मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४१ ते ५०

मनःपर अभंग - ४१ ते ५०

संत बहेणाबाईचे अभंग

४१.
इंद्राचा संकेत होता लग्नकाळी । भोगीन मी वळे आहिल्येसी ॥१॥
हेत होता त्याचा त्वा काय केले । हेतेचि बांधिले ज्याचे तया ॥२॥
ब्रह्मयाचा हेत भवानी सुंदर । अंगुष्ठे विकार आणियेला ॥३॥
नारदेही तेची मागितले दान । हेतेचि बंधन पावला तो ॥४॥
शिवासी कामाचा हेत सर्वकाळ । म्हणोनी चपळ बाधी तया ॥५॥
व्यासही तैसाची निष्काम तो नाही । तो पडे अपायी नवल कोण ॥६॥
बहेणि म्हणे हेत गुंतला ते ठाई । घालिसी अपायी सत्य मना ॥७॥

४२.
आम्ही तो निर्हेत साक्ष ऐसी येत । भोगामाजी चित्त क्षणु नाही ॥१॥
आता मना येथे काय तुझे चाले । निर्हेत पाउले विठ्ठलाची ॥२॥
मनात पाहिले बुद्धीत गाइले । चित्तात ध्याइले विठ्ठलासी ॥३॥
वासना गाळिली सर्वही चाळिली । शांति स्थिरावली विठ्ठली हे ॥४॥
काम क्रोध लोभ मत्सराचे अंग । जाला पांडुरंग आपणाची ॥५॥
बहेणि म्हणे मना हेतूचा उगाणा । करूनी निर्वाणा पाहतसे ॥६॥

४३.
ब्रह्मचर्य आणि संन्यास घेईजे । वानप्रस्थ कीजे याचिलागी ॥१॥
निर्वासना साधे हेत हा निरसून । विषयाचा मन वीट धरी ॥२॥
योगायोग तपे व्रते अनुष्ठान । सेवावे अरण्य याचिलागी ॥३॥
बहेणि म्हणे हेत विषयांचा निरसला । तरी मना तुला कोण पुसे ॥४॥

४४.
दमुनी इंद्रिये आणिला विवेक । दाखविल सुख आत्मयाचे ॥१॥
मना तुझे मग काय चाले तेथे । राहे पै निवांत आप्णची ॥२॥
काम तो निष्काम करील विवेक । शांतीपासी देख क्रोध राहे ॥३॥
लोभास निर्लोभ विकुनी घालील । मोहोही जाळिल ज्ञानावळी ॥४॥
शुद्ध सत्त्व गुण तिन्ही अहंकार । घालील निर्धार धरी मना ॥५॥
आशा मनसा तृष्णा इच्छा हे वासना । आधीन आपणा करील तो ॥६॥
सांगितले तेची इंद्रिये वर्तती । विवेकसंपत्ती ब्रह्मनिष्ठ ॥७॥
बहेणि म्हणे मना नको करू बळ । विवेककुशळ आत्मवेत्ता ॥८॥

४५.
विवेक - सांगाती जयासी जोडला । थारा तो मोडला पातकांचा ॥१॥
तो आम्ही विवेक केलासे कैवारी । मना तुझी करी कोण चिंता ॥२॥
विवेके वैराग्य जोडेल निश्चित । भक्ति हे आंकित विवेकेची ॥३॥
बहेणि म्हने मना विवेक हा खाअ । तुझिया व्यापारा कोण पुसे ॥४॥

४६.
विवेके श्रवण करीन वेदांत । साधीन अद्वैत - ब्रह्मनिष्ठा ॥१॥
तुजपुढे बोले पण हाचि मना । तू धरी आत्मयाची ॥२॥
श्रवणाचे सार्थक मनने होय जाण । निजध्यासी खूण विश्रांतीची ॥३॥
बहेणि म्हणे मन अहोई तू सुमन । कासया भांडण होय पुढे ॥४॥

४७.
दहाही इंद्रिये गोवीन हरिपदी । मग तुझी बुद्धी हारपेल ॥१॥
यालागी तू मना इंद्रियांसमवेत । होय शरणागत अच्युताचा ॥२॥
निश्चयेसी बुद्धी चित्त अहंकार । संकल्पे निर्धार आत्मयाचा ॥३॥
बहेणि होये पायी वोळंगणा । विषयीक वासना सांडुनिया ॥४॥

४८.
मना तुझी सर्व वहने हिरोनी । नेली ते बांधोनी विवेके हो ॥१॥
बैसोनी हृदयात होय तू ध्यानस्थ । संकल्पाचा हेत वंचुनिया ॥२॥
दहाही इंद्रिये होऊनी पारखी । विवेकाची सखी सर्व जाली ॥३॥
बहेणि म्हणे तुज रूप नाही नाव । मना तुझी धाव पारुषली ॥४॥

४९.
नयन गोविले ध्यानी केशवाच्या । श्रवण हरीच्या कीर्तनी हो ॥१॥
विवेके इंद्रिया दाखउनी सुख । गोविली आणिक नाठवती ॥२॥
वाचा हे गोविली नामसंकीर्तनी । सेवायुक्त पाणि केशवाच्या ॥३॥
पाय तीर्थयात्रा देवाच्या दर्शना । कर्मेंद्रिया - खुणा वोळखाव्या ॥४॥
दहाही इंद्रिये विवेके गोविली । मना तू निर्बळी याचियोगे ॥५॥
बहेणि म्हणे मना विषयसेवनी । न येती नेमोनी टाकिली ती ॥६॥

५०.
चित्त नाही शुद्ध जयाचे अंतर । विषयी तत्पर सर्व काली ॥१॥
तया ज्ञान साधे असे तो घडेना । ज्ञानेवीण जाणा मोक्ष कैचा ॥२॥
नाही ज्या अपेक्षा साधनाची चाड । दोषाचा उघड वोतलासे ॥३॥
बहेणि म्हणे ज्ञान संतसंगे होय । चित्त जरी राहे सदा पायी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP