प्राकृत मनन - अध्याय आठवा

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


शिष्य :- तें ब्रह्म कसें जाणावें ?
गुरु :- तीन देवांहून वेगळें, तिन्ही अवस्थांचें साक्षि, ( जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ति या तीन अवस्था ) पंचकोशांहून निराळें सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप जाणावें. यांतून शरीरत्रयविलक्षणत्व व पंचकोशव्यतिरिक्तत्व हें ‘ अतद्वयावृत्तिलकक्षण ’, अवस्थासाक्षित्व तटस्थ, व सच्चिदानंदत्व हें स्वरूपलक्षण त्वंपदार्थाचें. पृथिव्यादिकांचा निषेध करून अवशिष्ट राहातें तें अतद्वयावृत्तिलक्षण. प्रपंचाला आधिष्ठानभूत असतें तें तटस्थ लक्षण. सत्याज्ञानानंद हें स्वरूपलक्षण तत् पदार्थाचें. या दोहोंचें ऐक्य तें अद्वितीय परब्रह्म जाणावें.
शिष्य :- तीन शरीरें कशीं जाणावीं ?
गुरु :- मातापितृभुक्तान्नपरिणत शुक्रशोणितापासून उपजून अन्नानें वाढतें, अन्न न मिळतां किंवा रोगानें मरतें, तें अन्नमय स्थूल शरीर ( शीर्यते ) नष्ट होतें म्हणून शरीर म्हणावें. सत्रा अवयवांचें लिंगशरीर. रागद्वेषादि वृत्ति वाढल्या म्हणजे याची वृद्धि व मी साक्षी अशा अध्यात्म विचारानें विवेकी जनांचे ठिकाणीं याचा लय होतो म्हणून शरीर. अज्ञान हें कारणशरीर. हें ‘ मी जीव ’ या अभिमानानें वाढतें व ‘ मी ब्रह्म ’ या स्वानुभवानें नष्ट होतें म्हणून शरीर. देह ( दह्यते ) जाळला जातो म्हणून देहही म्हणतात. स्थूलदेह अग्नीनें जळतो. डोळ्यानें दिसतो तो स्थूल देह. न दिसतां विचारानें कळतो तो सूक्ष्म देह. या दोहोंना कारणभूत जें अज्ञान तो कारणदेह होय.
शिष्य :- पूर्वीं पंचभूतांपासून दोन्ही देह जाहले म्हटलें आणि आतां अज्ञानापासून होतात म्हणतां; तर पूर्वापरविरोधाची वाट काय ?
गुरु :- अध्यारोपसृष्टि म्हणजे एकापुढें एक क्रमानें होणें. पहिल्या अध्यायांत सांगितल्याप्रमाणें पंचभूतांपासून दोन देह होतात, हें खरें. पण वास्तविक युगपत् सृष्टीचा विचार केला तर केवळ अज्ञान सर्वाला कारण आहे, म्हणणें योग्य आहे. वेदांमध्यें केव्हां केव्हां युगपत्सृष्टि ( एकदम अज्ञानानें सर्व प्रपंचविलास दिसणें ) मानली आहे. केव्हां तरी स्वप्नामध्यें एकदम सर्व थाट दिसतो. केव्हां एकापुढें एक क्रम दिसतो, तद्वत् सृष्टीही जाणावी. अध्यारोपसृष्टीमध्यें पंचभूतें दोन्ही शरीरांना कारण, व युगपत्सृष्टीमध्यें केवळ अज्ञानच कारण मानलें. कशीही सृष्टि होवो मिथ्यात्व समानच आहे. त्याच्या मिथ्यात्वाचें विवेचन मुमुक्षूंनीं करावें. स्थूलशरीर उघड आहे. सूक्ष्मशरीर सत्रा अवयवांचें. यावांचून स्थूलदेह कार्य करूं शकत नाहीं.
:शिष्य - दोन्ही मिळून कार्य करितात काय ?
गुरु :- अग्निसंयोगें काष्ठ दाहपाकादि करितें तथापि तें कार्य अग्नीचेंच जसें, तसें स्थूलदेहाश्रयें घडलेलें दर्शनगमनादि कार्य सूक्ष्म शरीराचें होय.
शिष्य :- सत्रा अवयव कोणते ?
गुरु :- ज्ञानेंद्रियें पांच ५, कर्मेंद्रियें पांच ५, प्राण पांच ५, मन १, बुद्धि १ मिळून सत्रा १७. लोकांमध्यें कांहीं जाणणार तर उद्देश, लक्षण, परीक्षा हे तीन उपाय आहेत. उद्देश म्हणजे वस्तुनामसंग्रहण, लक्षण म्हणजे वस्तुस्वरूपग्रहण, परीक्षा म्हणजे वस्तुस्वरूपविचार. सत्रा अवयवांचें नाम घेणें हा उद्देश. अव्याप्ति - अतिव्याप्ति - असंभव दोषरहित असाधारण धर्म हें लक्षण. लक्ष्यैकदेशीं लक्षण पाहाणें ती अव्याप्ति. जशी कपिला गाई. अलक्ष्यावर लक्षणवृत्ति ती अतिव्याप्ति. जशी चतुष्पदा गाय. लक्ष्यमात्रावर अलक्षण तो असंभव. जशी एकखुराची गाय. हे तिन्ही दोष नसोन सास्नादियुक्त जसें गाईचें लक्षण तसें इतरत्र घेणें. ते असें. दिग्देवतांनीं प्रेरणा केल्यावर कानाच्या छिद्रांत राहून जें नाना शब्द, भाषा जाणतें, तें श्रोत्रेंद्रिय हें लक्षण. कर्णछिद्रच जाणतें म्हणावें तर निद्रेमध्यें तें असून शब्दज्ञान होत नाहीं. तेव्हां तें श्रोत्र निराळेंच ही परीक्षा. याप्रमाणेंच सर्वत्र जाणावें. वायुदेवतायोगें त्वचेला व्यापून शीतोष्ण, मृदु, कठिण, स्पर्श जाणतें तें त्वगिंद्रिय. सूर्यप्रेरित चक्षु इंद्रिय डोळ्यांचे बुबुळावर राहून जें लहान, मोठें, आंखुड, लांब, निळें, पिवळें, पांढरें, तांबडें रूप जाणतें तें चक्षु. वरुणानें प्रेरित जिव्हाग्रावर राहून जी तिखट, अंबट, खारट, तुरट, कडु, गोड, रस जाणते ती जिव्हा. अश्विनीकुमारप्रेरित नासाग्रस्थ जें वास, घाण, गंध घेतें तें घ्राण. अग्निप्रेरित कंठ, ओठ, तालु, शिर, ऊर, दांत, नासा, जिव्हाश्रयानें स्वरवर्णोच्चार करतें तें वागिंद्रिय. जें इंद्रानें प्रेरित करतलाश्रयें देतें घेतें तें पाणींद्रिय. विष्णुप्रेरित पादतलाश्रयें चालतें तें पादेंद्रिय. मृत्युप्रेरित गुदाश्रयें मलोत्सर्ग करितें तें गुद.  प्रजापतिप्रेरित लिंगाश्रयें रतिसुख करितें तें उपस्थ. कंठीं राहून चंद्रप्रेरणेनें संकल्प विकल्प करितें तें मन. मुखीं राहून रुद्राच्या प्रेरणेनें अभिमान करितो तो अहंकार. नाभिस्थानीं राहून क्षेत्रज्ञप्रेरणेनें आठवण करितें तें चित्त. विशिष्टाचे प्रेरणेनें हृदयीं राहून श्वासोच्छ्वास करितो तो प्राण. विश्वसृष्टाचे प्रेरणेनें गुदस्थानीं राहून मलमूत्रोत्सर्ग करितो तो अपान. विश्वयोनीच्या प्रेरणेनें आंत बाहेर देह व्यापून इंद्रियांना बल देतो तो व्यान. अजाच्या प्रेरणेनें कंठीं राहून निद्राकालीं इंद्रियांना गोळा करतो व जागेपणीं इंद्रियांना जागोजाग घोळवितो तो उदान. जयाचे प्रेरणेनें नाभिदेशीं राहून अन्न - पाण्याचें समीकरण करितो तो समान. यांचे पोटभेद पांच उपवायू, ते हे. नाग उद्गार करतो. कूर्म उन्मीलनादि करितो. कृकळ शिंक करितो. देवदत्त जांभई देतो. धनंजय देहाला उबारा करितो. हे सर्व मिळोन एक लिंगशरीर. अज्ञान हेंच कारणशरीर. ( अज्ञानं कारणं ) अशी श्रुति आहे. स्थूल, सूक्ष्म देहरूप कार्यानें कारणाचा तर्क होतो ही युक्ति. मी अज्ञ हा अनुभव.
शिष्य :- या तिन्ही देहांहून सच्चिदानंदाचा वेगळेपणा कसा ?
गुरु :- बाधरहित सत्, स्वप्रकाश चित्, स्वानुभव आनंद, जसें पुरुषलक्षण स्त्रियांना नाहीं, व स्त्रीलक्षण पुरुषाला नाहीं, तसें सल्लक्षण अनृताला नाहीं, व अनृतलक्षण सताला नाहीं, व प्रकाशलक्षण अंधकाराला नाहीं, आणि अंधकारलक्षण प्रकाशाला नाहीं. तसें, चिल्लक्षण जडाला नाहीं, व जडलक्षण चिताला नाहीं. चांदण्याचें लक्षण उन्हाला नाहीं, व उन्हाचें लक्षण चांदण्याला नाहीं. तसें, आनंदलक्षण दु:खाला नाहीं, व दु:खलक्षण आनंदाला नाहीं. कालत्रयीं यथार्थ असणारें सत्. कालत्रयीं नसून खर्‍यासारखें भासतें व विचारानें नष्ट होतें तें असत्. मंदांधकारीं पडलेला रज्जु आपल्यावर आरोपित सर्पादि भ्रांतीचे वेळी पूर्वीं व पश्चात् एकरूपीच असतो व भ्रमानें भासलेले सर्पादिक विकार विचारानें नाहींसे होतात. या दोहोंचे परस्पर शब्दानें, विषयानें, लक्षणानें, प्रतीतीनें, व्यवहारानें, वैलक्षण्य आहे. तसें सल्लक्षण असतावर ( देहादिकांवर ) व असल्लक्षण सतावर नसून यांचे परस्पर वैलक्षण्य आहे. सूर्यादि प्रकाशाची गरज न ठेवितां स्वयें प्रकाशरूप असून देहादि जड पदार्थांना प्रकाश करतें तें चित्; स्वयें अप्रकाशरूप असून अन्याला प्रकाशित करीत नाहीं तें जड. ज्याप्रमाणें सूर्य स्वयं प्रकाशमान असून इतरांची गरज न ठेवितां घटादिकांना प्रकाशित करतो; घटादिक तर स्वयें प्रकाशमान असून इतरांची गरज न ठेवितां घटादिकांना प्रकाशित करतो; घटादिक तर स्वयें अप्रकाशित असून इतरांना प्रकाशित करीत नाहींत; त्याप्रमाणें पूर्वोक्त पंचप्रकारांनीं चिज्जडवैलक्षण्य जाणावें.
शिष्य :- हें जाणल्याचें फल काय ?
गुरु :- प्रकाश्यधर्म प्रकाशकाला लागत नाहींत. जसें, सूर्यानें प्रकाशित केलेल्या घटांदिकांचे बरे - वाईटपणाचे धर्म, व शुद्धाशुद्धता यांचा संबंध सुद्धां सूर्याला नाहीं, तसें देहादिकांचे धर्म आत्म्याला स्पर्श करीत नाहींत. असें जाणून मुमुक्षूनें देहादिनिष्ठ, नामरूप, जाति, वर्णाश्रम, प्रवृत्ति, निवृत्ति, विधिनिषेध, षट्भावविकार, षड्रर्मीं, आंध्य, मांद्य, पटुत्वादिक धर्म मला स्पर्श करीत नाहींत, असें जाणलें म्हणजे बंध होत नाहीं. हें फल.
शिष्य :- आनंदलक्षण काय ?
गुरु :- नित्य निरुपाधिक निरतिशय जें सुख तो आनंद. प्रतिकूल द्वेषविषय दु:ख. तें त्रिविध. देवांनीं दिलेलें अनावृष्ट्यादि आधिदैविक, भूतभौतिकापासून जाहलेलें आधिभौतिक, प्रारब्धानें देहादिकांचे ठाईं रोगानें घडलेलें आध्यात्मिक. अमृत सुखरूप असून, जीवाला आनंदित करितें. कालकूट स्वयें तापरूपी असून, जीवाला ताप देतें. यांचें परस्पर असें वैलक्षण्य आहे. रज्जुवत् सद्रूप, आदित्यवत् चिद्रूप, अमृतवत् आनंदरूप आत्मा व सर्पवत् मिथ्या, घटवत् जड, विषवत् दु:खरूपी देहादि प्रपंच जो त्याहून वेगळा, तो मी असंग  आत्मा असें जाणतो तो मुक्त होतो.
आठवा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP