलीं सम्मानें प्रयत्नें । त्यांसि विध्युक्त गोदानें । केलीं अर्पणें तें ऐका ॥२६॥

तेभ्योऽदाद्दक्षिणां गावो रुक्ममालाः स्वलंकृताः । स्वलंकृतेभ्यः संपूज्य सवत्साः क्षौममालिनीः ॥२७॥

साधु सवत्सा सुशीळा तरुणी । शुभलक्षणा पयस्विनी । हेममाळाकंठाभरणी । स्वर्णश्रृंगी रौप्यखुरी ॥२७॥
कांसादोहा क्षौमपृष्ठी । दिव्य नैवेद्य हेमताटीं । द्विजवर बैसवूनियां पाटीं । मंत्रपाठीं सुपूजित ॥२८॥
अर्घ्य पाद्य शुद्धाचमन । वस्त्राभरणें समर्पून । आंगीं चर्चूनि सुचंदन । सुमनमाळा मघमघित ॥२९॥
धूपदीपादि नैवेद्य । फळ तांबूळ दक्षिणा विविध । आरती पुष्पांजळि अभिवाद । सपर्याविध सारूनी ॥२३०॥
ऐसीं पूजित विप्ररत्नें । त्यांसि अर्पिलीं तें गोदानें । पुच्छें करूनियां तर्पणें । त्यागवचनें निगमोक्ति ॥३१॥
आत्मसत्तेचें निरसन । पात्रसत्ता उत्पादन । त्यागशब्दाचें व्याख्यान । श्रोते सज्ञान जाणती ॥३२॥
एवं पूर्वसंकल्पसिद्धि । ब्राह्मण पूजूनि यथाविधि । वसुदेव धर्मज्ञ विशाळबुद्धि । करी त्रिशुद्धि गोदानें ॥३३॥
पूर्वीं संकल्प कोणे काळीं । कोठें गोधनें संपादिलीं । ऐसी शंका श्रोतीं केली । तेही कथिली जातसे ॥३४॥

याः कृष्णरामजन्मर्क्षे मनोदत्ता महामतिः । ताश्चाददादनुस्मृत्य कंसेनाधर्मतो हृताः ॥२८॥

रामकृष्णांच्या जन्मसमयीं । असतां निरुद्ध कारागृहीं । अयुत धेनु पाहीं । स्मरोनि हृदयीं अर्पिल्या ॥२३५॥
तितुक्या आजी महामति । केवळ वसुदेव धर्ममूर्ति । सालंकृता द्विजांप्रति । यथानिगुती समर्पी ॥३६॥
कोठें संपादिल्या ऐसें । तर्किलें श्रोत्यांच्या मानसें । तरी ज्या अधर्में हरिल्या कंसें । त्या वृष्णीशें आणील्या ॥३७॥
जितुकें कंसाचें खिल्लार । अनेक वस्तु रत्नभांडार । सर्व हरूनि वृष्णीश्वर । करी देकार ब्राह्मणां ॥३८॥
त्यानंतरें पुण्याहपठन । नांदीश्राद्ध विधिविधात । देवकप्रतिष्ठापूर्वक जाण । चौलोपनयन सारिलें ॥३९॥

ततश्च लब्धसंस्कारौ द्विजत्वं प्रपय सुव्रतौ । गर्गाद्यदुकुलाचार्याद्गायन्नं व्रतमास्थितौ ॥२९॥

त्यानंतरें लब्धसंस्कार । रामकृष्ण उभय कुमर । मंत्रोपदेशीं अतिसादर । गर्गमुनिवर पुरोहित ॥२४०॥
चतुर्विंशति शटकमान । रत्नखचित हेमभाजन । मुक्ताफळीं करूनि पूर्ण । दिधलें आणून गर्गा पैं ॥४१॥
स्वर्णशलाका घेऊनि हातीं । क्षात्रगायत्री सव्याहृति । लिहिता झाला गर्गमूर्ति । यथानुगुती तत्पात्रीं ॥४२॥
विध्युक्त करूनि पूजन । वर्णसंख्या निष्कार्पण । गर्ग वसुदेव राम कृष्ण । एक वसन पांघुरले ॥४३॥
मंगळतुरांचा एक गजर । वैष्णवांचा जयजयकार । ब्राह्मणांचा संत्रस्वर । सुमनीं निर्जर वर्षती ॥४४॥
प्रणवपूर्वक प्रथम स्तवन । पदशः करवी मंत्रबोधन । मध्यमसवनें अर्ध जाण । मंत्र संपूर्ण सवनोत्तमें ॥२४५॥
एवं आचार्यापासून । द्विजत्व पावले रामकृष्ण । गायत्रव्रतस्थ जाले जाण । विधिविधान यथोचित ॥४६॥
ब्राह्मणांसि वांटिलें धन । वस्त्राभरणीं गौरवून । विद्योपजीवी सर्वजन । त्यागें संपूर्ण तोषविले ॥४७॥
सुहृदां अहेर पदस्परीं । मानें पूजिल्या पुरंध्री । कृष्णव्रतबंधें धरित्री । सुखसागरीं निमग्न ॥४८॥
ऐसा संपला व्रतबन्धु । व्रतस्थ जाले दोघे बन्धु । त्यांचा स्वयंभ अगाध बोधु । शुक गोविद नृपा कथी ॥४९॥

प्रभवौ सर्वविद्यानां सर्वज्ञ जगदीश्वरौ । नान्यसिद्धामलज्ञानं गूहमानौ नरेहितैः ॥३०॥

सर्वविद्यांचा समुद्भव । प्रकर्षें करूनि ज्यांपासाव । ते बळरामवासुदेव । मनुष्यभाव पांघुरले ॥२५०॥
यालागीं सर्वज्ञ जगदीश्वर । स्वयंभ विद्यांचें आगर । न होतांचि अभ्यासपर । विद्या स्वतंत्र प्रकाशिती ॥५१॥
अभ्याससाधनीं साधिल्या विद्या । त्या बोलिजेती अन्यसिद्धा । यांपासूनियां स्वतःसिद्धा । ज्या अखिलाद्या प्रकाशती ॥५२॥
ऐसें जयांचें अमळ ज्ञान । मनुष्यवेशें आच्छादून । मनुष्यचेष्टा आचरण । करिती वर्तन गूढत्वें ॥५३॥
कृपण लपवी आपुलें धन । तैसें लपवूनि अमळज्ञान । मनुष्यासमान क्रियाचरण । करिती वर्तन शिशुवेषें ॥५४॥
सकळ विद्यांचें जन्मस्थान । तेहीं घेऊनि मनुष्यपण । कैसें केलें गुरुसेवन । तें व्याख्यान अवधारीं ॥२५५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP