मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
षष्टम किरण

दीपप्रकाश - षष्टम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
धन्य माझ्या सद्गुरुराया ! । धन्य तुझी कृती सखया । चढविल्या पांच पायरियां । दीपमंदिराच्या ॥१॥
मी केवळ पांगुळा । तेंवि असतां आंधळा । त्वां मज समर्थ केला । चढाया डोंगरावरी ॥२॥
मी जडबुद्धि टोणपा । जाहलों भारवाही जाण पां । परी तुझे लेणें अमूपा । लिहविलें अज्ञा करवी ॥३॥
तू होवोनी ज्ञाननाथ । बोलविला रेडा वेदोक्त । आतां माधवानाथरूपें खचित । नररेडा बोलविसी ॥४॥
कधीं न केला अभ्यास । धरिला प्रपंचाचा हव्यास । विषय वल्गनेची हौस । मज भारी होती ॥५॥
म्यां कधींही तुज नाही स्तविलें । मनोभावेंही न भाविलें । तुझें रूपही नच पाहिलें । डोळेभरी ॥६॥
माया शांकरीचे घोट । गटगटा प्राशून होतों लोळत । केली नाही कधीं खंत । गुरूरायाची ॥७॥
खावें प्यावें लोळावें । हेंच माझे पूजन बरवें । द्रव्यास्तव हिंडावें । हीच तीर्थ - यात्रा ॥८॥
प्रपंचाचें केले ध्यान । विषयसुख हें ध्येय जाण । चंचल चित्त हा ध्याता पूर्ण । ऐशा त्रिपुटींत राहिलों ॥९॥
जैसे शेण - किडे नांदती शेणांत । म्हणती आमुचा प्रासाद येथ । तैसे या संसृतीस प्रियपात्र । मानिलें रे गोविंदा ॥१०॥
मातापितरातें निंदिलें । बंधूजनां कष्टविलें । सर्वांसीही अवमानिलें । मत्तपणे ॥११॥
तों तूं आलासी धांवून । तुजसी म्यां पाचारिलें न । करिसी लोचटपणा हंसून । म्हणसी मज भिक्षा देई ॥१२॥
माझ्या चंचलचित्ताची भिक्षा । तूं मागितलीस सर्व लक्ष्या । परी मी केलें अलक्ष्या । तुज द्यावयासी ॥१३॥
देखोनी नाथसुताची ऐसी वृत्ति । ओतिसी निज - तेजस्वी शक्ति । ओढोनी घेसी कृपामूर्ति । चरणांजवळी ॥१४॥
जैसा लोहचुंबक लोखंड । ओढुनि घेई आपल्याकडे । तेंवी तूं कृपापाशे अखंड । ओढिसी नाथसुतासी ॥१५॥
किती वर्णूं तुझ्या उपकारा । मज कवि केलेस रे सुंदरा ! । परी निमित्तमात्र या लेंकरा । पुढें केलेसी ॥१६॥
जैसें आंग्लयुगीचे यंत्र एक । ज्याचे नाम ध्वनिलेखक । काढी मधुरस्वर अनेक । करी गायनवादन ॥१७॥
हा प्रताप नव्हे गा यंत्राचा । परी कुशल रचनाकाराचा । तेवीं स्वामी सर्व कर्तृत्वाचा । तूंच नाथा ॥१८॥
तूं अससी माझ्यासमोर । तुझे करहि दिसती शिरावर । तुझीं पाऊलें सुकुमार । हृदयीं झळकतीं ॥१९॥
तूं जें वदविसी तें वदेन । तूं लिहविसी तें लिहीन । तुझी घेवोनी आण । सत्य हें सांगतसे ॥२०॥
पंचकिरण हे पंचीकरण । तुवां लेखनीं आणोन । आतां षट् - किरणाचें कण । लेखणींत ओतिसी ॥२१॥
गतकिरणीं श्रीचित्रकूटांत । पातले श्रीयोगीनाथ । चालविती प्रियपूर्वजव्रत । मंदिराचें ॥२२॥
पूजी अतिथी अभ्यागत । अन्नदानाचें वाढवी महत्व । मुक्तद्वार ठेवी नित्य । सर्व भक्तांसी ॥२३॥
करी मंदिरजीर्णोद्धार । स्वयें कष्टोनी योगीवर । करवी नानाविध अलंकार । प्रभूकारणें ॥२४॥
बांधी एक सुंदर गुहा । आत्मपूजा करावया । केल्या अनेक ओसरिया । पांथस्थाकारणें ॥२५॥
नाथास एकदा झाला दृष्टांत । दिसले एक महान् संत । सन्मुख वृंदावन शोभत । पयोष्णी - तीरीं ॥२६॥
आज्ञापिती ते महंत । तुवां वृन्दावन उचलावें त्वरित । जें लाभेल तें घ्यावें खचित । न्यावें निजमंदिरे ॥२७॥
दृष्टांती दृश्य हें दिसतां । गेले नाथजी पयोष्णीपंथा । दिसलें वृंदावन तत्वतां । परी महंत नाहीं ॥२८॥
खोदिलें तें वृंदावन । तों झळकल्या पादुका दोन । आणवी मंदिरी नाथभूषण । करी स्थापन शुभस्थली ॥२९॥
दर्शना येती भक्त बहुत । त्या सर्वांसी वदे आदरयुक्त । करी पूर्ण भक्त मनोरथ । नानाप्रकारें ॥३०॥
हणमंत नामें एक वैश्य । आला श्रीचरणदर्शनास । विनवी मज अनुग्रह द्यावा ऐसा । जेणें वृत्ति समाये ॥३१॥
देखोनी भक्ताचा निश्चय । देई सद्गुरूनाथ अभय । सारोनी नित्य नियम सर्व । येई सत्वरीं गा ॥३२॥
आज्ञेनुसार नियम सारून । करी गुरूचरणा अभिवंदन । दीधलें मंत्रोपदेश ज्ञान । शिरीं कर ठेविला ॥३३॥
समाधिसुख त्या भक्तास । दावी प्रेमें योगीश । कृतार्थ होउनी वैश्य । प्रभुचरणी लागला ॥३४॥
तैपासुनी दृश्यपणें गुरूत्व । पावला श्रीमाधवनाथ । करी कृतार्थ शरणागत । भक्तजनां ॥३५॥
मोरशास्त्री नामें ब्राह्मण । होता बहु शास्त्र व्युत्पन्न । नाथचरणीं ठेवी मन । सद्भावानें ॥३६॥
पूजाया गुरूनाथ चरण । स्वगृही नेई एक दिन । प्रेमभावें कर जोडून । बैसला सन्मुख ॥३७॥
देखोनी त्याचा भावपूर्ण । नाथ म्हणे सोडी चिंता दारूण । तुज होतील पुत्र दोन । सत्वगुणी ॥३८॥
तव पत्नीनें केले स्नान । बैसली वृंदावनी जाण । आणी तिजला पाचारून । देतो श्रीफल ओटींत ॥३९॥
हर्ष झाला त्या द्विजवरा । जाई बघाया निजदारा । वृंदावनींच देखता तारा । म्हणे धन्य गुरूराज ॥४०॥
वृंदावन हे पार्श्वदारीं । नाथ कधीं न येती माझे घरीं । ऐसे असतां खूण खरी । कैसी कथिली ॥४१॥
कांतेसी म्हणे तुज प्रसाद । देती श्रीयोगाभ्यानंद । आज लाभलें निधान प्रचंड । पूर्वपुण्यें ॥४२॥
सति नाथपदीं ठेवी डोई । नाथे दीधलें बिल्वफळ पाही । तीन बीजे काढूनी देई । होई पुत्रवंती म्हणे ॥४३॥
प्रभूची वाणी फळा आली । दोन पुत्र एक कन्या प्रसवली । ऐसी लीला सजविली । चित्रकूट करवीस ॥४४॥
पयोष्णी तीरीं जातां नाथ । दिसला एक वृषभ पीडित । अंतकाळींच्या वेदना भोगीत । जाहला व्याकुळ ॥४५॥
आली दया करूणाघना । मारिली एक थापटी चरणा । नको सोडूं रे जीवना । राही पांच वर्षे ॥४६॥
ऐसे देतां आशिर्वचन । बैल उठला खडबडून । आश्चर्य करिती जन । भोवतालीम ॥४७॥
यापरी अनेक चमत्कार । करी सहजी योगीश्वर । भाविकां वाटे ईश्वर । निंदका जादुगार ॥४८॥
नाथकीर्ती पसरे त्या प्रांतीं । दर्शनाची होई दाटी । त्यास प्रसादाविण मागुती । जाऊं न देई ॥४९॥
प्रत्यही होती अनेक पंक्ती । कोणा उणे न पडो देती । साधू बैराग्यासी अर्पिती । धनधान्य ॥५०॥
श्रीगुरू स्वयें निस्पृह । स्वीकारी व्रत अपरिग्रह । त्यायोगे चाललें द्रव्य । जलापरी ॥५१॥
सखाराम बापू दिवाण । होते बहुत दिवसांपासोन । म्हणती नाथ माते लागून । हें उचीत नव्हें ॥५२॥
यांते करावा कांही उपाय । ना तरी जाईल नाथांचे नांव । हातीं भिक्षापात्र यावे । ऐसे दिन पातले ॥५३॥
सांगावें कांही महाराजा । आतां गत भली न समजा । माताजी यांतजी उमजा । सर्व कांही ॥५४॥
नाथ हे असती फकीर । जातील निघोन दूर । मग तुम्हावरीच सर्व भार । राहील ॥५५॥
तूं थोर कुलाची देवत । थोर पुरूषाची कांता । तुज न सोसवेल या आघाता । हीच चिंता मज ॥५६॥
मायेचा भाव आणून । बापू रडती स्फुंदस्फुंदून । म्हणे मी जुना सेवक म्हणोन । वाटे हळहळ ॥५७॥
जैसे गुर्जर देशीचें रडें । अश्रूविण होई गाढें । तैसें नक्राश्रू गाळिलें । सेवकानें ॥५८॥
कलिपुरूष बापूराव । नाथमाता ही कैकई होय । करी संचार अदय । नाथमाता - शरीरीं ॥५९॥
बापूचा विलाप ऐकून । ठकूबाई होती खिन्न । म्हणती कैसे करावें निवारण । संकटाचें ॥६०॥
बापूनें माता वश केली । मग पुंडाई चालविली । लोभवश वृत्ति झाली । करी अनीति कृत्य ॥६१॥
झाला भारी मदोन्मत्त । बोलें दुश्चितपणें नित्य । परी नाथ शांत चित्त । जैसा सरोवर ॥६२॥
बघोनी ऐसी अद्भुत शांति । विनविती प्रेमें मोरशास्त्री । भाऊसाहेब जोगहि येती । म्हणती सोडा वृत्ति ही ॥६३॥
नाथस्म्स्थान हें शुद्ध लोणी । बापू मार्जार जाईल गिळोनी । त्यास दंडावा चक्रपाणी । नातरी हानि होय ॥६४॥
ऐकोनी वच हे श्रीरंग । म्हणे जो करील तो भरील गा । मज तयाची तगमग कासया असावी ॥६५॥
मी ना ठेवी ना दवडवी । ही सर्व प्रभूची लाघवी । मग उगीच गाथागोवी । करणे हें वेडेपण ॥६६॥
परी भक्त करिती आग्रह । आपण चलावें आम्हांसह । फिरवावी दृष्टि अभिनव । जमाखर्ची ॥६७॥
माझा जन्माखर्च म्यां पाहिला । पूर्ण जमेचा अंक देखिला । खर्च ही पूर्ण जाहला । शिल्लक तितकीच ॥६८॥
परी भक्त न सोडिती आग्रह । म्हणोनी उठला नाथदेव । पाचारीला बापूराव । तो भरे कांपरे तयासी ॥६९॥
जो नर करी दुश्चित कृत्य । तन्मन सदा भीतिग्रस्त । ओढवलें दुर्दैव खचित । वाटलें तयासी ॥७०॥
पाहिल्या वह्या सकळ । तो दिसला असत्य खेळ । विपरीत कृति करी खळ । सखाराम ॥७१॥
श्रीजींचे अलंकार । ठेविले गहाण थोर थोर । केला हो सर्व संहार । नाथभूषणाचा ॥७२॥
खर्च दाविला ज्यास न पार । नाथांचे नांवें दहा हजार । केला संतांचा पाहुणचार । तो व्यवहि असे विलग ॥७३॥
देखोनी बापूचा खेळ विचित्र । सोडिले नाहीं शांतचित्त । परी म्हणे या माया जालांत । व्यर्थ आम्ही पातलों ॥७४॥
ऐशा कालींहि नाथांची वृत्ति । पाहतां जोग विस्मित होती । म्हणती धन्य ही शांति । गुरूरायांची ॥७५॥
होवोनी क्रुद्ध मानसीं । जोग वदती बापूसी । तूं विश्वासघातकी दिससी । दुरात्मया ॥७६॥
तुज ऐसा कृतघ्न । म्यां देखिला नाहीं अन्य । लाविसी नाथास दूषण । धिक् धिक् जिणें तुझें गा ॥७७॥
आतां हे कागद घेवोनी । जातों न्यायमंदिरीं झणीं । निजकर्माचीं फळें भोगुनी । येई परतुनी गृहीं ॥७८॥
ऐकतां जोगांची वाणी । मृत्तिकेसम बापू जाय विरोनी । काढी नयनांतुनी पाणी । म्हणे मज रक्षावें ॥७९॥
म्यां अपराध घोर केला । परी क्षमा करावी दयाळा । होईन पारखा कुटुंबाला । नेतां मज राजद्वारीं ॥८०॥
तुम्ही महानुभाव संत । मज अभय द्यावें समर्था । चुकलों चुकलों नाथा ! म्हणोनी चरणीं लागला ॥८१॥
अवलोकुनी दीन वदना । दया उपजली दयाघना । तुज क्षमा केली जाणा । आतां न करी ऐसें ॥८२॥
तों जोग विनविती प्रभूला । हा दयेचा अतिरेक झाला । बापू पात्र नव्हे क्षमेला । मज द्यावे सर्व कागद ॥८३॥
दयेसही मर्यादा पाहिजे । नातरी आत्मघात होईजे । जैसे भस्मासुरासी दीजे । वर शंभूने ॥८४॥
महा ठक बापू कारभारी । केलें मंदिर भिकारी । यातें सोडुनी देता हरी । परेशाही रूजू नव्हे ॥८५॥
न सोडावें बापूसी । द्यावा मान आमुच्या बोलासी । हा सर्प प्राशुनी दुग्धासी । वीष वमन करील ॥८६॥
परी न ऐकती नाथ । म्हणती ध्वनी सोडिला इत्युक्यांत । तो परतुनी घेतां सत्य । ब्रीद आमुचें जाईल ॥८७॥
बापू हा केवळ निमित्तमात्र । प्रभूच जाहला मजवरी रुष्ट । आतां येथें वास करणें अनुचित । मज वाटें ॥८८॥
ऐसा मनीं विचार केला । परी नाथें तो गुप्त ठेविला । म्हणे समय पाहून आपला । कार्यभाग करू ॥८९॥
देखोनी ऐसी उदारता । जोग म्हणती धन्य नाथा । ना कळे हंसावें कां रडावें आतां । लीला ही बघोनियां ॥९०॥
मज वाटे हा शांतिब्रह्म । किंवा रघुकुलतिलक राम । अथवा प्रगटला तुकाराम । आजी येथे ॥९१॥
मनीं बहुत खिन्न होती । भाऊसाहेब गृहीं जाती । झाले लज्जित मारेशास्त्री । अधोवदनें बैसलें ॥९२॥
तंव म्हणे ज्ञानराजा । नका करूं तामसी मौजा । लागतील कृमी तुमच्या बीजा । दुष्कृतीनें ॥९३॥
तामसवृत्ति हा डाग काळा । लागतां आपुल्या मनवस्त्राला । तो विशोभित करील सकळां । होईल अपशुनी ॥९४॥
तामसे जाळिलें देहनगर । फिरविला क्षेत्रावरी नांगर । तामसा सम दावेदार । दुसरा नसे ॥९५॥
महाप्राणवायु जिंकिला । विश्वाचाहि स्वामी बनला । परी तमें घालितां घाला । निः सत्व तो होय ॥९६॥
पहा हो विश्वामित्र ऋषी । साठ सहस्त्र वर्षांचा तापसी । परी तामसें तयासी । क्षणामाजीं जिंकिलें ॥९७॥
रावण इतुका देव ऋषी । परी तमें लावितां फांस त्याशीं । झाली जन्माची राख कैसी । तें लोकविश्रुत ॥९८॥
तम हा केवळ अंधःकार । वृत्तिवनाचा निशाचर । न होवो कोणावर । प्रयोग याचा ॥९९॥
ऐकोनी ही सात्विक वाणी । शास्त्री येती लोटांगणी । म्हणे धन्य माझा सद्गुरु धनी । वेळींच जागृति दिली ॥१००॥
मग नाथ जाती मातेपाशीं । वंदोनी सांगती तियेसी । सखाराम बापूच्या कटु कृत्यासी । मधुर शब्दे ॥१॥
प्रभु म्हणे मी न देखिला पैसा । मज तयाची नसे आशा । बापूनें लाविलें दशसहस्त्रा । अंगी माझ्या ॥२॥
ऐकोनियां नाथवचन । माता झाली क्रोधायमान । म्हणे बापू ऐसा दिवाण । न लाभे इतरत्र ॥३॥
आणोनी संताड्यांचें खिल्लारे । केलें आमुचें मातेरें । हातीं भिक्षापात्र तव उपकारें । आलें आमुच्या ॥४॥
या सरांसी एकच कारण । तुझ्या औदार्यें केलें विघ्न । झालें मम मंदिर नग्न । आतां येसी समोर ॥५॥
तूं आयत्या पीठावरी । बसलासी नागोबापरी । तव संगे मी भिक्षेकरी । होईल कीं खचित ॥६॥
पूर्वजें सांठविलें धन - सरोवर । तुवां टाकिली नाहीं त्यांत भर । निघालासी दिवाळखोर । दुरात्मया ॥७॥
नाहीं मिळविला छदाम । घेतला फुकट कीर्तीचा लगाम । तुज कोण म्हणेल पुरुषोत्तम । हें मज नाकळें ॥८॥
जा काळें कर येथूनी त्वरित । राहीं कांहीं काल अज्ञात । नातरी आमचा कीर्ति घात । व्यर्थ होईल ॥९॥
नाथमाता झाली कैकई । बसली कलीच्या हृदयीं । करोनी कल्लोळ ठायीं ठायीं । वना धाडिला नाथदेव ॥११०॥
परी कटुनिंबामाजीं जैसें । अमृत भरलें आपैसे । तेवीं या कटुकृतीमाजीं भासे । शुभंकर ॥११॥
कैकई श्रीरामाप्रति । जरी वनीं नच पाठविती । तरी जगदोद्वार कृति । कैसी घडती ॥१२॥
तेवीं ठकूबाई माता थोर । हा अपकार नव्हे उपकार । पाठविला कराया लोकोद्धार । माधवनाथ ॥१३॥
ऐकोनी मातेचें दुरुत्तर । मनीं तुष्टला योगीवर । म्हणे झाले कार्य सुखकर । पलायनाचें ॥१४॥
ज्यासाठीं केला देह धारण । त्यातव आली सुगंधी जाण । आतां स्वैर संचार करून । जन - जनार्दन सेवूं ॥१५॥
जनसेवा हें माझें व्रत । जनार्दन भज हें ध्येय खचित । जनींजनार्दन हा भाव सत्य । करूनी दाखवीन ॥१६॥
भक्त हे माझें पुत्रकलत्र । भक्त समुदाय हा प्रपंच नित्य । भक्त हे माझें सकलदैवत । जगतीं या ॥१७॥
मज नाहीं दुजा विचार । देवभक्तीं साचार । देवभक्त हे विष्णु शंकर । मज वाटे ॥१८॥
त्या भक्तांचें पालन । करावया शीघ्र जाईन । भक्त - काम - कल्पद्रुम म्हणवीन । जगदांतरीं ॥१९॥
भक्त ही कळवळ्याची जाती । भक्त ही माझी ज्योति । भक्त हीच माझी विश्रांति । त्रिभुवनीं ॥१२०॥
देईन माझ्या भक्तांस । गुप्त धनाची मूस । श्रीमंत करीन त्यांस । ऐसी आवडी ॥२१॥
मी जेथें जाईन तेथे । आहे माझा जगन्नाथ । मजसवें व्यंकटेश दत्त । सहज येतील ॥२२॥
गेलों जरी खडकावर । तेथें स्थापीन मंदिर । श्रीनाथांची ध्वजा शुभंकर । फडकवीन ॥२३॥
नको नको ही उपाधि । निजपदीं अडकली बेडी । ती तुटली आज रोकडी । धन्य ठकूमता ॥२४॥
केला जननीस नमस्कार । म्हणे तुझे उपकार थोर । तोडोनी सारा पाश सत्वर । दीधली फकीरी ॥२५॥
तूं गोपीचंद मातेपरी । झालीस गे उपकारी । तुज लाभो संपत्तीची सरी । बहुत काल ॥२६॥
सांभाळी आपुला देव । सांभाळी संस्थान सर्व । तव उपकृतीचा गर्व । वागवीन ॥२७॥
टाकोनी दिधलीं सर्व वस्त्रें । नेसुनी कटि लंगोट नाथें । बोचरी लोटी पूर्व वस्त्रें । घेई आनंदानें ।२८॥
वायुवेगें हें वृत्त । कळलें सर्व नगरांत । झाला चोहोंकडे कल्पांत । म्हणती निधान चाललें ॥२९॥
नाथ आमुचा श्रीराम । नाथ आमुचा विराम । नाथ आमुचा पुरुषोत्तम । चालला दूर ॥१३०॥
काय केलें ठकूबाई । कैसी झालीस तूं कैकई । कोणतें सौख्य मिळविलें आई । वना धाडोनी नाथराया ॥३१॥
जैसी अयोध्या रामाविण । तैसी करवी करी अश्रू - पतन । किंवा गोकुळ जैसें हरीविण । शून्य होई ॥३२॥
करवी ही देह - पुरी । नाथ तिची चैतन्येश्वरी । ती जाता मृतकळा खरी । कां न यावी ॥३३॥
करवी हें शांतिसरोवर । त्यात मंदिर कमलसुंदर । तेथें वसे लक्ष्मी मनोहर । नाथ आई ॥३४॥
नाथ आमचा प्रभाकर । जातां होईल अंधःकार । मग विषय - निशाचर । थैमान करील ॥३५॥
नाथ आमची कामधेनू । आमुचे करी पालनू । कितीही वर्णिला नाथभानू । तरी स्तुति अपूर्ण होय ॥३६॥
ऐसी व्याकुळ झाली जनता । आली धांवत तत्वतां । म्हणें कृपा करावी समर्था । रहावें येथेंच ॥३७॥
न जावें येथोनी आपण । करितों अन्य देवालय स्थापन । तेथें करावें स्थीर आसन । योगीराया ॥३८॥
या मंदिराची स्वामिनी । कैसी होईल ठकू जननी । असतां पुत्र चक्रपाणी । स्त्रियांचा हक्क नोहे ॥३९॥
ही गादी श्रीनाथ - पुत्रांची । नोहे गा इतरा जनांची । सोडा त्यागवृत्ति साची । रहावें येथेंच ॥१४०॥
आपण जातां देशान्तरा । आम्ही प्राण देऊं योगेश्वरा । आम्हा आधीं संहारा । मग करा हो पर्यटण ॥४१॥
तूं भूमि आम्हीं चारा । तूं आकाश आम्हीं चंद्रिका साजिर्‍या । तूं वायू आम्हीं कचरा । राहूं केवीं भिन्नत्वें ॥४२॥
तूं पुलिन आम्ही कण । तूं ज्योति आम्हीं प्रकाशपूर्ण । तूं माळी आम्ही उपवन । कैसें राहूं तुजविणें ॥४३॥
नको जाऊं नाथराया । तुज हत्या घडेल सदया । नको करूं हें पाप सखया । पाप - पुण्यातीता ॥४४॥
ऐसे शतशः विनविती । पायीं लोटांगण घालिती । मार्ग प्रभूचा रोधिती । घालूनी लोटांगण ॥४५॥
हस्तीं हात बांधून । करिती सजीव कुंपण । म्हणती कैसा जाईल पळून । आतां येथून ॥४६॥
देखोनी भक्तांचा अट्टाहास नाथें योजिली युक्ति विशेष । मज मातेची आज्ञा विशेष । उल्लंघवेना ॥४७॥
तुम्हीं जावें आईपाशीं । तिची आज्ञा आणावी मजपाशीं । मग होईन हो रहिवासी । चित्रकूटीचा ॥४८॥
गेले धांवून भक्त वेडे । म्हणती सुकृत जोड जेवढें । पाठवी आज्ञा नाथाकडे । न जावें म्हणोनी ॥४९॥
परी माता न मानी वचन । देई सर्वांसी दूषण । म्हणे तुम्हीच त्यातें विषण्ण । केला असे ॥१५०॥
मज चाड नाहीं हो कोणाची । तेवीं त्या कुमाराची । मी कदापिही न वांछी । त्यास येथें ॥५१॥
क्षोभले नगरीचे जन । विनविती श्रीनाथ - चरण । आम्हीहि समागमें येऊन । सेवूं ऐक्यभावें ॥५२॥
नाथ विचार करीती मनीं । प्रसंग दिसे बहुत कठीण । यांचे होता देहावसान । कीर्ति आपुली जाईल ॥५३॥
मग जनांप्रति वदती । मी दिसेन अनसूया पर्वतीं । मज पाहती जे सन्मती । त्यास मी भेटेन ॥५४॥
मी अदृश्य शक्ति खेळवून । तुमचें करीन पालन । हें माझें सत्य वचन । श्रवण करावेंगा ॥५५॥
जेथें मूल शक्ति राहणार । तेथें काय करील कलेवर । सोडा सोडा शोक - संभार । प्रिय भक्त हो ॥५६॥
मोरशास्त्री यांसी बोलविती । एकांती त्यातें सांगती । द्यावया जगासी सुमती । जातों आम्ही ॥५७॥
माझी चिंता नच करावी । चिंतनीं आवड ठेवावी । मज सहजीं बघावी । दिव्य ज्योति ॥५८॥
ऐसें अभय देऊन । निघे वायुवेगें करून । पाहतां पाहतां नाथ आपण । अदृश्य जाहला ॥५९॥
श्रोतृवृंदे खिन्न न व्हावें । निज अंतरा विचारावें । नाथ आले न गेले स्वभावें जेथील तेथेंच असती ॥१६०॥
नाथ पहावा आपणांत । आपण ही मिळावें तेजांत । मग आणूं त्यांतें ज्या रूपांत । येईल तैसाची ॥६१॥
आपण जखडिलें नाथचरण । तो कोठें जाईल पळून । कैसा होईल हो निर्गुण । सांगा मज ॥६२॥
नाथ आपुल्या सुखासाठीं । सोडी चित्रकुटाची संगति । आतां उगीच मनीं खंती । न करावी गा ॥६३॥
पुढील किरणीं अज्ञातवास । रूचेल श्रीमाधवास । घेईल अनेक नामांस । धोंद्या कोंड्यादिक ॥६४॥
नाना नाटकी सूत्रधार । दावील अनेक प्रकार । तो ऐकता चतुर । श्रोतेजन हांसती ॥६५॥
इतकीं रूपें घेईल । परी गूज तें गूज ठेवील । तें अनुभवेंच चाखवील । अनुभवियां ॥१६६॥
इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुतविरचिते चित्रकूटत्यागवर्णनंनाम षष्टम किरण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP