अध्याय ४५ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यस्तयोरात्मनः कल्प आत्मना च धनेन च । वृत्तिं न दद्यात्तं प्रेत्य स्वमांसं खादयांति हि ॥६॥

धनसंपत्तिऐश्वर्यश्वर । शरीरीं आरोग्य पटुतर । पितृसेवनीं अतत्पर । वंची शरीर धन धान्य ॥७३॥
नेदी पितरासी जीवन । त्यांचें न रक्षी वर्तन । वृद्धें झालिया शक्तिहीन । संगोपन जो न करी ॥७४॥
तो नर निरयपात्रभूत । देही असतां जीतचि प्रेत । मरणीं यमदूत अकस्मात । नेवोनि नरकांत घालिती ॥७५॥
समुद्रीं न विझे वडवानळ । तेंवि त्याचा जठरानळ । क्षुधाशमनार्थ स्वमांसकवळ । यमभट केवळ भक्षविती ॥७६॥
आपुलीं मांसें आपुल्या दशनीं । तोडोनि भक्षविती निशिदिनीं । ऐशा अनन्त यातनाश्रेणी । पितृसेवनीं विमुखातें ॥७७॥
यदर्थी व्यवस्थाविशेष । स्वमुखें निरूपी आदिपुरुष । सावध करूनि मानसास । श्रोतीं अशेष परिसावें ॥७८॥

मातरं पितरं वृद्धं भार्यां साध्वीं सुतं शिशुम् । गुरुं विप्रं प्रपन्नं च कल्पोबिभ्रच्छ्वसन्मृतः ॥७॥

निजपितरांची सेवरहित । तैं तो पुत्र जीतचि प्रेत । वृथा ताचा परमार्थस्वार्थ । संशय येथ उपजला ॥७९॥
दैव्यासुरीप्रकृतिमंत । कोणीएकाचें मिश्राचरित । ऐसे पितरासि पुत्र बहुत । त्यांमाजी क्कचित परमार्थी ॥८०॥
मातापितरें भवभ्रमितें । राजसां तामसां भजती स्वार्थें । धिक्कारिती सात्विकातें । परमार्थातें उपेक्षिती ॥८१॥
तरी काय त्यांचा वृथा जन्म । सात्विका केंवि म्हणिजे अधम । यदर्थीं निर्णय पुरुषोत्तम । स्वमुखें स्वधर्म वाखाणी ॥८२॥
कल्प म्हणिजे सामर्थ्यवंत । सदाचारी स्वधर्मनिरत । तयाचा विध्युक्तपरमार्थ । रमाकांत निरूपी ॥८३॥
वृद्ध माता वृद्ध पिता । सुशील भार्या पतिव्रता । पुत्र कुमार अदत्ता दुहिता । यांतें त्यागितां प्रेतत्व ॥८४॥
सत्पुत्रासि परमार्थ मुख्य । यातें पाळावें सम्यक । मोहें कथिती जरी अविवेक । तो निष्टंक न करावा ॥८५॥
गुरुशुश्रूषा सर्वांशिरीं । सुब्राह्मण जो सत्कर्मकारी । त्यांसि रक्षिजे सर्वांपरी । परमार्थथोरी हे मुख्य ॥८६॥
अनाततायी शरणागत । जंव तो होय संकटरहित । तंववरी रक्षिजे अतंद्रित । मुख्य परमार्थ या नांव ॥८७॥
ऐसियाची उपेक्षा करितां । हानि होय इहपरमार्था । जीतचि नर तो समान प्रेता । त्यासी सर्वथा नातळिजे ॥८८॥
त्याच्या स्पर्शें सचैल स्नान । हव्यकव्यां तो अनर्ह जाण । देवपितर त्यासि देखोन । जाती पळोन पापभयें ॥८९॥
इत्यादि पितृसेवारहित । तो संसारीं जीतचि प्रेत । आम्हांसि तेचि दशा प्राप्त । तो वृत्तांत हरि बोले ॥९०॥

तन्नावकल्पयोः क्म्सान्नित्यमुद्विग्रचेतसोः । मोघमेते व्यतिक्रांता दिवसा वामनर्चतोः ॥८॥

तस्मात् शिशुत्वें असमर्थ । कंसापासोनि भयत्रस्त । सर्वकाळ उद्विग्नचित्त । जीतचि प्रेत पैं झालों ॥९१॥
यावत्काळ सेवेविणें । तुमच्या यथोक्त अनर्चनें । आमुचें निष्फळ झालें जिणें । तें केंवि वदनें बोलावें ॥९२॥
आजिपर्यंत आयुष्याचे । दिवस निष्फळ गेले साचे । अर्चन घडलें नाहीं तुमचें । ऐसें वाचे हरि बोले ॥९३॥
तस्मात् आम्ही सापराध । तुम्ही कृपाब्धि अगाध । गतगोष्टीचा न कीजे खेद । म्हणोनि मुकुंद प्रार्थितसे ॥९४॥

तत्क्षंतुमर्हथस्तात मातरनु परतंत्रयोः । अकुर्वतोर्वां शुश्रूषां क्लिष्टयोर्दुर्हृदा भृशम् ॥९॥

आम्हांपासूनि जें अंतर पडलें । तें तुम्हीं पाहिजे क्षमा केलें । स्नेहवर्जितें विघडिलें । कंसें दुष्टें दुर्जनें ॥९५॥
कंसभयास्तव सक्लिष्ट आम्ही । शिशुत्वें परतंत्र पशुपसद्मीं । विमुख तुमचे शुश्रूषाकर्मीं । तें सर्व तुम्हीं क्षमावें ॥९६॥
जननीजनकें सहज स्नेहाळें । आम्ही सापराध तरी बाळें । सर्व क्षमूनि पाळणें लळे । इत्यादि गोपाळें प्रार्थितां ॥९७॥
शुक म्हणे गा परीक्षिति । ऐशा अनेक कारुण्योक्ति । बोलता झाला जगत्पति । त्या संक्षेपरीतीं तुज सांगो ॥९८॥

श्रीशुक उवाच - इति मायामनुष्यस्य हरोर्विश्वात्मनो गिरा ।
मोहितावंकमारोप्य परिष्वज्यापतुर्मुदम् ॥१०॥

विश्वात्मा जो आदिपुरुष । नटला मायामनुष्यवेष । इत्यादि तेणें मधुरोक्तींस । वदोनि जनकास मोहिलें ॥९९॥
त्याची ऐकोनि मोहक गिरा । द्राव आला पैं अंतरा । हृदयीं कवळूनियां कुमरां । आनंदनिर्भरा जाहलीं ॥१००॥
मोहें कवळूनियां जनकीं । उभय कुमर घेवोनि अंकीं । आनंदाश्रूंचिया उदकीं । दोघांमस्तकीं वर्षती ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP