मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
इष्टकाप्रार्थना

इष्टकाप्रार्थना

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

माते ! कीर्ति सुधेहुनि बहु गोड तुझी सदिष्टके ! लागे.
तुज जड म्हणेल, तो जड, कीं त्वां स्वात्मा सदिष्ट केला गे ! ॥१॥
श्रीविठ्ठलचरणातें रात्रिदिवस तूं उरीं वहातीस.
श्रीचा विपक्ष राधा म्हणवि ‘ बहु ’, परंतु ती न ‘ हा ’ तीस. ॥२॥
श्रीमत्तीर्थपदाच्या अनवरत श्रीपदासि वाहून,
झालिस तूं सन्मान्या तीर्थधरश्रीसदाशिवाहून. ॥३॥
विटला रमाकुचांच्या स्पर्शासि प्रभु, तुझ्या विटेनाच.
सौभाग्य तुझें निरुपम; अद्भुतभाग्योत्सवें विटे ! नाच. ॥४॥
विश्वंभरा वहासी; धरिल्या न त्यजसि आइ ! टेकेला.
धन्या तूं; गरुडेंही एकभुजभरेंहि ‘ आ ’ इटे ! केला. ॥५॥
कां त्वां धरिजेल, वसुनि साधुगृहीं, दुरभिमान वाईट ?
वाटसि अज्ञाना, तूं ज्ञात्यांची सुरभि, मानवा ईट. ॥६॥
त्वत्प्राप्ति ज्यास, न रुचति कनकाच्या कोटि त्या इटा, कविला.
हें काय ? तुवां निपटुनि मेरुशिखरिलोभ बाइ ! टाकविला. ॥७॥
प्रभु मोहिला तव सुखस्पर्शें, गीतें जसाचि काळविट.
कीं हा उभाचि भुलला; कैसा न नयेचि सुचिरकाळ विट ? ॥८॥
अद्भुत औदार्य तुझें कीर्तिति कविकोटि इष्टके ! कीं तें
देसी जेंवि घनघटा देती जें काय इष्ट केकींतें. ॥९॥
प्रभुनें मस्तकधृतपद दैत्यकुळीं धन्य शिष्ट केला जो,
तो पाताळस्थित बळि, परिसुनि तव कीर्ति, इष्टके ! लाजो. ॥१०॥
धरिला शिरीं दयाघन तव वच लंघिल न इष्टके ! कांहीं,
हा कवि मयूर पावो सत्वर या सर्व इष्ट केकांहीं. ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP