प्राकृत मनन - अध्याय पांचवा

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


शिष्य :- आत्म्याला जन्म कर्मानें मिळतो म्हटलें, तें कर्म किती प्रकारचें, व त्यानें जन्म कसकसे मिळतात ?
गुरु :- पुण्य, पाप आणि मिश्र असें तीन प्रकारचें कर्म आहे. त्यांतून पुण्यकर्मानें देवशरीर, पापानें तिर्यक ( पश्वादि ) शरीर, आणि मिश्रानें मनुष्यशरीर प्राप्त होतें. तें उत्कृष्ट, मध्यम, सामान्य भेदानें प्रत्येक तीन प्रकारचें होतें. तें असें - उत्कृष्ट पुण्यानें ब्रह्मादिशरीरें, मध्यम पुण्यानें यक्षादिशरीरें, सामान्य पुण्यानें राक्षस, भूतें, प्रेतादि शरीरें; उत्तम पापकर्मानें विषवृक्ष, कंटकादि वृक्ष, सर्प, वृश्चिक, व्याघ्रादि शरीरें; मध्यम पापानें पत्र, पुश्प, फलयुक्त लता; वृक्ष खरोष्ट्र महिषादि शरीरें. सामान्य पापें तुलसी, वट, अश्वत्थादि, ज्ञानयोग्य शरीरें, मध्यमानें काम्यकर्मयोग्य शरीरें, आणि सामान्यानें ( मिश्र कर्मानें ) किरात, म्लेंछादि शरीरें होतात. तेव्हां मनुष्यानें हें तारतम्य जाणून स्ववर्णाश्रमोचित कर्में ईश्वरोद्देशानें करून मिश्रोत्कृष्ट कर्मफल साधून घ्यावें.
शिष्य :- ही कर्मे कोणी केली जातात ?
गुरु :- त्रिविध करणांनीं. ( काया, वाचा, मनानें. )
शिष्य :- लोकांमध्यें अहंशब्दार्थ वाच्य आत्मा हें मी करितों, असा अभिमान घेतो. त्याला सोडून करणाला कर्तृत्व कां मानावें ?
गुरु :- तो आत्मा अविकारी, निष्क्रिय, कसा कर्ता होईल ?
शिष्य :- तर त्यावर कर्तृत्व कां भासतें ?
गुरु :- अध्यासानें. तें स्वाभाविक म्हणावें तर पूर्ववत् दोष येईल. कर्तृत्व कायम केलें तर गुरु - शिष्य परंपरा व जीवन्मुक्ती नष्ट होईल. आणि ( निष्कल - शांत - साक्षी - चेता - केवल - निर्गुण ) ही श्रुती बाधित होईल. कर्तृत्व असतें तर झोपेमध्येंही दिसतें.
शिष्य :- जशी सुताराच्या अंगी कारागिरी असोन भोजनादि समयीं ती दिसत नाहीं त्याप्रमाणें जीवाला कर्तृत्व असून करणांचा लय जाहल्यामुळें झोपेंत तें दिसत नाहीं.
गुरु :- तर तूष्णींभूतावस्थेमध्यें करणें असून कर्तृत्व कां दिसत नाहीं तेव्हां तो अध्यास जाणावा.
शिष्य :- अध्यास म्हणजे काय ?
गुरु :-अन्यनिष्ट कर्माचा अन्यत्र भ्रम जो, तो अध्यास होय. जसें नौकेंतून जाणार्‍याचें चलन वृक्षावर व वृक्षाचें स्थिरत्व नौकेंतून जाणार्‍यावर भासतें, तसें त्रिविधकरणकर्तृत्व आत्म्यावर व आत्म्याचें अकर्तृत्व करणावर भासतें हा अध्यास.
शिष्य :- करणें तर ( अचेतन ) जड त्याला कर्तृत्व कसें ? व कर्तृत्व मानलें तर अन्य करणेंही पाहिजेत.
गुरु :- वायु व जलप्रवाह जड असून करणांवांचून वृक्षादिकांला दूर टाकितात तसेम हें समजावें.
शिष्य :- त्यांचीं कर्में कोणची ?
गुरु :- सगुणध्यान, परोपकारचिंता, भक्ती, ज्ञान, वैराग्य हीं मनाचीं पुण्यकर्में; विषयचिंता, परोकारचिंता, वेदशास्त्रप्राणाण्यचिंता, ( नास्तिकपणा ) हीं मनाचीं पापकर्में; आणि सगुणध्यानादिसमयीं विषयचिंता करणें हें मनाचें मिश्रकर्म. वेदशास्त्र, गीता, सहस्रनाम - पठन, मंत्र - जप, भगवत्कीर्तन, सत्यवार्ता, मृदु भाषण हीं वाचिक पुण्यकर्में, वेदांत वेदशास्त्र दूषण, असत्य, पिशुन, पारुष्य, वार्ता, थट्टा हीं वाचिक पापकर्में, व सत्कर्म करतेवेळीं थट्टा, लोकवार्ता, निंदादिक, वाचिक मिश्र कर्में. पुण्य तीर्थी स्नान, गुरुसेवा, देवपूजा, प्रदक्षिणा, सज्जन - दर्शन, त्याग, लोकानुग्रह संचार, इत्यादिक हीं कायिक पुण्यकर्में जाणावींत. परहिंसा, परस्त्रीसंग, दुष्टसंग, चोरी, मारामारी इत्यादिक हीं कायिक पापकर्में; आणि ब्राह्मणभोजनार्थ लोकांला उपद्रव, देवालयाकरितां परद्रव्यापहार, पाणपोय ठेवून चाकरास पगार न देणें इत्यादि कायिक मिश्रकर्में होत.
शिष्य :- या कर्मांचा विचार करून फळ काय ?
गुरु :- मुख्य आणि अवांतर अशीं दोन प्रकारचीं फळें आहेत. हीं कर्में काया, वाचा, मनानें घडतात. मी तर आत्मा परिपूर्ण चैतन्यरूपी असंग आहें म्हणून मला कर्मांचा स्पर्श सुद्धां होत नाहीं, असें दृढानुभवानें नि:संशय जाणणें हें मुख्य फल, व ज्ञानोत्तर हीं त्रिविध कर्में पुण्य कर्मी ठेवणें हें अवांतर फल. केळ लावणार्‍या केळीं मिळणें हें मुख्य फल व पत्र पुष्पादि मिळणें हें अवांतर फल जसें; तसें हें समजावें.
शिष्य :- पद्मपत्राला उदकस्पर्श होत नाहीं, त्याप्रमाणें ज्ञान्याला कर्मलोप होत नाहीं अशी स्मृती आहे; तेव्हां हा नियम कां ?
गुरु :- ब्रह्मवित्, ब्रह्मदिद्वर, ब्रह्मविद्वरीयान्‍, ब्रह्मविद्वरिष्ट असे चार प्रकारचे ज्ञानी आहेत. त्यांतून शेवटला वृत्तिशून्य आहे म्हणून त्याला विधिनिषेश नाहीं. बाकी तिघांला वृत्ती आहेत म्हणून त्यांनीं लोकसंग्रहार्थ कर्मी लोकांमध्यें त्यांचा बुद्धिभेद न होऊं देतां अनासक्तीनें कर्में करावींत, व मुमुक्षु जनांला कर्मभरापासून हळूंहळूं सोडवून सत्कर्माचरणपूर्वक ज्ञानोपदेश करावा, असें श्रुती सांगते. हा नियम नव्हे.
शिष्य :- मी करवितों, मी करवीन इत्यादि लोकांमध्यें व्यवहार दिसतो, तेव्हां आत्मा करविता होत नाहीं काय ?
गुरु :- जसें आत्म्याला कर्तृत्व नाहीं म्हणून सांगितलें; त्याच न्यायानें कारयितृत्व नाहीं असें सिद्ध होतें.
शिष्य :- मग कारयितृत्व कसें भासतें ?
गुरु :- लोहनिष्ट वर्त्लत्वादिक अग्नीवर व अग्निनिष्ठ उष्णत्व प्रकाशादि लोहावर जसें भासतें, तसें तादात्म्यानें रागादिनिष्ठ कारयितृत्व आत्म्यावर भासतें तें मिथ्या. कारण जर सत्य असतें तर निद्रासमाधिकालींही भासतें.
शिष्य :- एवढ्यानेंच नाहीं म्हणतां येत नाहीं; कारण अध्यापकाला ( गुरूला ) पढविण्याचें सामर्थ्य असलें तरी जवळ शिष्य नसतां तें अनुभवास येत नाहीं. त्याप्रमाणें करणें नसल्यामुळें झोपेंत आत्म्याचें कारयितृत्व दिसत नसेल.
गुरु :- उदासीन दशेमध्यें करणें असूनही कारयितृत्व कां दिसत नाहीं तर तेव्हां अन्वयव्यतिरेकानें ( रागादिक आहेत तर करणें प्रवृत्त होतात, नाहीं तर होत नाहींत. या न्यायानें ) रागादिकांचें हें कारयितृत्व सिद्ध होतें. आत्मा तर ( अदृश्य, अव्यवहार्य, अग्राह्य, अचिंत्य, अव्यपदेश्य इत्यादि लक्षणांनीं ) श्रुतीसिद्ध अविकारी आहे. अचिंत्य, अव्यपदेश्य इत्यादि लक्षणांनीं ) श्रुतीसिद्ध अविकारी आहे.
शिष्य :- रागादिक जड, त्यांना हें सामर्थ्य कसें ?
गुरु :- जड अग्नि दारूगोळा भरलेल्या तोफेला झगडून, तो गोळा उडवून, चतुरंग सेनेला मारवितो व प्रेतक्रिया जड असून परलोकीं प्राण्याला जीवन देणारी होते. तसें, हें जड असलें तरी रागादिक योग्यतावशें करविणारे होतात.
शिष्य :- तर, आत्मा हृषीकेश या श्रुतीचें तात्पर्य काय ?
गुरु :- आदित्याच्या प्रकाशानें लागतं नाहीं जसें; तसें, आत्म्याच्या सांन्निध्यानें रागादिहेतुक इंद्रियवृत्ती होऊन पापपुण्यात्मक कर्म घडतें, त्याचा संपर्क आत्म्याला नाहीं. लोहचुंबकाप्रमाणें आत्मसांनिध्यानें इंद्रियें चलायमान होतात म्हणून हृषीकेश ( इंद्रियनियंता ) म्हणतात हें तात्पर्य.
शिष्य :- आत्म्याला कर्तृत्व, कारयितृत्व नाहीं हें श्रवण केलें तरी निश्चय कां होत नाहीं ? त्यास प्रतिबंध कोणते ? त्यांचीं लक्षणें काय ? व ते दूर कसे होतील ?
गुरु :- संशयभावना, असंभावना, विपरीतभावना हे तीन प्रतिबंध. ऋग्वेदादिकांनीं सांगितलेलीं कर्में, ( हौत्र, आध्वर्य व उद्गीथ ) निरनिराळीं जशीं, तशीं ऋग्वेदानें सांगितलेलें ( प्रज्ञान ब्रह्म ), यजुर्वेदानें सांगितलेलें ( मी ब्रह्म ), सामवेदानें सांगितलेलें ( तें तूं आहेस ) व अथर्वण वेदानें सांगितलेलें ( हा आत्मा ब्रह्म ) हीं ब्रह्में निरनिराळीं आहेत कीं एकत्र आहेत असा जो संशय ती संशयभावना. ही, सर्व वेदांचें तात्पर्य ब्रह्म एकच आहे अशा श्रवणानें दूर होते. खरोखर ईश्वर, जीव आणि जग, भिन्न नसून भिन्न आहे असें वाटतें, ती असंभावना. ही स्वप्नदृष्टांतरूप मननानें नष्ट होते. श्रवण, मनन केलें तरी जगाची स्थिति सत्यत्वानें प्रतीतीला येते ती विपरीत भावना. ही, निरंतर ब्रह्मैकाकारप्रत्ययरूप निदिध्यासानें ( ध्यानानें ) नष्ट होते. जसें, अग्नीचें स्तंभन केल्यावर तृण सुद्धां जळत नाहीं व तें दूर होतांच जळतें. तसें तें प्रतिबंधत्रय असेपर्यंत ज्ञानाग्नि कार्य करण्यास समर्थ होत नाहीं. ते प्रतिबंध दूर होतांच तत्काल तो ( ज्ञानाग्नि ) अविद्या तत्कार्य ( मायेसहित प्रपंच ) जाळतो. म्हणून षट्विध लिंगानें तात्पर्यावधारण श्रवण करावे.
शिष्य :- सहा लिंगें कोणतीं ?
गुरु :- १ उपक्रमोपसंहार, २ अभ्यास, ३ अपूर्वता, ४ फल, ५ अर्थवाद, ६ उपपत्ती, हीं सहा लिंगें. सामवेदामध्यें सद्वस्तु प्रथम एकच होती असा उपक्रम करून एतद्रूप हें सर्व सत्य हाच आत्मा तूं आहेस असा उपसंहार केला म्हणजे आज हें दिसणारें जग पूर्वीं सत् ( असणारें ) होतें. हा वेदांनीं उपक्रम आरंभ करून त्या जगाचा उपसंहार ( लय ) त्याच ब्रह्मस्वरूपीं सांगितला. ते उपक्रमोपसंहारूप पहिलें लिंग १ मी ब्रह्म अशी पर्यायानें पुन: पुन: आवृत्ती करणें. या अभ्यासाचे नऊ प्रकार, ते असे. पायास दोरी बांधून सोडलेला पक्षी कोणच्याही दिशेस उडाला तरी शेवट बांधलेल्या खांबावर येतो, त्याप्रमाणें मन कोठेंही गेलें तरी प्राणबंधन आहे म्हणून पुन: स्थितीवर येईल तें प्रयत्नानें आणावें. मग वाणी मनांत, मन प्राणांत, प्राण जीवत्वांत लीन होईल इत्यादि प्रथमाभ्यास. १ मक्षिकांनीं नानाप्रकारेचे रस एकत्र केल्यावर हा अमुक वृक्षाचा रस असें भान रहात नाहीं, तशा सर्व वृत्ती लीन जाहल्यावर एकरस आनंद होतो, ह दुसरा अभ्यास. २ नद्या समुद्राला मिळाल्यावर त्यांचीं नामरूपें नष्ट होऊन एक समुद्रच होतो, हा तिसरा अभ्यास. ३ मूळ तुटल्यावर वृक्ष वाळतो, तसें जीवानें सोडलेलें शरीर मरतें, जीव मरत नाहीं. तो ब्रह्मांश आहे म्हणून. तत्त्वज्ञानानें उपाधि नष्ट होतांच ब्रह्माकार होतो हा चवथा अभ्यास. ४ वडाचें सूक्ष्म बीज फोडल्यावर जें दिसत सुद्धां नाहीं तेंच बीज हवा, पाणी, जमीन मिळतांच वृक्षरूप होतें. तद्वद्वासनापरिणाम भासतो हा पांचवा अभ्यास. ५ चोरांनीं डोळे बांधून देशांतरें नेलेला पुरुष दुसर्‍यानें मार्ग दाखविल्यावर स्वस्थानीं येतो, तसा गुरुउपदेशानें मुमुक्षु स्वस्थानीं जातो, हा सहावा अभ्यास. ६ मीठ पाण्यांत टाकल्यावर त्याचें पाणीच होतें हा सातवा अभ्यास. ७ मरणोन्मुख जाहलेला पुरुष स्वजनांचें रडणें जाणत नाहीं, तसा वृत्तिनिरोध केलेला पुरुष इंद्रियांचे लालुचीला जाणत नाहीं, हा आठवा अभ्यास. ८ पाप न करणारा मनुष्य तापलेल्या लोखंडानें जळत नाहीं. ( हा एक दिव्य करण्याचा प्रकार आहे ) तसा अहंकार सोडणारा कशानेंही लिप्त होत नाहीं, हा नववा अभ्यास. ९ या प्रमाणें करणें. हा अभ्यास. २ वेदांतानें ज्ञान होतें हें अपूर्व. ३ ज्ञान जाहल्यावर विदेहमुक्ती मिळते हें फल. ४ एक मातीचा घट जाणल्यावर सर्व मृद्विकार कळतात; तसें एक ब्रह्म जाणल्यावर सर्व कळतें. ही उपपत्ती पांच. ५ उत्पत्ति, स्थिति, लय, प्रवेश, नियमृन, पदार्थशोधन फल हे सात अर्थवाद. ब्रह्मापासून जग उत्पन्न होतें, १ वाचतें २ व त्याच रूपीं लीन होतें. ३ बिंबप्रतिबिंबन्यायानें मस्तक भेदून जीवरूपानें ब्रम्ह शरीरीं प्रविष्ट होतें. ४ अंतर्यामी रूपानें ब्रह्म पृथिव्यादिकांचें नियमन करितें. ५ तत् पदाचें लक्ष्य सत्यज्ञानानंदरूप ब्रह्म व त्वं पदाचें लक्ष्य कूटस्थ साक्षी प्रत्यक् ब्रह्म इत्यादि पदार्थशोधन. ६ जीव हा स्वयें ब्रह्मरूप असोन ज्ञानानें ब्रह्म होतो हें फल. ७ असे सात अर्थवाद मिळून हीं सहा लिंगें, याहीकरून तात्पर्यावधारण करणें तें श्रवण होय. अस्तु. प्रधानानें पाठविलेल्या सैन्यानें जय मिळविला तो आपणच मिळविला असें जसें राजा म्हणतो, तसें रागादिकांनीं प्रेरित करणांनीं केलेलें कर्म, मूढ मीं केलें असें म्हणतो तें मिथ्या होय.
पांचवा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP