मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
चतुर्दश किरण

दीपप्रकाश - चतुर्दश किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
जयजयाजी ध्यानातीता । आनंदरूपा अव्यक्ता । तुज कैसें ध्यावें नाथा । हें न कळें ॥१॥
तुझें ध्यान करी विस्मरण । तुझें ध्यानीं तूं जासी पळून । होई मजसी जग हें शून्य । तुझ्या ध्यानें ॥२॥
तुझ्या ध्यानाचें वारें । जईं मम शरीरीं शिरें । तईं वृत्ति कोठें स्थिरें । न कळे मज ॥३॥
तरी देवा ऐसें न करी । तूं सदैव राही मम अंतरी । तव विरहजलाच्या सरीं । येऊं नेदी ॥४॥
नेसला पीत पीतांबर । जाण । घातली पीत कोपीन । सिद्धासन घालून । बैसला चौरंगीं ॥५॥
करीं नवग्रहाचें चक्र । कानीं कुंडलांचे चक्र । गळां तुळशीमाळ एक । स्फटिक माळा दुसरी ॥६॥
भालीं लाविली रामानंदी । दिसे ओंकार मुद्रेची जोडी । कर ठेवुनियां हृदीं । स्वानंदीं लावी दृष्टी ॥७॥
दिसे नीलशालेचा जर । फांकली प्रभा मुखावर । हेंचि ध्यान मनोहर । मम चित्तीं ठ्सावें ॥८॥
नाथा जैसा तूं आतां दिससी । तैसाचि राहे अहर्निशीं । न घेई अनंत रूपासी । मायबापा ॥९॥
मज न पाडी बा विस्म्रुति । हीच पायीं करी विनंती । जेथें जासी तेथें सांगाती । मज घेई ॥१०॥
तुझ्या सवें पुनर्जन्म । येतां मी आनंदित होईन । मोक्षाचें लिंबलोण । करीन तुझ्यावरूनी ॥११॥
गत किरणीं नाथदेव । सांगे मनाचा जय । मग अन्हिकालागीं जाय । स्नानसंध्यादि ॥१२॥
सारूनियां नित्यनेम । सांगे ध्यानाचें अनुपम । निरूपण श्रीमंगलधाम । ज्ञानराजा ॥१३॥
नाथ म्हणे नाईकास । कथिलें तुम्हां सुलभ उपायास । आसन घालोनी सावकाश । मनाच्या वृत्ति पहाव्या ॥१४॥
मग करावें मंगलध्यान । तेणें पंगू होईल मन - पवन । न करील चेष्टा नूतन । राहील एक्यास्थलीं ॥१५॥
या मनोलयाचीं साधनें । अनेक दिधलीं प्रभूनें । तुज कांहीं सांगेन संक्षिप्तपणें । तया ध्यानींच ठेवी ॥१६॥
करोनिया हटयोग । मन पावेल लयांग । परि त्या विचाराचा संयोग । दृढ करील ॥१७॥
देह हें वाफेचें यंत्र । इंद्रियें तयाच्या कला उचित । कलांनीं करितां आघात । यंत्रासी गति मिळे ॥१८॥
त्या कलांचे होतां निरोधन । यंत्र होईल शून्य । परि त्याची शाश्वती कोण । देईल नित्य ॥१९॥
हें जडांचे कार्य । मानव जडांहुनी श्रेष्ठ होय । म्हणोनि विचाराचें सहाय्य । द्यावें तयासी ॥२०॥
विचार जातां पूर्णावस्थेंत । मग इंद्रियेंहि होती मुक्त । धरिती आदरें श्रेष्ठ पंथ । मनोजयाचा ॥२१॥
बाह्यमुखाचें अंतर्मुख । ध्यानयोगेंच होईल देख । ध्यानयोग गड साधक । सहज चढेल ॥२२॥
असो कोणा अनेक नारी । राहो तो आपुल्या संसारीं । मिळवो द्रव्याच्या घागरी । तयाही साधे ध्यानयोग ॥२३॥
होवो तो पराचा गुलाम । चालवो आपुला योगक्षेम । जयाचे संस्कार असती अधम । तयाही साधे ध्यानयोग ॥२४॥
होवो पुरूष अथवा नारी । वृद्ध अथवा पोक्त कुमारी । जयाची फुलली यौवनमंजरी । तयाही साधे ध्यानयोग ॥२५॥
तो असो ब्राह्मण । अथवा वैश्य क्षत्रिय जाण । होवो शूद्र जातिहीन तयाही साधे ध्यानयोग ॥२६॥
असो हिंदु वा यवन । खिस्त वा जरद्रुष्ट - नंदन । सर्व धर्माची असे खाण । ध्यानयोग ॥२७॥
अरे या ध्यानावांचून । नाहीं एकही धर्म जाण । परि मूळ सोडून जन । जाती भलतीकडे ॥२८॥
कल्मापठण हें दृश्य ध्यान । प्रार्थना हें गुप्त ध्यान । जरद्रुष्टी पारशी जन । ध्यानावरीच राहती ॥२९॥
सर्व धर्मांचें हेंचि सार । सर्व कर्माचें हेंचि फल रूचिर । ध्यान हें मुक्तीचें सरोवर । जाण बाळा ॥३०॥
आतां ध्यानापूर्वीं आपुली वृत्ति । कैसी असावी निश्चितीं । हें निरूपण श्रोतीं । परिसावें ॥३१॥
मन सुप्रसन्न ठेवावें । सकल चिंतेचे भार सोडावें । मी निरोगी ऐसें कल्पावें । सदोदित ॥३२॥
मन हेंचि पसरवी रोग । मन हेंचि करी कार्य भंग । मन हें क्रोधाचें अंग । मन सर्वाधिकारी ॥३३॥
जे असती मनें दुर्बल । त्यांचा ध्यानयोग होईल चल । म्हणोनी लययोग विमल । गत किरणीं कथियेला ॥३४॥
तनुमन हीं मोक्ष साधनें । त्यातें न्यूनत्व न आणणें । तरी धनलोभ्यापरी त्वां जपणें । उभयतासी ॥३५॥
अग्निमांद्य अपचन । हे भयद रोग दोन । मनोदौर्बल्याचें कारण । जाण बाळा ॥३६॥
ज्याचें मन असे दृढतर । तो रोगास करील दूर । यासाठीं ठेवी शरीर । नित्य नियमीं ॥३७॥
नित्य नियमें राहतांबाळ ! देहयंत्र चाले सरळ । एकांतीं बसोनि अचल । अभ्यास करी ॥३८॥
आधीं करावें सगुण ध्यान । सगुणावीण नोहे निर्गुण । जो निर्गुणींच होई शून्य । ऐसा क्कचित ॥३९॥
सोडोनि प्रथम पायरी । जो उडी घालील वरी । घसरोनि पडेल धरणीवरी । होईल पांगुळा ॥४०॥
यासाठीं सगुण ध्यान श्रेष्ठ । हें वदती सर्व संत । सगुणाचें योगे मुक्त । सर्व झाले ॥४१॥
जें इंद्रियांही अगम्य । त्याचें ध्यान अनुपम । कैसा करील हें कर्म । साधारण साधक ॥४२॥
निर्गुणाची वाट बिकट । म्हणोनि सगुणाचा पंथ धोपट । दाखविती महंत । थोरथोर ॥४३॥
निरंजनपुरी जावया । भव - सरिता भरली राया । सगुण ध्यानाचा सेतू सया । उल्लंघी त्वरित ॥४४॥
जैसी असे जयाची स्थिती । तैसी त्यासी भक्ती । सगुणा निर्गुणाची मूर्ती । ध्यातां नये ॥४५॥
यासाठीं सगुणपूजन ध्यान । त्वां आधीं करावें हर्षून । घेशील जरी आडरान । पडशील खळग्यांत ॥४६॥
कालाचा महिमा विचित्र । सोडून देती कुलाचार नित्य । बुडविती देवा विहीरींत । म्हणती नको मूर्तिपूजा ॥४७॥
कोणी मूर्तिला उच्छेदिती । कोणी मूर्तीला नानापरी निंदिती । न कळतां वर्म करिती । ऐसी चावटी ॥४८॥
सगुणपूजा ही सर्व धर्मांत । कोठे प्रत्यक्ष वा अन्य स्थितींत । सगुणावीण नोहे प्राप्त । मोक्षलक्ष्मी ॥४९॥
म्हणोनि सगुणोपासना । आधीं करीरे नंदना । ही बाराखडी जाणा । शून्यग्रंथाची ॥५०॥
आतां सगुण ध्यान कैसें असावें । हें साधकें शोधावें बरवें । जैसी ज्यावरी श्रद्धा भावें । तीच आणावी सन्मुख ॥५१॥
ध्यान असावें शांत गोजिरें । ध्यान असावे सुंदर । ध्यान असावे मंगलकर । सर्वदाही ॥५२॥
ध्यान नसावें उग्र । ध्यान नसावें अतिप्रसंग । ध्यान नसावें तामसवर्ग । जैसें ध्याती ॥५३॥
कोणी ध्याती नरसिंह । कोणी काली भैरव । कोणी चंडीराक्षस भाव । करिताती ॥५४॥
जैसें ध्यान तैसें मन । हा सिद्धांत आहे जाण । तामसी ध्यान हें करील मन । तामसीच ॥५५॥
अथवा हींच कुळदेवतें असतील । तरी त्यांचे मूर्तीस द्यावे सत्वबळ । मग वृत्ति तैसीच राहील । निश्चयेंसी ॥५६॥
नरसिंहाचें ध्यान । करावें सौम्यपणें । जैसे देई आशीर्वचन । प्रल्हादासी ॥५७॥
असतां ध्यानासी भैरव । त्यासही रूप द्यावें शांतमय । जेसै देई प्रसाद अभिनव । भक्त जनासी ॥५८॥
आतां कालीचेंही ध्यान । करावें मातेसमान । अंकावरी घेउनी बालक जाण । प्रेम त्यास पाजी ॥५९॥
किंवा रामकृष्ण भगवान । तिच्या पदी वसती जाऊन । मस्तकी ठेवी करभूषण । परमहंसांच्या ॥६०॥
ऐसें उग्र देवतेसी । करावें सौम्य मानसीं । मग वृत्तिही तैसी । सौम्य होय ॥६१॥
करावें ध्यान मूर्तीचें । जियेचेच अवयव दिसती साचे । नातरी प्रभुचित्राचे । ध्यान आणावें मनीं ॥६२॥
प्रभूच्या लीला अनंत । त्यांतुनी एक करावी पसंत । तीच ठेवावी लक्ष्यांत । अलक्षी नसावी ॥६३॥
ध्यान करावें अवतारांचें । श्रीरामादि विभूतींचें । अथवा श्रीसद्गुरूरायाचें । उत्तम ध्यान ॥६४॥
त्या प्रभूची लीला आज । सूक्ष्म रूपें करी मौज । म्हणोनी मनाची ओढ सहज । लागेल गा ॥६५॥
मन होता एकाकार । होईल सूक्ष्मरूप साचार । मग खेळेल बाळा स्वैर । प्रभुलीलांत ॥६६॥
या कारणें प्रभूचे अवतार । ध्यानीं आणावे रूचिर । जे सगुणासी आधार । आज होती ॥६७॥
श्रीराम सीता लक्ष्मण । बैसले असतीं सिंहासनीं । पायीं ठेवी हनुमान । निज मस्तका ॥६८॥
चवरी ढाळिती भरत शत्रुध्न । मस्तकीं छत्र ही खूण । शोभे कमलनयन । रामराजा ॥६९॥
परि इतुक्यांचें ध्यान । तुज साध्य नव्हे जाण । म्हणोनि रघुकुलभूषण । आणि चित्तांत ॥७०॥
अथवा श्रीकृष्णाची बाळलीला । तुज ठसवील बाळा । ठेवीं नयनीं तो सांवळा । निरंतर ॥७१॥
बालरूप घेवोनी । खेळे यशोदेच्या अंगणीं । किंवा खाईं लोणी । मेघः शाम ॥७२॥
अथवा यशोदा काढी दुग्ध । तिच्या पाठीशी उभा गोविंद । किंवा नंद दरबारीं नंद नंद । गोपी गार्‍हाणींसमयीं ॥७३॥
किंवा शिरीं चढविला मुगुट । आंगावरी भूषणें झळकत । कटी पीतांबर पीत । गळां वैजयंती ॥७४॥
ऐसा नटून कुंजवनीं । उभा आहे चक्रपाणी । कदंबाच्या सुंदर भुवनीं । पाठीशीं गाय ॥७५॥
हातीं घेतली मुरली । विश्वमोहिनी जी झाली । काढोनि मधुरस्वरावली । बाहे भक्तवृंदा ॥७६॥
हेंचिं ध्यान गोमटें । तुज ध्यातां रोमांच उठे । मनाचा खेळ सत्वर आटे । या ध्यानयोगें ॥७७॥
अथवा करावें सद्गुरूंचे ध्यान । तयानें आकळे त्वरित मन । सद्गुरु तो प्रत्यक्ष जाण । दिसे लोचनासी ॥७८॥
सद्गुरू कैसे बोलती चालती । कोण्या ठायीं करिती वसती । ही प्रत्यक्षाची प्रचीती । सदा येई ॥७९॥
गुरू ध्यानीं न राहे भेद । सद्गुरू हा स्वयं सिद्ध । विश्व हाच सद्गुरू सिद्ध । जाहला गा ॥८०॥
सर्व ध्यानाहूने हे श्रेष्ठ । येथें न लागती कल्पनेचे कष्ट । प्रत्यक्ष प्रमाणासी अप्रत्यक्ष । कामा नये ॥८१॥
मग नाथें हास्य केलें । मी सद्गुरूचें ध्यान सांगितलें । माझें मज न कळे । ध्यानरूप ॥८२॥
तुम्हा वाटेल मी माझा गौरव केला । परि तयाची ओळख नाहीं मला । मीच गुरू मीच चेला । कोण कोणाची स्तुति करी ॥८३॥
परि हे ध्यानशास्त्र । येथें मी तूं पण व्यर्थ । दाखविला सिद्धांत । जो प्रकाशरूप ॥८४॥
नित्य प्रभाती आणि रातीं । अभ्यास करावा निश्चितीं । सोडोनि सकल बाह्यवृत्ति । जावें एकांतस्थलीं ॥८५॥
या अभ्यासाचे स्थान । तुज सांगेन विशद करून । तैसेंचि करितां शोभायमान । अधिक फल ॥८६॥
बांधावा मठ एक स्वतंत्र रूचिर । सखल ऐशा धरणीवर । करावें तया लहान द्वार । जावयासी ॥८७॥
द्वारीं वेल लावावे । नाना मधुर पुष्पांचे ताटवे । जेणे करूनी अंतरीं यावें । सुगंध वायूनें ॥८८॥
बांधाव्या भिंती सुंदर । मूषक मुंग्या तसे मार्जार । करावा प्रतिबंध थोर । यथाशक्ति ॥८९॥
भिंतीवरी काढावी चित्रावळी । जी पाहातां वैराग्य कळी । फुलोनी अभ्यास कालीं । मन लावी ॥९०॥
पूर्वपश्चिमेचा वारा असावा । प्रकाशही थोडा व्हावा । गोमयें भूभाग सारसावा । प्रतिदिनीं ॥९१॥
ऐशा स्थलीं विशेष । नसावा स्त्रियांचा वास । जयांचा पति हाचि । परमार्थ निःशेष । तयां नाही आडकाठी ॥९२॥
ठेवावें स्थान तें पवित्र । न येऊं द्यावे अन्य पंथ । उपानह वा अमंगल वस्तु । तेथे नसावी ॥९३॥
न ठेवावें सदैव उघडे । परमार्थाविण शब्द न घडे । अभ्यासावांचुनी रोकडें । कार्य न करावें ॥९४॥
ठेवावीं पुष्पें मधुर । उदबत्या लावाव्या साचार । जेणे मनास आनंद थोर । होय ऐसें ॥९५॥
ऐशा स्थलीं जो जाईल । तो कैसाहि असेल चंचल । तयाची वृत्ति स्थिरावेल । जाण बाळा ॥९६॥
होवो पाखंडी अधर्मी । लोळे सदा विषयकर्दमीं । तयाची वृत्ति ऐशा धामीं । रंगेल स्वरूपरंगी ॥९७॥
परि सद्यः स्थितीचा विपरीत काल । ऐसें स्थल कोणा दुर्मिळ । तरी गृहीच करावी सोज्वळ । एक खोली ॥९८॥
गृह मिळालें अत्यंत लहान । तरि तेथे पडदे लावून । करावें स्वतंत्र ठिकाण । अभ्यासासी ॥९९॥
जैसी जरीची वस्त्रे नसता । घ्यावीं साधीच तत्वतां । त्याविणें नग्न राहतां । जगी हांसे होईल ॥१००॥
अभ्यास हें मुख्य साधन । स्थळ हें केवळ गोण । जैसे साध्य तैसें साधन । सजवावें आपण गा ॥१॥
तेथें एका विटेचा ओटा । करावा आसनापुरता । अत्युच्च तो होतां । आसना भय ॥२॥
घालावें आधीं दर्भासन । त्यावरीं मृगव्याघ्र अजिन । धूत वस्त्राची घडी करून । टाकावी त्यावरीं ॥३॥
उच्चासनी गुरूमूर्ति । अथवा तयाची चित्रित प्रतिकृति । ठेवावी पुढें दीपज्योती । घृत वा तैलाची ॥४॥
मग होवोनि आसनबद्ध । अवलोकावी मूर्ती शुद्ध । जैसा पाही मृगेन्द्र । निजभक्ष्यासी ॥५॥
न हालवावी पापणी । कळ लागतां मिटावे नयन दोन्ही । तीच मूर्ति हृदयभुवनीं । सांठवावी ॥६॥
हा ध्यानाचा प्रथम धडा । तूं गिरवी चांगला बुधा । मग तयाचा पुढील पाढा । साध्य होय ॥७॥
नयन असोप मुकुलित वा उघदे । परि ध्यानाचें चित्त गाढें । न जाय दुसरीकडे । तीच सिद्धता प्रथम ॥८॥
ऐसी करितां सर्व मूर्ति स्थिर । मग एकेक अवयव दृष्टीवर । पदांघ्रीपासून शिर । आकळावें ॥९॥
तेंही होता स्थिर ध्यान । मग दीपाचें नसे कारण । पहावें दृष्टी लावोन । पूर्णरूप ॥११०॥
परि चित्तांत जैशीं आभरणें । जैशा स्थानीं सद्गुरूंचें बसणें । अथवा जरि असेल उभें राहणें । तैसेंचि असावें ॥११॥
यांत न करावी चूक । वृत्ति न होई निः शंक । येतील तर्क अनेक । मनीं तुमच्या ॥१२॥
कोठेंही नसावें न्यून । तेथेंचि ठेवावें अंतःकरण । एकाच ध्यानाची खूण । बळकट असावी ॥१३॥
ध्यानाचा न होवो बदल । हेंचि या योगाचें मूळ । तुज सांगतों कथा रसाळ । एतद्विषयीं ॥१४॥
भीष्म पितामह महायोगी । जो जाहला केवळ त्यागी । कौरवपांडव युद्धप्रसंगी । करी प्रतिज्ञा अभंग ॥१५॥
निः पांडवी पृथ्वी करीन । नातरी देह सोडीन । ही प्रतिज्ञा ऐकतां दयाघन । कृष्ण कळवळें ॥१६॥
जो पांडवांच्या भक्तीसाठी । जाहला केवळ सारथी । काढी उच्छिष्ट अति प्रीतीं । खाई उच्छिष्ट भक्ताचें ॥१७॥
श्रीकृष्ण नसतां पाठीशी । पांडवांची धडगत कैसी । पावले असते पतनासी । मग राज्य कैचें ॥१८॥
भीष्मप्रतिज्ञा निवाराया । योजी श्रीहरी उपाया । कटि लंगोटी घोंगडी होय । सहचारी तयाची ॥१९॥
घेई खांद्यावरी भगिनीस । पांडवांगना । द्रौपदी सतीस । चालता धांवत जगदीश । भीष्माजवळी प्रभातीं ॥१२०॥
भीष्माचें ध्यान श्रीकृष्ण । भीष्माचें पूजन श्रीकृष्ण । श्रीकृष्ण हेंचि नामस्मरण । योगींद्राचें ॥२१॥
भीष्माचें ध्यानीं श्रीकृष्ण । दिसला कंबल भूषण । स्कंदावरी स्त्री वाहून । नेतसे सांवळा ॥२२॥
ऐसें दिसतां आन ध्यान । रमेना भीष्मांचे अंतःकरण । एकाग्रतेचें अनुसंधान । चुकलें तयाचें ॥२३॥
भीष्मा ऐसा तापसी । न देखिला अन्य प्रदेशीं । परि त्याचीही गत ऐसी । ध्यानचलनें जाहली ॥२४॥
पुढे श्रीकृष्णें द्रौपदीस । मिळवून दिधलें सौभाग्य वरास । ती कथा महाभरतीं सुरस । वर्णियेली ॥२५॥
या कथेचा इत्यर्थ । करावें ध्यान एकचित्त । मग निर्मनस्क प्राप्त । साधका होय ॥२६॥
मग ध्याता आणि ध्येय । यांचें विस्मरण होय । ध्यानही समाय । तयांतची ॥२७॥
हीच तुर्येचि अवस्था । सहज समाधीचा ओटा । तूं साधावा भक्ता । प्रेमादरें ॥२८॥
तूं होता निर्गुण । मग करी निर्गुणाचें ध्यान । तें निर्गुणची सांगेल जाण । तुजलागीं ॥२९॥
तें नसे शाब्दिक ज्ञान । कैसें करावें शब्दानें । अनुभवाच्या खुणें । कळेल तुजलागीं ॥१३०॥
परि हे साध्य - कर्ता अभ्यास । अभ्यासाची धरीं कास । प्रयत्नावीण तुज लेश । मिळणार नाहीं ॥३१॥
गुरु - प्रभेची पहांट अभ्यासाविण नसे चोखट । साधितां कृति नित्य । तुज किरण दिसतां ॥३२॥
कृपा कोणी देता न घेता । तुझा तूंछ अससी मिळविता । तूंच अससी सर्व कर्ता । गुरु मार्गदर्शक ॥३३॥
बाळा नाईक ही भूमी रूचिर । त्यावरी सत्कृतीचा नांगर । फाळली तयानें जोरदार । मग परमार्थ घन कोसळेल ॥३४॥
ऐसी भूमीची होतां तयारी । धांवला श्रीनाथ शेतकरी । ध्यानबीज तयाच्या अंतरीं । रूजविलें तयें ॥३५॥
रूजलें बीज बाळाच्या अंतरीं । कोमल पावले तया फुटली । अभ्यास - जल घाली । तो सद्भक्त ॥३६॥
वाढला वृक्ष थोर । तया फळें आलीं रूचिर । तींच खावोनी तो नरवर । बीज तयार करी ॥३७॥
नाइकाच्या हृदयावरी । दिसते श्रीनाथ - मूर्ती गोजिरी । प्रत्यक्ष पाहतीं नरनारी । आश्चर्य हें ॥३८॥
ऐसा चमत्कार बघाया । येती अनेक त्या ठाया । म्हणती धन्य भक्ताया । धन्य त्याचा सद्गुरू ॥३९॥
याच ध्यान योगें तो गेला । बाह्यांतरीं नाथ रंगला । प्रत्यक्ष हातींच्या कंकणाला । आरसा नलगे ॥१४०॥
येथेंही केला स्वाहाकार । ब्रह्मसमंध पळविला दूर । गृहकलहाचा कहर । मिटविला अवचित ॥४१॥
प्रपंच न सांडितां । परमार्थ देई आयता । ऐसा सद्गुरू अवचिता । आम्हां सांपडला ॥४२॥
यातें जे म्हणती नर । तयांच्या नेत्रीं अज्ञानधूर विकल्प हें माहेर । त्यांनीं वसविलें ॥४३॥
तरी सोडोनियां भ्रांतीसी । भजा भजा सद्गुरुसी । मग चाखाल दिननिशीं । अमृताची गोडी ॥४४॥
अमृतातें मानिती विष । मुकतील इहपरलोक । आपुलेंच अहित देख । करोनि घेतील ॥४५॥
पुढील किरणी नाथ । भेटेल एका महंता । मग करील पुनीत । भक्तोत्तमा ॥१४६॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचिते ध्यानयोग निरूपणं नाम चतुर्दश किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP