मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
फुगडी

फुगडी

संत बहेणाबाईचे अभंग

५८९.
फुगडी घालिता नव्हे तुझा संग । जोवरी आहे देही तुझ्या विषयाचा रंग । कामक्रोधलोभे यांचा नाही जव त्याग । तोवरी वाया अवघे फुगडीचे सोंग ॥१॥
फुगडी घे विवेक धरी गे । पाहे परतोनी मागे । मग तूची हरी गे ॥धृ०॥
अहंकार दंभ मान दह्रू नको बाई । लोक - लाज भीड यासी देसवटा देई । कायावाचामनबुद्धि एकवटे होई । फुगडी घालिता मग देव तूचि पाही ॥२॥
परनिंदा द्वेष याचा नको करू साठा । धन विद्या पुत्र यांचा धरू नको ताठा । अवघे मोडूनि धरी एकभाव निष्ठा । बहिणी म्हणे तरीच तुज भेटी भगवंता ॥३॥

५९०.
फुगडी फू । घडी हो । न होसी उघडी । तर मग धगडी तू ॥धृ०॥
भूमिवरी झाडी । अंतरीचा कामक्रोध काढी । सांडी माया ओढी । मग होय भावा गडी ॥१॥
या वासनेचे ओचे । खोवी आधी साचे । निरोध इंद्रियांते । मग हरिरंगी नाचे ॥२॥
दोही पदावरी । एक भाव करी । अशिपदीवरी । मग तूच पाहे हरी ॥३॥
बद्ध सबळ भुजा । आधी सारी ओजा । जाण निजगुजा । मग फुगडी घाली ओजा ॥४॥
दृश्य भाव सांडी । एक भाव जोडी । प्रेमे घाली फुगडी । स्वानंदाची गोडी ॥५॥
ऐसी बहिणी फुगडी घाली । अवघ्या आणिल्या हारी । पांगविल्या पोरी । न येती बरोबरी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP